नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक मोठे संरक्षण करार होणार आहेत. यासोबतच अमेरिकेकडून भारताला जेट इंजिनचे तंत्रज्ञान मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. रशियाला मागे टाकत भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र विक्रेता देश म्हणून अमेरिका बनू पाहत आहे. अमेरिकी कंपन्या भारतात येऊन देखील उत्पादन करण्यास तयार आहेत. त्यामुळे भारताच्या मेक इन इंडियाला सुध्दा चालना मिळणार आहे.
सध्या भारत जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे. पण भारत सरकार संरक्षण क्षेत्रात घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारताला आयातक सोबतच शस्त्रास्त्र निर्यातक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारत सध्या 80 हून अधिक देशांना शस्त्रास्त्र निर्यात करतो, यामध्ये अमेरिका हा प्रमुख ग्राहक आहे. चिनूक आणि अपाची या चॉपरचे सुटे भाग पुरवण्यात भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
सोबतच भारताने फिलिपिन्सला रशियाच्या मदतीने बनवलेल्या ब्रह्मोस मिसाईल विकण्याचा करार केला आहे. व्हिएतनाम सुध्दा भारतात निर्मित ब्रह्मोस मिसाईल खरेदी करण्यास उत्सुक आहे. हा करारही लवकरच होणार आहे. पुढील वर्षात भारताचे वार्षिक 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संरक्षण निर्यात करण्याच लक्ष्य आहे.