नवी दिल्ली : दिल्लीकरांसाठी एक दुखद बातमी आहे. लवकरच दिल्लीत विजेचे दर १० टक्क्यांनी महाग होऊ शकतात. डीईआरसी म्हणजेच दिल्ली विद्युत नियामक आयोगाने वीज खरेदी करारावरील दर वाढवण्यास मान्यता दिली आहे. वीज वितरण कंपनी बीएसईएसने वीज दर वाढवण्यासाठी डीईआरसीकडे अर्ज केला होता, ज्याला डीईआरसीने मंजुरी दिली आहे.
या मंजुरीनंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत वीज महाग होऊ शकते. दिल्लीत विजेचे दर वाढवायचे की नाही याचा अंतिम निर्णय दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार घेणार आहे. डीईआरसीने २२ जून रोजी दिलेल्या आदेशात या कंपन्यांची वीज खरेदीच्या उच्च किंमतीच्या आधारावर दर वाढवण्याची मागणी मान्य केली आहे.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार ३०० वॅट पर्यंत वीज बिल माफ करतं. पण आता ही योजना सुरु ठेवली तर दिल्लीच्या आर्थिक स्थितीवर यांचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधीच दिल्ली सरकारवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे.