महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना

26 Jun 2023 19:56:08
Maharashtra To Prevent Cow Slaughter

मुंबई
: महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी, असे नार्वेकरांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, तात्काळ चौकशी करुन एफआयआर नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि गोरक्षा समिती पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नांदेड जिल्हयातील किनवट येथे गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोरक्षक कार्यकर्त्याची (शेखर रापेल्ली) समाजकंटकांकडून झालेली हत्या, ६ अन्य कार्यकर्ते गंभीर जखमी होणे तसेच गोरक्षक कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे नोंदविण्यात आले होते. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पशू कल्याण मंडळाचे कमलेश शाह, विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र गौशाळा संपर्क प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी, रमेश पुरोहित, ॲड. राजू गुप्ता, ॲड. सिध्द विद्या, रिटा मकवाना, अशोक जैन, संदिप भगत, गणेश परब, जनक संघवी या बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सीमेवर अन्य राज्यातून गोहत्येसाठी होणारी पशू वाहतूक रोखण्यात यावी, भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, गोरक्षक कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे नोंदविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. तसेच, पशूमांस तपासणी यंत्र (मिट टेस्टिंग मशीन्स) यांचा वापर करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिले. येत्या दहा दिवसात यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन सुस्पष्ट धोरण आखून गृहविभागाच्या माध्यमातून गोरक्षा उद्दिष्टाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Powered By Sangraha 9.0