पावसाळा सुरू झाला असून या काळात साथींचे आजारदेखील डोके वर काढतात. या साथींचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढते. डासांमुळे पसरणारे मुख्य आजार म्हणजे मलेरिया, डेंग्यू, फिवर आणि चिकनगुनिया. त्यापैकी आजच्या लेखात चिकनगुनिया या आजाराच्या लक्षणांची आणि उपाययोजनांची माहिती करुन घेऊया...
मलेरिया आणि डेंग्यूच्या तापाबद्दल बरेच समाजप्रबोधन झालेले दिसते. परंतु, चिकनगुनियाबद्दल फारच थोडी माहिती सामान्य नागरिकांना असते. मलेरियासाठी प्रभावी औषधे आहेत. परंतु, डेंग्यू, फिवर आणि चिकनगुनिया हे दोन्ही विषाणू (व्हायरस)मुळे होणारे आजार असल्यामुळे त्यावर प्रभावी औषध नाही. या दोन्ही आजारांच्या चाचण्या महागड्या असल्यामुळे निदान करणे कठीण जाते. त्यामुळे नोंदणीकृत रुग्णांची संख्यादेखील कमी दाखविली जाते. 2021 पेक्षा 2022 मध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या तापाच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले यश आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाले असेल. चिकनगुनियाची लक्षणे ही डेंग्यूसारखीच असल्याने निदान करणे कठीण जाते.
चिकनगुनिया हा आजार ‘ऐडिस इजिप्ती’ आणि ‘एडिस अल्बोपिक्टस’ या डासांच्या चावण्यामुळे होतो. ‘टोगाविरीडे’ हे विषाणू डासांच्या दंशाने शरीरात प्रवेश करतात. आजाराची लक्षणे चार ते आठ दिवसांत दिसू लागतात.
लक्षणे : ताप आणि सांधेदुखी ही दोन प्रमुख लक्षणे असतात. तापाबरोबर काही वेळा थंडीदेखील भरून येते. याशिवाय प्रचंड डोके दुखणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, थकवा येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे ही लक्षणे देखील काही रुग्णांमध्ये आढळतात. ही लक्षणे इतर साथीच्या आजारतदेखील असल्यामुळे फक्त हिस्टरी व तपासणीवरून चिकनगुनियाचे निदान करणे कठीण जाते. ताप बळावल्यास किंवा ताप एका आठवड्यात न उतरल्यास रुग्णांच्या अनेक चाचण्या केल्या जातात त्यातील एक चाचणी चिकनगुनियाचीदेखील असते.
चाचण्या : चिकनगुनियासाठी चिकनगुनियासाठी ‘आयजी जी’, ‘आयजी एम’ आणि ‘आरटी-पीसीआर’ या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास बर्यापैकी विलंब लागतो. रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यास निदान पक्के होते. हा आजार विषाणूंमुळे होत असल्यामुळे यावर विशेष उपचार नाहीत. घरी आराम करणे, पथ्य पाळणे आणि लक्षणाच्या हिशोबाने औषधे घेणे.
विश्रांतीमुळे आजार बरा होण्यास मदत होते. ताप आणि सांधे दुखी कमी होईपर्यंत विश्रांती घ्यावी.
तापासाठी ‘पॅरासिटामॉल’ची गोळी घ्यावी. अंगावरील पुरळ आणि सांधेदुखी ही काही रुग्णांमध्ये त्रासदायक ठरू शकते. पुरळांमुळे पायांना सूज येणे, चालताना त्रास होणे, सांधे जखडले जाणे ही गुंतागुंत होऊ शकते. काही रुग्णांमध्ये ‘प्लेटलेट’चे प्रमाण कमी होते.
मलेरिया आणि डेंग्यू फिवरपेक्षा हा आजार सौम्य असला तरी अनेक रुग्णांना याचा त्रास अनेक महिने जाणवतो. 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, डायबेटिस, ब्लडप्रेरचे रुग्ण लहान मुले यांना या गुंतागुंतीचा त्रास जास्त जाणवतो. गुडघे व इतर साधे यात जखडले जातात. त्यांच्या हालचालींच्या वेळेस प्रचंड वेदना होतात. त्यामुळे रुग्ण अंथरुणास खिळून राहतो. सांध्यांना सूज येते व नेहमीचे काम करणेदेखील कठीण होते. गृहिणीस हा आजार झाल्यास घरकाम करणेदेखील कठीण जाते. ही लक्षणे काही दिवस, ते काही आठवडे, ते काही महिने राहतात. या काळामध्ये रुग्णांच्या हालचालींवर व कामावर परिणाम झालेला असतो.
पथ्य : साधे जेवण घेणे. तेलकट व मसालेदारपदार्थ टाळणे, व्हिटॅमिन सी युक्त फळे जास्त खावी. उदा. संत्री, मोसंबी, आवळा, पेरु इत्यादी, सांधेदुखी जास्त असल्यास खावी.
