साक्षी हत्याकांडामध्ये वापरलेला सुरा दिल्ली पोलिसांच्या हाती

02 Jun 2023 19:06:28
Sakshi Murder Case Delhi Police

नवी दिल्ली
: दिल्ली पोलिसांनी साक्षी हत्याकांडामध्ये वापरलेला सुरा दिल्ली पोलिसांना सापडला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने मारेकरी साहिल खान याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.

उत्तर पश्चिम दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील साक्षी हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. साक्षीच्या हत्येमध्ये साहिल खानने वापरलेला सुरा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी जप्त केला आहे. साहिलच्या चौकशीमध्ये त्याने हत्येसाठी वापरलेला सुरा कोठे फेकला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी या घटनेबाबत सतत आपले वक्तव्य बदलत असून त्याचीही पडताळणी करणे आवश्यक आहे. मृत साक्षीचे तीन मित्र भावना, अजय उर्फ झाब्रू आणि नीतू यांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये तिघांचे जबाब पोलिसांनी पडताळून पाहिले असता ते एकमेकांशी जुळत असल्याचे दिसून आले आहे.

त्याचप्रमाणे मयत साक्षी, मारेकरी साहिल आणि त्यांच्या मित्रासह पाच जणांच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे पोलिस चौकशी करत आहेत. यात साहिलच्या दोन मित्रांचाही सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



Powered By Sangraha 9.0