पुण्याच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील तीन राजकीय पक्षांमध्ये विसंवाद सुरू झाला आहे. मुळातच शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी घडत असतात. महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर या पक्षाचे प्रमुख नेते परस्पर विरोधी वक्तव्य करताना अनेकदा दिसून येतात. त्यातच पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरूनदेखील तीन पक्षातील नेत्यांनी तीन वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्यामुळे बाह्यस्वरूपी हे तीन पक्ष आणि एक विचाराने आणि एकदिलाने काम करीत असल्याचे जरी भासवित असले, तरीदेखील त्यांच्यामध्ये सुसंवाद नसल्याचे स्पष्ट होते आहे. जनतेची दिशाभूल करून तीन पक्षात सुसंवाद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न किती फोल आहेत, हे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्टपणे दिसते. नुकतेच अजित पवार यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून विरोधी पक्षांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडली. त्यांनी नव्या संसद भवनाचे निर्माण असे स्वागत केले. त्याचवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून त्यावर टीका केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकींमुळे या तीन पक्षांची आघाडी येत्या निवडणुकीत बिघाडीचे स्वरूप धारण करते की काय, असे चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे या तीन पक्षांची आघाडी ही येत्या काळात भाजपला कितपत टक्कर देऊ शकेल, असा प्रश्न आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत अपघाताने मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडी हुरळून गेलेली आहे. मात्र, महाविकास आघाडीला भविष्यात हाच अतिआत्मविश्वास नडणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले संघटनात्मक काम आणखी मजबूत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नऊ वर्षांतील कामांमुळे जनतेचा पाठिंबा लाभतो आहे. त्यामुळे सैरभैर झालेले विरोधक उसने अवसान आणून एकत्र लढण्याची भाषा करीत आहेत. परंतु, विसंवादाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. हाच विसंवाद महाविकास आघाडीची घडी भविष्यात विस्कटवणार, हे नक्की!
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. परंतु, याच माध्यमांनी घेतलेली विरोधी विचारांची भूमिका त्यांच्याच अंगलट येऊ पाहत आहे. त्याचे कारण असे की, शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत हे एका वृत्तवाहिनीच्या माईकवर (किंवा बाजूला) थुंकल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झालेली आहे. एका वृत्तवाहिनीच्या बातमीदाराने आमदार संजय शिरसाठ यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर राऊत यांनी माईकच्या शेजारीच थुंकत शिरसाठ यांना ओळखत नसल्याचे वक्तव्य केले. शिरसाठ यांच्याविषयी टीका करण्याला हरकत नाही. परंतु, एका माध्यमाच्या माईकवर थुंकताना त्यांना काहीच वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. राऊत स्वतःला पत्रकार म्हणवतात. अनेक अग्रलेख त्यांनी लिहिलेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी कामही केले आहे. राऊतांचा मुखडा पाहिल्याशिवाय अनेक वृत्तवाहिन्यांचा दिवस सुरू होत नाही. अशा स्थितीत त्यांच्या या कृतीचा एकाही वृत्तवाहिनीने साधा निषेध व्यक्त केला नाही. आपला ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी अनेकदा माध्यमांनीदेखील सोयीस्कर भूमिका घेतलेली आहे. संभाजी भिडे गुरुजी असोत किंवा रामदेव बाबा असोत किंवा अन्य कोणी राष्ट्रीय विचारांच्या व्यक्ती असोत, माध्यमांनी त्यांची छोटीशी चूक पकडूनदेखील त्यावरून गदारोळ माजवला. परंतु, संजय राऊत यांनी आजवर वापरलेली अभद्र भाषा, बोलण्यामध्ये अनेकदा वापरलेले आक्षेपार्ह शब्द याकडे माध्यमांनी सोयीस्कररित्या कायमच दुर्लक्ष केले. कहर म्हणजे ते वृत्तवाहिनीच्या माईकवर थुंकल्यावरदेखील त्याची प्रतिक्रिया माध्यमांमधून येत नाही हे अत्यंत आश्चर्यजनक आहे. संजय राऊत यांच्या जागी जर भाजपचा किंवा संघ परिवारातील किंवा कोणीही राष्ट्रीय विचारांचा एखादा व्यक्ती असता, तर याच माध्यमांनी किती गदारोळ माजवला असता, हे काही वेगळे सांगायला नको. माध्यमांची हीच सोयीस्कर भूमिका त्यांच्या अंगलट येणार आहे. माध्यमे एका विचारधारेच्या लोकांना झोडपून काढत असताना, दुसरीकडे मात्र सपशेल दुबळी भूमिका घेतात. त्यामुळेच मग राऊतांसारख्या लोकांचे अधिक फावते. म्हणूनच माध्यमांनी असा अपमान पचवून न घेता, त्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाच पाहिजे.
लक्ष्मण मोरे