ठाण्यात खाजगी बस वाहतुकीवर आरटीओचा 'वॉच'

22 Jun 2023 19:26:59
RTO Watch On private Bus Transport

ठाणे
: खाजगी बस वाहतुकीवर ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने ' वॉच' ठेवला आहे. त्यानुसार आरटीओच्या विशेष तपासणी मोहिमेत कर थकीत, विनापरवाना तसेच परवाना अटीचा भंग करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेऊन वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ३५ खाजगी बसेस विरोधात आरटीओच्या वायुवेग व रस्ता सुरक्षा पथकाने दंडात्मक कारवाई करून तब्बल अडीच लाखांचा दंड आकारला आहे.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून ठाण्यात अनेक बस धावत असल्याच्या तक्रारी ठाणे आरटीओकडे आल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओकडुन जिल्ह्यात बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या तपासणी ३५ दोषी खाजगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे यांनी दिली.

ठाण्यात कळवा, तीनहात नाका आणि नितीन सिग्नल परिसरात १३७ खाजगी बसची तपासणी केली.कारवाईमध्ये कर थकीत वाहने, विनापरवाना अथवा परवाना अटीचा भंग करून बस चालवणे, बसमधून अवैधरित्यारित्या मालवाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपणे, बस मधील अवैध बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, ज्यादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा तसेच आपत्कालीन दरवाजाची तपासणी करण्यात आली. नोंदणी क्रमांक दुसरा वापरुन रस्त्यावर धावणाऱ्या बसेसवर देखील कारवाई करण्यात आली. यावेळी दोषी आढळलेल्या बस धारकांकडून २ लाख ५४ हजारांचा दंड वसूल केला आहे.

Powered By Sangraha 9.0