मृत्यूनेही जीवनगाणे गावे...

19 Jun 2023 21:47:28
Article On Dr Komal Rajeev Aher

भूतलावर दररोज करोडो जीव जगतात आणि मरतात. मात्र, आज अखंड मानवजातीचे प्रेरणास्थान ठरेल असे डॉ. कोमल राजीव आहेर या नाशिकच्या सुकन्येचे जगणे. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा...

तुम्ही रक्तदान करा. रक्तदान केले, तर तुमच्यामुळे कुणाचे तरी प्राण वाचतील,’ असे म्हणून कोमल कोरोना काळात रक्तदात्यांची सूची बनवून त्यांच्याशी संपर्क करायच्या. कोरोना काळात ‘लॉकडाऊनमुळे लोकं घराबाहेर पडायची नाहीत. रक्तदान करायलाही सहजासहजी कुणी तयार होत नसे. रक्ताचा तुटवडा शिगेला होता. त्यामुळे ठरावीक कालावधीत रक्त पुरवठा करणे, आवश्यक आहे, अशा थॅलेसेमियाच्या रुग्णांची परिस्थिती खूपच बिकट झाली. त्यातच ‘निगेटिव्ह’ किंवा ‘एबी’ वगैरे रक्तगट असणार्‍यांची संख्या कमीच. त्यामुळे या रक्तगटाची उपलब्धताही कमी. कोरोना काळात अशा रक्तगटाच्या रक्तदात्यांची सूची करून त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करून तशी व्यवस्था उपलब्ध करून देणे, संचयित केलेले रक्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे, हे मोठे आव्हानात्मक काम.

हे काम डॉ. कोमल राजीव आहेर यांनी केले. त्याच काळात थॅलेसेमियाच्या रुग्णांच्या उपचारासाठीच्या केंद्रामध्येही खूपच गर्दी व्हायची. कारण, रक्तदात्यांचा अभाव. अशावेळी रुग्णांची सूची तयार करून ज्यांना तातडीने गरज आहे, त्यांच्यावर उपचार करून बाकीच्यांना नंतरची तारीख देणे, तशी सोय करणे, हे सुद्धा काम डॉ. कोमल आहेर यांनी केले, तर अशा कोमल जेव्हा डॉक्टर झाल्या, तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या माता-पिता राजीव आहेर आणि संध्या आहेर यांच्यासाठी हा क्षण म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतका सामर्थ्यशील होता. अनिश्चित क्षणांतही सातत्याने केलेल्या कष्टांचा आणि भोगलेल्या वेदनांना आशेची आणि नव्या उमेदीची शाश्वत जाणीव करून देणारा होता. सध्या कोमल ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड हेल्थ केअर’मध्ये एमबीए, ‘इमर्जन्सी मेडिसिन’ विषयात ‘डिप्लोमा’चे शिक्षण घेत आहेत.

आता कोमल आहेर ‘बीएएमएस’ झाल्या किंवा मॅनेजमेंट करते किंवा डिप्लोमा करतात, मग त्याचे काय अप्रूप? असे वाचून कुणालाही वाटू शकते. पण, ”सांगा कसे जगायचे? रडत कुढत चिंतेच्या ज्वाळात जळत? सांगा कसे जगायचे?” असे म्हणत आयुष्यातील असलेल्या-नसलेल्या दु:खांबद्दल भाराभर चिंतन आणि चिंता करत सदैव निराशाग्रस्त जीवन जगणारे पावलोपावली दिसतील. मात्र, कायमस्वरूपी यातनांना आणि समस्यांनाही ‘चले जाव’ म्हणत प्रचंड संघर्षातही चेहर्‍यावरचे हसू न पुसले गेलेले आयुष्य जगणारे कमी आहेत. त्यापैकी एक डॉ. कोमल आहेर.