सांधेदुखी जास्त असेल त्या काळात व्यायाम टाळावा. फिजिओथेरपीदेखील या काळात टाळावी.
वैयक्तिक अनुभव : कोरोना महामारीदरम्यान तापाची दहशत निर्माण झाली होती. मला जानेवारी 2021 ला थोडासा ताप आला. मात्र, अंग दुखणे, डोके दुखणे व सांधेदुखी प्रचंड प्रमाणात होती. माझे फिजिशियन डॉ. रोनक जरीवाला यांनी चेस्ट सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यात कोरोनाचे निदान झाले. 28 टक्के फुफ्फुसावर कोरोनाने ताबा मिळविला होता. ‘आरटी-पीसीआर’ चाचणीने कोरोनाचे निदान पक्के झाले. डॉ. जरीवाला यांनी ‘होम क्वॉरन्टाईन’चा सल्ला देऊन औषधे लिहून दिली. त्यांच्या सूचना तंतोतंत पाळल्या व औषधे नीट घेतली. जेवणातील पथ्य, नामस्मरण, ब्रह्मविद्या, ध्यानधारणा, आराम यामुळे कुठलीही गुंतागुंत न होता मी आठ दिवसांत बरा झालो. पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घेतले. कोरोनाने जेवढा त्रास दिला नाही. तेवढा त्रास चिकनगुनियाने दिला. ऑक्टोबर 2021 मध्ये डोके दुखून थोडासा ताप आला.
‘पल्स ऑक्सिमीटर’मध्ये हृदयाचे ठोके 120 पेक्षा जास्त होते, तर ‘एसपीओटू’ 90 पर्यंत खाली आले होते. व्हायरल फिवर समजून एक ‘सिनारेस्ट’ची गोळी घेतली व स्वस्थ पडून राहिलो. काही तासांनी अंथरुणातून उठणेही कठीण झाले. संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होत होती. साधी हालचाल केली, तरी संपूर्ण शरीर दुखत होते. ग्लानी येऊन मी काय बोलतो हे माझे मलाच समजत नव्हते. मुलगी डॉ. श्वेता धीराची, तिने लगेच डॉक्टर जरीवाला यांना बोलावले. त्यांनी घरी तपासणी केली. ‘ईसीजी’ काढला व रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. फोर्टिसमध्ये डॉ. संजय शहा यांच्या सल्ल्याने सर्व चाचण्या करण्यात आल्या. रक्ताच्या सर्व चाचण्या, ‘सी.टी. अॅजीओग्राफी’, सिटीस्कॅन, सोनोग्राफी अशा अनेक चाचण्या पुढील काही तासांत झाल्या व मला ‘आयसीयु’मध्ये भरती करण्यात आले. बरेचशे रिपोर्ट नॉर्मल असल्याने 24 तासांनंतर मला वॉर्डमध्ये हलविण्यात आले.
दोन दिवसांनी मला ‘डिस्चार्ज’ मिळाला. सर्व चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले होते. फक्त चिकनगुनियाचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला होता. पायांवर पुरळ आले होते व पायांवर प्रचंड सूज आली होती. पायामध्ये चप्पलदेखीलजात नव्हती. चालताना प्रचंड वेदना व्हायच्या. जरुरी पुरत्या वेदना शमनाच्या गोळ्या घ्यायचा व बाकीवेळा चिकनगुनियाशी मी अनेक महिने खेळत होतो. तर्जनीचे बोट बर्यापैकी दुःखत होते व त्यास सूज होती. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्रह्मविद्या सुरू केली, तर पुन्हा सांधे दुखू लागले. ‘फिजिओथेरपिस्ट’ने सल्ला दिला की, संपूर्ण बरे वाटेपर्यंत व्यायाम करू नका. त्याकाळात नामस्मरण, ध्यानधारणा, आध्यात्मिक वाचन, कविता, गझला यांचा आधार घेतला. चिकनगुनियावरील अनेक संदर्भ वाचले. काहींच्या मते हा आजार प्राणघातक नाही. परंतु, तो पुढे कित्येक दिवस, महिने आणि काही जणांमध्ये तो कित्येक वर्षं आपले अस्तित्व शरीरात दाखवितो. या गोष्टींचा अनुभव मी घेतला आहे. पायाची सूज काही आठवड्यांनंतर हळूहळू ओसरली. पायात चप्पल जाऊ लागली. चालताना वेदना कमी होऊ लागल्या तरी पण पायावर आलेले पुरळ फार संथ गतीने नाहीसे होत होते.
