अखेर शोध संपला! दर्शना पवारच्या खुनाचा आरोपी प्रियकरच!

22 Jun 2023 17:41:06
Darshana Pawar Murder

पुणे
: एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या आणि वनाधिकारी बनलेल्या दर्शना पवारच्या खुनाचा मुख्य आरोपी तिचाच प्रियकर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरुन जेरबंद केले आहे. दर्शना एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी तिचे लग्न अन्यत्र ठरविल्याने त्याने हा खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याला सतीचा माळ याठिकाणी आढळून आला होता.

राहूल हंडोरे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून त्यांची जुनी ओळख आहे. हंडोरे हा देखील एमपीएससीची परीक्षा देत होता. या परिक्षेत दर्शना हिला यश मिळाले. परंतु, तो अनुत्तीर्ण झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी लग्न ठरवले. त्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतो. तोपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र, दर्शनाच्या आईवडिलांनी तिच्यावर वरसंशोधन सुरु केले होते. दर्शनाने देखील लग्नाला नकार दिल्याचे देखील पोलीस तपासात आले आहे.

हंडोरे याने देखील एमपीएससीव अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता. सत्कार कार्याक्रमासाठी पुण्यात आलेल्या दर्शनाला घेऊन तो राजगड परिसरात गेला. तिथे त्यांच्यामध्ये वाद झाले. त्यानंतर त्याने तिचा खून केला. घटनास्थळावरुन तो विविध राज्यांमध्ये गेला होता. राजगडाजवळील सीसीटीव्हीमध्ये त्याच्या हालचाली कैद झाल्या होत्या. जाताना ते दोघे दिसत होते. तर, परत येताना तो एकटाच येत असताना दिसल्याने पोलिसांनी संशयावरुन त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.


Powered By Sangraha 9.0