कळव्यातील इमारतीचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जिवितहानी टळली

21 Jun 2023 19:11:39
The slab collapsed of the building in Kalva

ठाणे
: पावसाने दडी मारलेली असतानाही ठाण्यात पडझडीची सुरुवात झाली. कळव्यातील खारेगाव परिसरातील हिरादेवी मंदिरा जवळील तळ अधिक दोन मजली साई सपना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब व टेरेसची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने जिवितहानी टळली असुन एका दुचाकीचे नुकसान झाले.

ठाण्यातील ही इमारत धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन या इमारतीत राहत असलेल्या १२ कुटुंबाची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था ठाणे महापालिका शाळा क्रमांक ६७ मध्ये करण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील अतिधोकादायक असलेल्या ३३ इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या असून उर्वरित ४९ इमारतीना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धोक्याची सूचनादेखील पालिकेने दिली आहे.
ठाणे शहरात एकूण चार हजार २९७ धोकादायक इमारती असुन यामध्ये ८६ इमारती या अतिधोकादायक अर्थात ‘सी - १’ गटातील आहेत. या अतिधोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने या इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित होण्याची नोटीस बजावून अशा इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे.

मान्सूनला काही दिवसांतच सुरूवात होणार असून पावसाळ्यात शहरातील अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न भेडसावत असतो. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. या अनुषगाने महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यातील ३३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये एकूण ४७४ कुटुंब राहत आहेत. या ४९ अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले असून या इमारत अतिधोकादायक असल्याचे फलक, नोटिसा देण्यात आल्या आहेत.

चार इमारती निष्कासित करणार

ठाणे शहरातील अनेक भागात अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतीचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय असतो. मागील काही वर्षात प्रामुख्याने पावसाळ्यात इमारती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने इमारती रिकामा करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. तर पालिका हद्दीतील एकूण ४ इमारती पूर्ण निष्कासित करण्यात येणार असून नौपाडा येथील २ तर मुंब्रा परिसरातील २ अतिधोकादायक इमारती पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभाग समितीनिहाय आकडेवारी

प्रभागसमिती - अतिधोकादायक इमारती - रिकाम्या केलेल्या इमारती
नौपाडा-कोपरी - ५२ - १७
वागळे - ० - ०
लोकमान्य - ६ - ६
वर्तकनगर - २ - १
माजीवडा- मानपाडा ९ - ४
उथळसर - ७ - १
कळवा - ४ - २
मुंबा - ६ - २
दिवा - ० - ०


Powered By Sangraha 9.0