नवी दिल्ली : अबुधाबीमध्ये सरकारने एक नियम आणला आहे. या नियमानुसार लोक रस्त्याच्या कडेला नमाज अदा करू शकणार नाहीत. पोलिसांनी आता रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर कुठेही वाहन थांबवून नमाज अदा केल्यास एक हजार दिरहमचा म्हणजेच २२ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो, असे अबू धाबी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आता मुरादाबादमधील सुफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हा नियम भारतात लागू केला असता तर काही धर्मांधांनी हाहाकार माजवला असता.
सुफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी म्हणाले की, इस्लामिक देशांमध्ये रस्त्यावर नमाज अदा करण्यासाठी जे नवीन नियम बनवले जात आहेत ते कौतुकास्पद आहेत, कारण इस्लाममध्ये कोणालाही रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी नाही.कशिश वारसी म्हणाले की, अबुधाबीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. हीच गोष्ट आपल्या देशात घडली असती तर आतापर्यंत काही धर्मांधांनी गदारोळ माजवला असता, पण हे सर्व इस्लामिक देशात अबुधाबीमध्ये घडत आहे, त्यामुळे ते काही बोलत नाहीत. अबुधाबीच्या सरकारने लोकांना खऱ्या इस्लामची माहिती दिली याचा मला खूप आनंद आहे.इतरांचा मार्ग अडवणे योग्य नाही.
इस्लाम कधीही कोणाचाही मार्ग अडवून नमाज अदा करण्याविषयी सांगत नाही. जर तुम्हाला नमाज अदा करायचा असेल तर घरी आणि मशिदीमध्ये करा. किंवा अशा ठिकाणी नमाज अदा करा की जिथे वाहतूकीत बिघाड होणार नाही. त्यामुळे कशिश वारसी म्हणाले की, इस्लामचा चांगला संदेश संपूर्ण जगापर्यंत गेला पाहिजे. अबुधाबी सरकारने हे मोठे पाऊल उचलले याचा मला खूप आनंद आहे. इस्लाम हा कोणालाही त्रास देण्याचा धर्म नाही, तर इस्लाम हा इतरांमध्ये प्रेम आणि बंधुभाव पसरवण्याचा धर्म आहे, असा संदेश तेथील सरकारने संपूर्ण जगाला दिला आहे.