मुंबईतील पंपिंग स्टेशनची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

25 Jun 2023 20:00:34
Maharashtra CM Eknath Shinde Mumbai Pumping Station

मुंबई
: मुंबई उपनगरातील काही भागांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून मिलन सबवे येथे प्रत्यक्ष भेट देऊन पावसात पाणी साठू नये म्हणून यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली असून मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.

ते पुढे म्हणाले, मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. सखल भागातील पाणी पंपिंगद्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये टाकले जात असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याचे ते म्हणाले. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुममधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असून नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच, पाणी साचण्याची कारणे जाणून घेतानाच या भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0