चला, स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा जागृत करुया!

23 Jun 2023 23:24:47
My City Love Jihad Free City Campaign

खोपोली
: “ ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या माध्यमातून आपल्या कुटुंबसंस्थेवर, धर्म, संस्कृतीवर प्रहार करणार्‍यांविरोधात एकत्र येत स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा जागृत करण्याची गरज आहे,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ पेण, शाखा खोपोली आणि महेश मोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २३ जून रोजी हनुमान मंदिर, वासरंग, खोपोली येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानांतर्गत आयोजित सभेत उपस्थितांशी त्या संवाद साधत होत्या.

यावेळी बोलताना योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’मागच्या षड्यंत्राची उपस्थितांना विस्ताराने माहिती दिली. ‘लव्ह जिहाद’ची कारणे, त्याचे दुष्परिणाम, तसेच ‘लव्ह जिहाद’चा धोका कसा टाळता येऊ शकतो, याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, जर एखादा दाम्पत्याचा आंतरधर्मीय विवाह झाला आणि दुर्दैवाने संबंधित विवाहामुळे काही त्रास असेल, तर आंतरधर्मीय परिवार विवाह समन्वय समिती कशाप्रकारे त्यांना मदत करू शकेल, याविषयीची माहितीही साळवी यांनी दिली.

यावेळी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे महत्त्व साळवी यांनी विशद केल्यानंतर, उपस्थित मातृशक्तीने आणि ग्रामस्थांनीही राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा व्हायलाच पाहिजे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे अत्यंत संवेदनशील असल्याने ते राज्यातील मुलींच्या आणि मुख्यत्वे धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा राज्यात जरूर पारित करतील, असा आशावाद यावेळी खोपोलीवासीयांनी व्यक्त केला.

यावेळी मंगेश दळवी, महेश मोरे, सचिन महाडिक, चंदन घोसाळकर, रुपेश सावंत, तेजस दळवी, समीर सुर्वे, संदीप सावंत, निकिता मोरे, अविनाश मोरे, रमेश मोगरे, जयमाला पाटील, माधवी कुवळेकर यांच्यासह गावातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0