कथेकरीबुवा वपू

24 Jun 2023 16:49:25

v p kale 
 
व. पु. काळेंची ओळख लेखक म्हणून असली तरीही मला ते कथाकार म्हणूनच जास्त भावतात. भाषा हे शेवटी अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. आपले अनुभव आपल्या कल्पना कोण्या एका माध्यमातून लोकांसमोर मांडण्यापेक्षा त्यांनी कथाकथन केले. कथा ऐकणं म्हणजे केवळ कानांचं काम नव्हे, ऐकण्या आणि पाहण्यापलीकडे आपण एका अविष्काराचा अनुभव घेत असतो.
 
आपलं सगळं आयुष्यच कथांमध्ये गुरफ़टलेलं असतं. रामायण महाभारत ऐकत आपण मोठे होतो, आपल्याला पुढे गॉसिप्स ऐकायची सवय लागते. याही गोष्टीच, आजवर न अनुभव घेतलेली गोष्टही आपल्याला माहिती असते. कुणी न कुणीतरी सांगितलेली असते. या कथा अशा कानोकानी पसरत जातात, त्यांचे माहात्म्य ओळखून आपला अस्सल असा विचार लोकांपर्यंत आणला तो व पुंनी. साहित्याचा नवा आयाम तत्कालीन समाजाला दाखवला तो त्यांनीच. त्यापूर्वी आपल्याकडे कीर्तने होत, निरूपणातून समाजप्रबोधन होई, पण समाजाचे वास्तव काल्पनिक कथांच्या आधारे सांगत फिरणारे कथेकरी बुवा म्हणजे व पु.
 
त्यांच्या एका एका वाक्यात गहन अर्थ सापडतो. नातेसंबंधांविषयी त्यांनी फार लिहिलंय, माणसांविषयी लिहिलंय. मैत्रीबद्दल ते म्हणतात, 'मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत..!' मैत्री, नाती आणि माणसां, आपली माणसां यांची आपल्या आयुष्यातील भूमिका मोलाची असते हे सांगताना त्यांनी माणसांना सतावणाऱ्या अडचणींविषयी सांगितलंय. ते म्हणतात, 'प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यत असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणसं..! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!'
 
वपु म्हणतात, 'पुरुषाचं लग्न झालं की त्याला आई दुरावते आणि मूल झालं की बायको दुरावते..' आपला आपल्या माणसांसोबतचा प्रवासही एका रेषेत जातो का? कालानुरूप जसे आपण बदलत असतो तशी नातीही बदलतात, कधी नाती तीच असली तरी त्यांचे अर्थ बदलतात. एका जगलेल्या पुऱ्या नात्याचा अर्थच क्षणभंगुर म्हणजे काय? पायाखालची आधाराची जमीनच ढासळल्यासारखं वाटत. पण मग या भंगुर नात्यांत आपण स्वतःला कसं गुरफटून घ्यायचं हेही वपु सांगतात. वपुंच्या सांगण्यात तत्वज्ञान आहे, रोजच्या जगण्याच्या अर्थांशी निगडित आपल्याला माहितीच असलेल्या गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्या. वपु वाचताना आपण त्यांच्यात गढून जातो. माणसांची विचारपद्धती आणि त्यांचे विचारप्रवाह त्यांनी अचूक जोखले. जस की त्यांना मानसशास्त्रच कळत होतं. त्यांनी माणसांचे वैचारिक पॅटर्न मांडले. त्या आधारे एका दृष्टिकोनातून ते माणूस उलगडून दाखवतात. पेशाने स्थापत्यविशारद, मानाने लेखक आणि व्यक्तिमत्वाने कथाकार, एक रसिक व्हायोलिन आणि हार्मोनियम वादक. सुंदरतेचा वेड घेऊन जन्मलेला माणूस.. छायाचित्रकारसुद्धा. अशा अनेक माध्यमांतून ते व्यक्त झालेत, खुललेत, फ़ुललेत. जिवंत राहिलेत. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांना जाऊन काळ लोटला परंतु आजही त्यांच्या साहित्याचा दरवळ आहेच. काळ मात्र त्यांना विसरू शकलेला नाही.
Powered By Sangraha 9.0