पोर्टब्लेयर/मुंबई : केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबध्द आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच, अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी यासाठी पोर्टब्लेयर येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डानांची सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची आपण भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. देशात १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या उपक्रमात अंदमान निकोबारमधील बेरोजगार तरुणांना सुध्दा शासकीय नोकरी देण्याच्या या उपक्रमात समावेश करावा यासाठी प्रयत्न करणार असे आठवले म्हणाले.
तसेच अंदमान निकोबारमधील ९० टक्के जमीन ही वन जमीन आहे. या वन जमीनीतील काही भाग उद्योग व्यवसायाच्या उभारणीला मिळवुन देण्यासाठी वन विभागाचे आरक्षण काही ठिकाणी काढणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अंदमान निकोबारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आपण प्रयत्नशील आहोत. असे रामदास आठवले यांनी केले.
अंदमान निकोबार या केंद्रशासीत प्रदेशाच्या भौगोलिक, सामाजिक, एकुण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजना आणि उपक्रमांचा, विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे अंदमानच्या निकोबारच्या दौ-यावर आले असुन पोर्टब्लेयर येथील सचिवालयात सर्व शासकीय प्रशासकीय अधिका-यांची बैठक त्यांनी घेतली. तसेच, अंदमान निकोबारमधील विविध योजनांचा रामदास आठवले यांनी आढावा घेतला.
दरम्यान, अंदमान निकोबार हे एकुण ८३६ छोटया बेटांपासुन बनलेला केंद्रशासित प्रदेश असून येथील लोकसंख्या ४ लाख असताना येथील मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.