संत ज्ञानेश्वरांनी अनुभवांच्या शिदोरीनें, निवृत्तीनाथांच्या शिकवणीने आणि जन्मजात मिळालेल्या प्रतिभेने बालवयातच उत्तम प्रतीचे साहित्य तयार केले. त्यांनी विठ्ठलावर अनेक गाथा लिहिल्या. विठ्ठल रखुमाई लिहिताना आपल्याला समजलेले विठुराया मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि माउली समजून घ्यायची धडपड त्यांच्या ओळींतून दिसून येते. विठ्ठलाप्रती असलेले आपले भाव मांडताना ज्ञानेश्वरांच्या अंतरंगाचंगे स्पषट प्रतिबिंब या पदांमध्ये पाहायला मिळते. त्यापैकी ५ पदे आणि त्यांचा अर्थ-
ज्ञानोबा लिहितात,
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥
ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात.
हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥१॥
काय करुं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्ण सुखें ॥२॥
त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरोन गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली. निवृत्तिनाथांनी त्याच्या बद्दल सांगितल्या पासुन मला काय झाले ते कळत नाही त्यांने मला व्यापुन टाकले आहे. माझे पिता व रखुमाईचा पती असलेल्या त्या सावळ्यारुपाने मला येवढे मोहित केले आहे की सेजे बाजे वर पहुडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात.
नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरिची ॥१॥
मन निवालें बिंबलें समाधान जालें । कृष्णरुपें बोधलें मन माझें ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु सांवळा सर्व घटीं । चित्तें चैतन्या मिठी घालिताखेवों ॥२॥
त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥
निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
नकळे याची गती नकळे याची लीळा । आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरीं नांदतसे ॥३॥
ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरुप देव आमच्या घरी आहे. तो निर्गुणपणात उभा राहुन सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे. त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहळे भोगतो आहे. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे.
निजगुजा गूज तो । मोहना मोहन तो गे बाई ॥१॥
बोधा बोध बोधविता तो । द्वैता-द्वैत अद्वैत तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । सर्वादि सर्वेश्वरु तो गे बाई ॥२॥
तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे.सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.