नवी दिल्ली : बिहारची राजधानी पटना येथे आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच मतभेदाचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांनी भूमिका घ्यावी असा आग्रह अरविंद केजरीवाल यांनी धरल आहे तर काँग्रेसच्या त्यास विरोध असल्याचे समजते.
बैठकीमध्ये मोदी विरोधासाठी रणनिती आणखी जाणार आहे. मात्र, बैठकीपूर्वीच सहभागी पक्षांमध्ये विसंवादासा प्रारंभ झाला आहे. केंद्र सरकारने दिल्ली सरकारविरोधात काढलेल्या अध्यादेशास संसदेत मंजुर होऊ न देण्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आग्रही आहेत. त्यामुळे या बैठकीत त्या मुद्द्यावर निर्णय व्हावा, असा आग्रह केजरीवाल यांनी धरला आहे. मात्र, या बैठकीमध्ये केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच्या रणनितीवरच चर्चा व्हावी अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे समजते. आपल्या मनाप्रमाणे न झाल्यास बैठकीत सहभागी न होण्याचे अथवा बैठक सोडून निघून जाण्याचा इशारा आपने दिल्याचेही समजते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज बिहारची राजधानी पटना येथे विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महेबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासह द्रमुक आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
नितीश कुमार है मोदीजी के खास
पटना येथे बैठकीपूर्वीच पोस्टरबाजीस सुरूवात केली असून त्यामध्ये नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या नावे लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये “न आशा है, न विश्वास है। सम्हल कर रहना देश के लोगों ऐ नीतीश कुमार है। मोदी जी का खासमखास है”। अशा खोचक ओळी लिहिण्यात आल्या आहेत.