नवी दिल्ली : एकविसाव्या शतकातील भारत अतिशय वेगवान वाटचाल करत आहे. एकेकाळी जगातील नाजुक अर्थव्यवस्था असलेला भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर भारत पोहोचला असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यरात्री अमेरिकी संसदेस संबोधित करताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा सर्वांत महत्वाचा दिवस गुरुवारी पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही राष्ट्रांदरम्यान संरक्षण, अंतराळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक महत्त्वाच्या विषयांवर करारही झाले. द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रास संबोधित केले.
पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली तेव्हा भारत जगातील दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. त्यावेळी नाजुक स्थितीत असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे. आताभारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. ज्या ज्या वेळी भारताचा विकास होतो, त्या त्या वेळी जगालाही त्याचे फायदे होतात. त्यामुळे जागतिक विकास आणि भारताचा विकास हे एकमेकांपासून वेगळे नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
अमेरिकेची लोकशाही सर्वात जुनी आहे आणि भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले त्यामुळे दोन्ही देशांची भागीदारी लोकशाहीच्या भवितव्यासाठी चांगली आहे. जगाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि भविष्यातील चांगल्या जगासाठी दोन्ही राष्ट्रांचे संबंध हे अतिशय आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांत एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी प्रगती झाली आहे. त्याचवेळी एआय म्हणजेच अमेरिका आणि इंडिया यांचे संबंधही वेगळ्या उंचीवर गेले आहेत. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीतून आणि इतिहासातून आलो आहोत, परंतु आम्ही एक समान दृष्टी आणि समान नियतीने एकत्र आहोत. जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे हे आमच्या भागीदारीचे ध्येय आहे आणि या शतकासाठी आमचे आवाहन आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
दहशतवाद हा मानवतेस धोका
९/११ च्या हल्ल्याला आणि मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याला एक दशकाहून अधिक काळ लोटला तरी, कट्टरतावाद आणि दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे. या विचारधारा नवनवीन ओळख आणि नवनवीन रूपे घेत राहतात, पण त्यांचे हेतू तेच राहतात. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि त्याच्याशी निगडीत काहीही असू शकत नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींवर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे.
युद्धाचे नव्हे मुत्सद्देगिरीचे युग
रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले, हे युद्धाचे युग नाही, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचे युग आहे. रक्तपात आणि मानवी दुःख थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जे काही करता येईल ते केले पाहिजे. युनायटेड नेशन्स चार्टरचा आदर, विवादांचे शांततापूर्ण निराकरण, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर यावर जागतिक व्यवस्था आधारित आहे.
संसद अमेरिकेची, करिष्मा मोदींचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकी संसदेत आगमन होताच अमेरिकी खासदारांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे पहावे, यासाठी अनेक खासदार प्रयत्न करत असताना दिसले. भाषणादरम्यान ‘मोदी मोदी’ या घोषणांसह तब्बल १४ वेळा ‘स्टॅंडिग ओव्हिएशन’ देण्यात आले. भाषणानंतर बहुसंख्य खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी केली होती.
ऐतिहासिक करार
संरक्षण
१. एफ ४१४ लढाऊ इंजिनांची एचएएलसोबत निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरणासह
२. संरक्षणास बळकटी देण्यासाठी प्रिडेटर ड्रोन मिळणार
३. भारतीय शिपयार्डमध्ये अमेरिकी नौदलांची जहाजे दुरुस्तीसाठी येणार
४. हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात भागिदारी अधिक मजबूत करणार
अंतराळ
१. भारताची एर्टेमिस्क एकॉर्डवर स्वाक्षरी
२. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये नासा आणि इस्रोची २०२४ साली संयुक्त मोहिम
क्रिटीकल मिनरल्स
१. मिनरल सिक्युरिटी पार्टनरशीप आणि पुरवठा साखळीमध्ये भारताच्या सदस्यत्वास अमेरिका पाठिंबा देणार
सेमीकंडक्टर
१. मायक्रॉन भारतात करणार २२ हजार ५४० कोटींची गुंतवणूक
२. लॅम रिसर्च देणार ६० हजार भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षण
एडव्हान्स कॉम्प्युटिंग
१. एआय, एडव्हान्स वायरलेस आणि क्वांटम तंत्रज्ञानात सहकार्य
२. अमेरिकेच्या क्वांटम डेव्हलपमेंट कन्सोर्टीयममध्ये भारतीय विद्यापीठांना सदस्यत्व
टेलिकॉम
१. ओपन रेडीओ एक्सेस नेटवर्कद्वारे ५जी आणि ६जी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण
२. विश्वासार्ह नसलेल्या व्हेंडर्सची टेलिकॉम उपकरणे काढून टाकण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेत भारताचा सहभाग
शिक्षण
१. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अर्थात स्टेम शाखांमध्ये एक्सचेंड प्रोग्राम आणि संशोधन सहकार्य
प्रशासन
१. तात्पुरत्या वर्क व्हिसाचे नुतनीकरण होणार (एच१बी१)
२. भारतात बंगळुरू आणि अहमदाबाद येथे अमेरिका नव्या वकिलाती उघडणार
हवामान
१. ग्रीन हायड्रोजन आणि पवन उर्जेसाठी सखोल तंत्रज्ञान सहकार्य
आरोग्य
१. डिजीटल हेल्थ क्षेत्रात युएस कॅन्सर इन्स्टिट्यूटसोबत सहकार्य, इनोव्हेशनसाठी निधी
२. कर्करोग निदान आणि उपचारांसाठी साठी दोन्ही राष्ट्रे एआयचा वापर डिजीटल पॅथॉलॉडी प्लॅटफॉर्म विकसित करणार