आषाढी एकादशीला कत्तलखाने बंद ठेवा; पुणे शहर शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी
26 Jun 2023 19:37:21
पुणे : आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सह संपर्कप्रमुख पुणे अजय भोसले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे उपस्थित होते. महाराष्ट्रातील समस्त वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भरत असतो. शहरातील वारकरी संप्रदाय, नागरिक मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा साजरा करतात. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिक जात असतात. या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत आणि हिंदू समाज तसेच वारकऱ्यांच्या भावनांना ठेच लागू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच, या दिवशी कोणत्याही ठिकाणी पशु हत्या होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. आता पोलीस यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.