मुंबई : मुंबई, पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली होती. मात्र या अज्ञातास अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह, अंधेरी, कुर्ला भागात उद्या २४ जून २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली होती. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धमकी देणाऱ्या या आरोपीस अटक केल्यानंतर तो आपली वेगवेगळी नावं सांगत आहे. अज्ञाताने पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला आणि २४ जून २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी दिली, शिवाय आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल. असे सांगितले.