जयंत सहस्रबुद्धेंना सरसंघचालकांनी वाहिली श्रद्धांजली

    02-Jun-2023
Total Views | 192
MohanBhagwat Tribute to Jayant Sahasrabuddhe

नागपूर
: विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते. ते ५७ वर्षांचे होते. सहस्रबुद्धे यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शोक व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, "जयंत सहस्रबुद्धे यांच्या निधनाची अत्यंत दु:खद बातमी तृतीय वर्षाच्या दीक्षांत समारंभाच्या समारोपानंतर मिळाली. अचानक लागलेल्या धक्क्याने आम्ही सर्वच स्तब्ध झालो आहोत. शून्य झालो आहोत. बरोबर नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांच्या तब्येतीत झालेल्या खात्रीशीर प्रगतीची बातमी आनंददायी होती. एक-दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ते पुन्हा एकदा हळूहळू त्यांचा सहवास आपल्या कार्यकर्त्यांना देऊ शकतील, असे आम्हा सर्वांना वाटत होते."

"डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत होते. घरातील सदस्यांचे सेवा करण्याचे कार्य सुरूच होते. स्थानिक स्वयंसेवकांचेही सहकार्य वेळोवेळी मिळत होते. मात्र देशभरातील कार्यकर्त्यांची प्रार्थना होत असूनही उलटच घडले. आठवडाभरात प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी आज अचानक निजधामकडे प्रस्थान केले. आपल्या सर्वांचे, विज्ञान भारतीच्या हजारो कार्यकर्त्यांचे आणि विशेषत: त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन कसे करायचे? नियतीचा हा क्रूर खेळ विधिलिखित आहे.", असेही ते म्हणाले.

"हे ठाऊक असूनही मन ते समजायला तयार नाही. परंतु त्यावर उपायही काही नाही. त्यांची कार्यक्षमता, नेतृत्व क्षमता, गोड स्वभाव, स्मितहास्य, सुंदर गायन आणि स्मृतीतून प्रेरणा घेऊन पुढे आपले कर्तव्य बजावणे हे विहित आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना करत मी माझ्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस श्रध्दांजली अर्पण करतो.", असे म्हणत त्यांनी आदरांजली अर्पण केली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121