आज दीड वर्षांनेदेखील ते मला झालेल्या चिकनगुनियाची आठवण करून देते. प्रॅक्टिसमध्ये चिकनगुनियाच्या अनेक रुग्णांवर उपचार केले, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काही रुग्णांना गुडघ्यांना सूज येऊन उठणे-बसणे त्रासदायक होऊ लागले. गृहिणींना या आजाराचा त्रास जास्त जाणवतो. हात आणि मनगटाचे सांधे धरल्यास स्वयंपाकाचे काम करणे, चपाती लाटणे कठीण होऊन जायचे. वेदनाशामक गोळ्या तात्पुरत्या आराम द्यायच्या. पण, आजार शरीरात रेंगाळत राहायचा. चिकनगुनियाच्या प्रतापाची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे. चिकनगुनियावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे डासांचा प्रतिबंध करणे, स्वच्छता राखणे व आपली प्रतिकारशक्ती वाढविणे एवढेच हाती आहे. पावसाळ्यात या आजारांचे प्रमाण वाढते. कारण, डासांची उत्पत्ती वाढते.
प्रतिबंधात्मक उपाय : पावसाळ्यात अनेक साथीचे आजार उद्भवतात. डासांची उत्पत्ती कमी केल्यास फक्त चिकनगुनियाच नाही,तर मलेरिया, डेंग्यू, फिवर, झिका फिवर या आजारांवर पण प्रतिबंध येऊ शकतो. सरकारी आरोग्य खाते, महानगरपालिका हे प्रतिबंधात्मक उपाय योजत असतात. सामान्य नागरिक म्हणून आपली पण काही कर्तव्ये असतात ती आपण सर्वांनी पाळली पाहिजे.
वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय : डासांपासून संरक्षण मिळण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, शक्य असल्यास मच्छरदाणीचा वापर करणे, लहान मुलांना ओडोमॉससारखी मॉस्किटो रिपेंलंट क्रिम लावणे. मॉस्किटो कॉईल, धूप, मॉस्किटो रिपेलंट लिक्विड, गुड नाईट, हिट स्प्रे यांचा देखील वापर करणे. यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबांचे डासांपासून संरक्षण होऊ शकते.
सार्वजनिक प्रतिबंधात्मक उपाय : आपल्या घराभोवती पाणी तंबू देऊ नये. पाण्याचा नीट निचरा होईल, यासाठी सतर्क राहाणे. घरात लावलेल्या झाडांच्या कुंड्या, त्या खालील बश्या वेळोवेळी स्वच्छ कराव्या. साठवून ठेवलेले पाणी, पाण्याचे पिंप वेळोवेळी साफ करावे. कचरा शेजार्यांच्या दारात टाकू नये.
आपल्या घराचा व आपल्या सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवणे. गेली काही वर्षे राबवण्यात येणार्या स्वच्छता अभियानाचा सकारात्मक परिणाम साथीच्या आजारांवर दिसू लागला आहे. चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू, फिवर यांसारख्या आजारांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. दूषित पाण्यावाटे होणारे आजार ‘टायफॉईड’, उलट्या, जुलाब, कावीळ यांचेही प्रमाण कमी होताना दिसते. अनेक आजारांवर लसी उपलब्ध असल्यामुळे त्या आजारांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. गोवर, कांजण्या, पोलिओ, धर्नुवात, डिफ्तेरिया, कावीळ, क्षयरोग, टायफॉईड, स्वाईन फ्लू इत्यादी अनेक रोगांवर लसी उपलब्ध आहेत. पावसाळा सुरू व्हायच्या वेळेस आपल्या घरातील लहान मुलांचे प्राथमिक लसीकरण झाले आहे की नाही ते तपासून पाहावे. नसेल झाल्यास ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण करावे. तसेच, वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या.
शासकीय प्रतिबंधात्मक उपाय : आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ असतो, हे वैद्यकीय शास्त्राचे महत्त्वाचे तत्व आहे. आरोग्य खात्यातर्फे सार्वजनिक आरोग्याचे धोरण ठरविले जाते, त्याचे बजेट ठरविले जाते. केंद्रीय व राज्यस्तरीय आरोग्य खात्यात ही धोरणे ठरविली जातात. महानगरपालिकेमार्फत या योजना राबविल्या जातात. सार्वजनिक स्वच्छता, नालेसफाई, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे फेरीवाले हटविणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पाणी तुंबलेले असल्यास त्याचा लवकर निचरा करणे, मॅनहोलच्या झाकणांची व्यवस्थित देखभाल करणे. त्यांच्या चोरीला आळा घालणे, वस्त्या वस्त्यांमध्ये कीटकनाशकांची नियमित फवारणी करणे इत्यादी कामे शासनाकडून अपेक्षित आहेत. महापालिकेतील आरोग्य खात्याचा कारभार सुधारण्यास अजून बराच वाव आहे. तत्परता वाढली व भ्रष्टाचार कमी झाला, तर हे शक्य आहे.
डॉ. मिलिंद शेजवळ