जिजाऊ

17 Jun 2023 11:41:31
 
आपल्या जीवनाचा उद्देश काय असतो? जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण हरवून जाऊ नये यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो, प्रतिष्ठा प्रसिद्धीसाठी झटत असतो. अमर व्हायचं असत आपल्याला. परंतु आपले वेगळे विचार, सामाजिक स्थितीतील त्रुटींना दिलेली धडक आणि अनेकांच्या आशीर्वादातून कमावलेलं नाव म्हणजे शिवाजी महाराज. अर्थात, राज्य घडवण्यापेक्षा राजा घडवणं हे कठीण काम. पतीच्या सोबतीशिवाय एकहाती स्वराज्याच्या मूलमंत्र शिवाजी राजांना देणाऱ्या या जिजाऊ म्हणजे तुळजाईनंतरच महाराष्ट्राचं दुसरं दैवत. त्यांची आज पुण्यतिथी. जिजाऊ आणि शिवबाचं नातं नव्हे तर व्यक्ती म्हणून जिजाऊ कशा होत्या हे या लेखातून आपण समजून घेऊ.
 
 
jiu
 
देवगिरीचे यादव आपल्याला माहिती आहेत, जिजाऊंचे मूळ तिथलेच, काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जाधव हा यादव या आडनावाचा अपभ्रंश आहे. म्हाळसा देवी आणि लखुजीराजे जाधव यांच्या जिजाऊ कन्या. दौलताबाद येथे शहाजी राजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पुढे हत्तीसारख्या क्षुल्लक कारणावरून जाधव आणि भोसले घराण्यात वाद झाले. यावेळी जिजाऊंनी आपल्या माहेच्यासोबत संबंध पूर्णपणे तोडून टाकले. त्यांच्या वर्तवणुकीतली ही निष्ठा आणि कर्तव्याची जण पुढे शिवाजी महाराजांच्या आयुष्याला प्रकाश देते. आपल्याच माहेच्या माणसांनी मारल्यामुळे आपल्या पतीचे भाऊ संभाजी स्वर्गवासी झाले, त्यांचेच नाव त्यांनी आपल्या प्रथम पुत्राला दिले. त्यानंतर त्यांना अजून ४ पुत्ररत्ने झाली परंतु ती जगली नाहीत. त्यानंतर शिवनेरीवर शिवाजी राजे झाले. शंभूला वडील शहाजी राजांकडे देऊन त्या महाराष्ट्रात परतल्या. शिवाजी राजे घडवले, स्वराज्याचे बीज आपल्या पुत्राच्या मनात रोपले, संस्कार आणि बळ देऊन त्या बीजाचे संगोपन केले. प्रसंगी राजकारणाचेही धडे त्यांना दिले. मदतीला विश्वासू माणसे होती, स्वराज्य झाले! ही जिजाऊंचीच इच्छा, त्यांचाच अट्टाहास आणि संपूर्ण महाराष्ट्र देशाचा सन्मान.
 
शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. काही विश्वासू माणसांसोबत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन राहिले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, अशा अनेक पराक्रमी पुरुषांची गोष्टींतून ओळख करून दिली. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
 
पुण्यात त्यांनी सांस्कृतिक विकासाचेही व्रत घेतले. पुण्याचा कायापालट केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला. सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
 
आपले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून, राजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाल्यावर १७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.
Powered By Sangraha 9.0