मूळचे वडनेर भैरव गाव, चांदवड तालुक्यातले. राजीव आहेर आणि संध्या या सुसंपन्न आणि सुसंस्कृत दाम्पत्याला दोन मुले. त्यापैकी एक कोमल. कामानिमित्त आहेर दाम्पत्य नाशिकला स्थायिक झाले. कोमल जेव्हा सहा महिन्यांची होती, तेव्हा राजीव आणि संध्याला कळले की, कोमल थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त आहे. साधारण दशकापूर्वीचा काळ. थॅलेसेमियाबद्दल २४ वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा थॅलेसेमियासंदर्भात जास्त जागृती नव्हतीच. पण, राजीव आणि संध्या या दाम्पत्याने ठरवले की, लेकीला कसलीच उणीव भासू द्यायची नाही. ती चारचौघांसारखेच जगेल आणि आयुष्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करेल.

राजीव आणि संध्या यांचा निर्धार होता आणि त्याला जीवाच्या आकांताने साथ दिली ती कोमलने. थॅलेसेमिया म्हणजे काय, हे लहानपणी ठाऊक नव्हते. मात्र, जसजशी समज वाढत गेली, तेव्हा कोमल यांना जाणवू लागले की, आपल्या इतर मैत्रिणींपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत. आपल्यालाच का हे सगळं? आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, असे कुठेतरी कमी वाटू लागायचे. कधी वेदनेला अंतच नाही की, काय वाटायचे. त्यावेळी कोमलच्या आजी कोमलला म्हणत, “आजचा दिवस संपेल. उद्या नवा सूर्य उगवेल. मग बघ हे काही नसेल. सगळं चांगलं होईल. उद्या चांगला दिवस असेल. उद्या वेदनांचा-दु:खांचा अंत असेल.” या आशेवर लहानग्या कोमल निश्चितपणे आजीच्या मांडीवर झोपी जात. या सगळ्या काळात कोमल यांनी थॅलेसेमियाच्या रुग्णांची परिस्थिती जवळून पाहिली होती. बहुसंख्यांना थॅलेसेमिया आजाराबद्दल जागृती नाही. थॅलेसेमियावर कुठे, कसे उपचार करायचे, याची माहिती नसल्यामुळेच अनेक रुग्ण हकनाक बळी जात होते. तेव्हाच त्यांनी ठरवले की, आपण डॉक्टर व्हायचे. ज्यांना थॅलेसेमिया आजार म्हणजे काय माहिती आहे, त्यांना डॉ. कोमल यांच्या निर्णयाचे महत्त्व आणि प्रत्यक्ष कोमल यांची लढाऊ वृत्ती जाणवल्याशिवाय राहणार नाही.

पुढे त्यांना ‘बीएएमएस’ला प्रवेश मिळाला. त्या डॉक्टरही झाल्या. हे सगळे लिहिणे तसे सोपे आहे. मात्र, त्यांना दर १५ दिवसांनी शरीरात रक्तपुरवठा करावा लागतो. त्यानुसार होणार्‍या परिणामांना सामोरे जावे लागते. अशावेळी डॉक्टर होणे आणि आपल्यासारख्याच इतर थॅलेसेमिया रुग्णांसाठी काम करणे हे गौरवशील आहे. यापुढच्या काळात कोमल यांना थॅलेसेमिया रुग्णांसाठी केंद्र निर्माण करायचे आहे. जिथे त्या गरजूंसाठी विनामूल्य उपचार करू शकतील. तसेच, कारण वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांचे अपत्य थॅलेसेमियाचे रुग्ण होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थॅलेसेमियाचा प्रसार रोखण्यासाठी विवाहापूर्वीच भावी वधू-वरांनी आपली रक्तचाचणी करून घ्यावी. यासाठीची जागृती डॉ. कोमल करतात. कोमल यांच्यासारख्या सुकन्या या केवळ एका कुटुंबाच्या किंवा समाजाच्या सुकन्या नसतात, तर अवघ्या मानवजातीला प्रेरणा देणार्‍या त्या दीपस्तंभ असतात, नव्हे डॉ. कोमल यांचे जीवन म्हणजे मृत्यूनेही जीवनगाणे गात राहावे असेच आहे.

९५९४९६९६३८


Powered By Sangraha 9.0