हिंदुत्व विसरलेला पुरुष

22 Jun 2023 20:46:56
Shivsena UBT Uddhav Thackeray Political Agenda

भाजपचे हिंदुत्व गोमूत्रामध्ये फसले आहे - इति उर्दू भवन बांधण्यासाठी उत्सुक असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे नेते, उबाठा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. हिंदुत्व आणि गोमूत्र यावर या आधीही उद्धव ठाकरे यांनी अनेकदा काहीबाही वक्तव्य केली आहेत. ‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’ वगैरे म्हणत त्यांनी हिंदुत्वाचा अनर्थच केला. उद्धव यांना गोमूत्र म्हणजे पर्यायाने गोमाता आणि शेंडी- जानवे म्हणजे पर्यायाने ते धारण करणार्‍या ब्राह्मण समाजाचे इतके वावडे का असावे? ‘हे मराठी-मुसलमान तो महाराष्ट्रीयन-मुसलमान,’ असे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे उरलेसुरले लोकही मुसलमान समाजाला अगदी कुठे ठेवू आणि कुठे नको, असेच वागतात. या पार्श्वभूमीवर उद्धव शेंडी-जानव्याला विरोध का करत असतील, तर उद्धव यांनी पाहिले आहे की, देशात हिंदुत्वामुळे भाजप सत्तेत आले. भाजपचे मतदार उबाठाकडे वळवणे शक्यच नाही; पण जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, ते तरी आपल्याला मतं देऊ शकतात, या अविचारानेच उद्धव ठाकरे हे सातत्याने हिंदुत्वाबद्दल काहीबाही बोलत सुटतात. असो. उद्धव त्यांच्या सभेत हिंदुत्व आणि गोमूत्र वगैरे म्हणत होते आणि त्याच रात्री नांदेडमध्ये गोमातेच्या रक्षणासाठी नि:स्वार्थीपणे कार्य करणार्‍या शेखर रोपलू या गोरक्षकाची हत्या झाली. शेखर यांच्यासारखे अनेक गोरक्षक आहेत, जे गोमातेसाठी सतत संघर्ष करतात. उद्धव यांना गोमातेसाठी प्राणांतिक धोका पत्करणार्‍या गोरक्षकांबद्दल काय वाटत असावे? अर्थात, त्यावर ते चकार शब्द बोलणार नाहीत. कारण, गोरक्षेबद्दल बोलले, तर त्यांचा मतदार नाराज होऊ शकतो. शेवटी काय धर्म, संस्कृती, समाजापेक्षा पदरात पडणारी कुठची का होईना मतं मिळणे महत्त्वाचे. काही मोजके लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही हो; पण छे, या भ्रमात कुणीही राहू नये. प्रकाश आंबेडकर यांनी औरंग्याच्या कबरीवर डोके ठेवले. यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता प्रकाश यांच्या कृत्याबद्दल चकार शब्द न काढता ठाकरेंनी विषयांतर केले. प्रकाश आंबेडकर यांचे ते औरेगंजेबपूजन खरेच निंदनीयच होते; पण त्याबद्दल उद्धव गप्पच राहिले. ‘नरोवा कुंजरोवा’ ही त्यांची सातत्याने भूमिका राहिली आणि त्यातूनच ते राजकारण करतात. शेवटी उद्धव यांची स्पर्धा राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या अनाकलनीय निधर्मीपणाशी (थोडक्यात मुस्लीम धार्जिणेपणाशी) आहे ना?

गद्दारीचे आदिपुरूष...

अहो, गुटेरस आमची मागणी मान्य करा ना. २० जून ही तारीख ‘जागतिक गद्दार दिवस’ म्हणून ठरवा. मी पत्र लिहिले तुम्हाला... काय म्हणता मी कोण? काय गुटेरस, तुम्ही मला ओळखत नाही? मला? मी किती किती प्रसिद्ध आहे. अहो, ‘डब्लूएचओ’चे लोक कोरोनामध्ये ज्या साहेबांचा सल्ला घ्यायला येणार होते ना, त्या साहेबांचा मी माणूस आहे, कळलं का? वारे वा मला ओळखत नाही, तुम्ही ‘सो दाऊद की एक राऊत की’ म्हण ऐकली की नाही तुम्ही? हं पण तुम्हाला मराठी कुठे येते? नको येऊ दे, आमच्या मुख्य प्रेरणास्थान इटलीच्या मातांना, तरी कुठे येते मराठी? त्यांना तर हिंदीही येत नाही. जाऊ दे, आता सध्या त्यांच्या छत्रछायेत असल्याने त्यांच्याविरोधात काही बोललो, तर मला पुढे राज्यसभेत यायला मिळणार नाही. हो, पुढच्या खासदारकीची बेगमी आताच करून ठेवलेली बरी. काय आहे ना गुटेरस साहेब, सध्या पक्षात मला स्पर्धा खूप वाढली आहे. सुषमा अंधारे या मुख्य स्पर्धकाने तर काहीबाही बोलण्याचे माझे ‘पेटंट’च हिसकावून घेतले. वारीत जाऊन पोळ्या लाटल्या. मी जर महिला असतो, तर मी पोळ्या लाटल्या असत्या, भाजीपण बनवली असती, पुर्‍या सुद्धा तळल्या असत्या; पण आता तसं करू शकत नाही. माझे मार्केट ‘डाऊन’ झाले. त्या स्पर्धकाला आणि मला सगळे काही सारखेच मिळते. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला कुणाला ‘ट्रोल’ करायचे झाले, तर त्यांची आवड आम्ही दोघेच असतो, तर त्या स्पर्धकापेक्षा मला जास्त चर्चेत राहायचे आहे, गुटेरस साहेब. त्यामुळे मी तुम्हाला पत्र लिहिले. अपेक्षा आहे, तुम्ही कारवाई कराल. आतली गोष्ट सांगू का? कारवाई करा की नका करू; पण संजय राऊतने मला पत्र लिहिले असे तरी म्हणा. साधे ट्विट तरी करा. त्यानिमित्ताने का होईना, माझ्या नावाची चर्चा होईल. ‘नाम नही हुआ तो क्या हुआ, बदनाम तो हुए’ या थेअरीवर माझा विश्वास आहे. गुटेरस साहेब, भारत देशाचे पंतप्रधान मोदी अमेरिकेत जातात. त्यांना जगभरात मानसन्मान मिळतो. सगळे जग त्यांना ओळखते. मग मलाही भारताबाहेर लोकांनी ओळखायला हवे ना? प्लीज प्लीज गुटेरस साहेब. गुटेरस साहेब, तुम्ही काहीच बोलत नाहीत; पण हा आवाज कुणाचा येेतोय. अरे, हे कोण म्हणतेय की, पुलोद आणि त्यानंतर महाविकास आघाडी हेच गद्दारीचे आदिपुरूष आहेत म्हणून?


Powered By Sangraha 9.0