विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी : मंगलप्रभात लोढा

25 Jun 2023 17:06:47
Maharashtra Minister Mangalprabhat Lodha

पुणे
: शिक्षण घेऊन विविध पदावर करीत असताना शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. भुगाव येथे आयोजित स्किल इन्स्टिट्यूट फेज-२ आणि फ्युएल बिझनेस स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य सल्लागार संतोष हुरालीकोप्पी, फ्युएलच्या कार्यकारी अधिकारी मयुरी राजेंद्र, उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे, ईव्यासच्या संस्थापिका डॉ. प्रतिमा शौरी, परांजपे, स्किमचे अमित परांजपे आदी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करीत असताना सोबत संस्काराची जोड असावी. त्यामुळे स्वत:बरोबर समाजाचाही फायदा होईल, असे ते म्हणाले. तसेच, या संस्थेमार्फत मेहनतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत असून भविष्यात त्याला निश्चित फायदा होईल. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावे. या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. शासनाच्यावतीने संस्थेला आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी लोढा यांनी दिले.

देशपांडे म्हणाले, युवावर्गाला व्यवसायविषयक मार्गदर्शन होण्यासाठी फ्युएल संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने फ्युएल विद्यापीठ करण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न आहे.


Powered By Sangraha 9.0