हरियाणातून 20 व्हाईट बॅक्ड गिधाडे भोपाळकडे रवाना

24 Jun 2023 10:51:46

vulture transfer


मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) हरियाणा येथील पिंजोरमधील जटायू कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटर (जेसीबीसी) येथून 20 गिधाडे भोपाळ व्हलचर कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटर (व्हीसीबीसी)मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहेत. यापैकी पाच नर आणि पाच मादी गिधाडे असून, या गिधाडांच्या पाच जोड्या आहेत. इतर दहा गिधाडे ही लहान वयाची म्हणजेच साधारण तीन वर्षे वयोगटाची असल्याने त्यांचे लिंग अद्याप अनिश्चित आहे. त्यांचे ‘जेनेटिक मॅनेजमेंट’ म्हणजेच ‘अनुवांशिक व्यवस्थापन’ करण्यासाठी हे हस्तांतरण ‘बीएनएचएस’ने केले आहे.


हरियाणा राज्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक पंकज गोयल यांनी या हस्तांतरणासाठी परवानगी दिली असून, हे देशातील तिसरे गिधाड हस्तांतरण आहे. हरियाणातील पिंजोर हे देशातील सर्वाधिक 399 गिधाडे असणारे तसेच, व्हाईट बॅक्ड व्हलचर, स्लेंडर बिल्ड व्हलचर आणि लाँग बिल्ड व्हलचर या तीन दुर्मीळ प्रजातीतील गिधाडे असणारे गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र आहे. यापैकी 20 गिधाडांची प्रथम निवड करण्यात असून ती तीन ते आठ वर्षे वयोगटातील आहेत. भावंडांचे आपसातील प्रजनन रोखण्याच्या उद्देशाने त्यांची निवड केली गेली. त्यानंतर त्यांच्या प्राथमिक वैद्यकीय चाचण्या हरियाणा केंद्राकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर भोपाळ केंद्राच्या चमुनेही या पक्ष्यांच्या वैद्यकीय चाचण्या पार पाडल्या. या गिधाडांना शुक्रवारी सकाळी स्थानांतरणासाठी खास वापरण्यात येणार्‍या व्हलचर बॉक्सेसमध्ये ठेवण्यात आले व त्यांची वातानुकूलित गाडीतून भोपाळकडे रवानगी करण्यात आली. शनिवार, दि. 24 जून रोजी दुपारपर्यंत ही 20 गिधाडे भोपाळमधील त्यांच्या नव्या केंद्रामध्ये पोहोचतील.



vulture transfer


“नव्याने आणलेल्या या पाहुण्यांपासून इतर पक्ष्यांना होणारे काही त्रास किंवा आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून 45 दिवस या गिधाडांना ‘क्वारंटाइन एव्हियरी’मध्ये ठेवण्यात येणार आहे. दर 15 दिवसांनी त्यांचे ‘हेल्थ चेकअप’ केले जाणार असून 45 दिवसांच्या कालावधीनंतर मुख्य केंद्रात त्यांना हलवण्यात येणार आहे. गिधाड हस्तांतरण करताना प्रचलित प्रमाण पद्धत वापरली गेल्यामुळे यामध्ये धोका उद्भवत नाही आणि स्थांनातरण यशस्वीरित्या पार पडते,” अशी माहिती भोपाळ गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे व्यवस्थापक रोहन श्रुंगारपुरे यांनी दिली आहे.


‘बीएनएचएस’चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला असून, हे पक्षी मध्य प्रदेशातील वन विभागाला त्यांच्या गिधाड प्रजनन कार्यक्रमाला गती देण्यासाठी मदत करतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे हे वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या टीमसह संपूर्ण ऑपरेशनचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव संरक्षक जसबीरसिंग चौहान यांनी हरियाणाच्या वनविभागाचे या उपक्रम आणि योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.


“प्रजनन सुधारण्यासाठी व इतर गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रांना पक्षी देण्यास आम्हाला आनंद होईल, त्यांचे प्रजनन करून जास्तीत जास्त पक्षी नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आम्हाला मिळू शकतील,” अशी भावना प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वन्यजीव वार्डन पंकज गोयल यांनी व्यक्त केली आहे. गिधाड संवर्धनात हरियाणा आघाडीवर असल्याने, राज्य गिधाडांची लोकसंख्या वाढवण्यासाठी, प्रजनन वाढवण्यासाठी आणि त्यांचे संभाव्य नामशेष होण्यापासून रोखण्यासाठी अशा हस्तांतरणास पुढेही प्रोत्साहन देईन, असेही त्यांनी सांगितले.



“गिधाडांचे हे तिसरे हस्तांतरण असून संवर्धनाच्या प्रक्रियेतील हा एक उल्लेखनीय टप्पा आहे. ‘बीएनएचएस’च्या संवर्धन टप्प्यातील या महत्त्वपूर्ण क्षणाची साक्षीदार आहे याचा आनंद आहे. प्रजनन काळात त्यांच्या प्रजननासाठी (ब्रिडिंग) आम्ही आशादायी आहोत."

- निकिता विभू प्रकाश,
केंद्र व्यवस्थापक, हरियाणा व्हलचर कॉन्झरवेशन ब्रिडिंग सेंटर

“भोपाळमधील केंद्रामध्ये व्हाईट बॅक्ड व्हलचर्सची संख्या तुलनेने कमी होती. प्रजनन जोड्या वाढविण्याच्या उद्देशाने हे हस्तांतरण केले गेले आहे. याचे नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील."

- रोहन श्रुंगारपुरे,
केंद्र व्यवस्थापक, भोपाळ व्हलचर कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटर






Powered By Sangraha 9.0