संपूर्ण समाजाचे निर्मल वारी अभियान - डोळस निर्मिती

    17-Jun-2023
Total Views |
Nirmal Wari Abhiyan

आज ‘निर्मल वारी’ या प्रकल्पाला कोरोनातील दोन वर्षे सोडली, तर सात वर्षे सलग गती मिळाली आहे. वारकर्‍यांना सुद्धा आता याविषयी फारसे काही सांगावे लागत नाही. याबाबत समाज प्रबोधन घडून त्यांच्या कडून चांगले सहकार्य मिळते आहे. या ‘निर्मल वारी’साठी समन्वयाची, व्यवस्थापनाची भूमिका आजही ‘सेवा सहयोग’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिरीरीने करत आहे. त्यानिमित्ताने ‘निर्मल वारी’चा संकल्पनेपासून ते यशस्वितेपर्यंतच्या प्रवासाचा, अनुभवांना शब्दबद्ध करणारा हा लेख...


आषाढ महिन्यातील एकादशीसाठी आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या म्हणजे आनंद सोहळाच. लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठोबाच्या दर्शनाला पायी निघालेले वारकरी, त्यांच्या दिंड्या यातून भक्तिमय वातावरण असते. अशाच वातावरणात एकदा माझी आत्या प्रथमच वारीसाठी गेली होती, तिला भेटायला मी सासवड मुक्कामी गेलो होतो. सासवडला पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम असल्यामुळे दुसर्‍या दिवशी मी गेलो असता, सासवडमधील परिस्थिती भयंकर होती. शौचालय नसल्यामुळे लोकांना उघड्यावरच शौचाला जावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य होते. ते सर्व पाहिल्यावर मनात असंख्य विचार येत होते, शेकडो वर्षे वारकरी वारीला जात आहेत, पण हा प्रश्न का सुटला नसेल, असा विचार स्वस्थ बसू देत नव्हता आणि तिथून परत येतानाच यासाठी काहीतरी करायचे, असे मनाशी ठाम ठरवले होते.

‘स्वच्छ भारत अभियान’

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केल्यावर आपल्याला वारीसाठी ‘स्वच्छ भारत अभियाना’चा उपयोग करता येईल, असे जाणवले. त्याच दरम्यान वारीवर उच्च न्यायालयाने निर्बंध घालावेत, अशा स्वरूपाच्या केसेस पर्यावरणवादी लोकांनी ‘ओपन डेफिनेशन’मुळे केल्या होत्या. त्यामुळे तातडीच्या कार्यवाहीची गरज होती..
 
पूर्वतयारी

वारीला खंड तर पडू द्यायचा नाही आणि प्रश्न तर सोडवायचा आहे, हे लक्षात घेऊन मी घेतलेल्या शिक्षणाचा, सध्या करत असलेल्या नोकरीतील कामाचा, व्यवस्थापनाचा, प्रोजेक्टच्या पूर्वतयारीच्या कामासाठी काय कार्य करतो, त्या सर्वांचा प्राथमिक उपयोग करता आला.मी ‘निर्मलवारी’ अभियानाची प्रोजेक्टची ब्ल्यू प्रिंट तयार केली. यासाठी कोणते शौचालय उपयोगी होतील, ते कसे वापरता येतील? पाणी, वीज, स्वच्छता कशी करता येतील, कोणत्या सर्व्हिसेस घ्याव्यात? यासाठी ‘सेवा सहयोग’ सोबत चर्चा केली, आणि काम सुरू झाले.पर्यावरणविषयक केसेस असल्यामुळे तसेच, तेव्हा प्रकाशजी जावडेकर पर्यावरण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते. त्यांना ई-मेल पाठवले की, वारी संदर्भात काहीतरी करणे गरजेचे आहे . ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार आहे, तुमची वेळ हवी आहे. त्याच दिवशी त्यांचा प्रतिसाद आला. पुण्यामध्ये असताना त्यांनी भेटायला वेळ दिली. त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितले, “हा राज्याचा विषय आहे आणि तुमचे मॉडेल खूप छान आहे. तुम्ही यावर्षी ‘पायलट’ करा, मी जी लागेल ती मदत करतो.” यामुळे हुरूप वाढला. पुढे याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही काम करत आहे, असे कळले. त्या संदर्भात प्रदीपदादा रावत, शिवाजीराव मोरे, अतुलजी लिमये काम करत होते. त्यांना जाऊन भेटलो. ‘सेवा सहयोग’ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य संस्थांनी बरोबर काम करायचे ठरले. आम्ही चक्क ‘पोर्टेबल टॉयलेट’ बघायला काही प्रमुख मंडळी गेलो होतो.
 
 
 
‘पायलट’ प्रोजेक्ट


सर्वांना प्रोजेक्ट फार आवडला. ‘टॉयलेट सर्व्हिस’ कल्पना तेव्हा नवीन होती. लोणी आणि यवतमध्ये २०१५ ला ‘पायलट प्रोजेक्ट’ करायचे ठरले.वारकरी शौचालय वापरतील का? गावकरी कसा प्रतिसाद देतील? स्वयंसेवक कसे मदत करतील? असे प्रश्न अनेकांना पडले होते. मी मात्र उत्तरावर ठाम होतो. देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे सुद्धा अत्यंत सकारात्मक होते.२०१५ मध्ये लोणीचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. वारकर्‍यांनी नुसते शौचालय वापरले नाही, तर ते स्वच्छ करण्यासाठी पण मदत केली. अनेक स्वयंसेवक रात्रभर या शौचालयाचा वापर करा, अशी विनंती करत होते. ‘टॉयलेट सर्व्हिस’ मॉडेल पण छान चालले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोणी गावचे ग्रामस्थ न्याहारी घेऊन शौचालय जिथे उभारले होते, त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सांगितले, पूर्वी वारी झाल्यावर १५-२० दिवस या भागात येता येत नव्हते, आज आम्ही इथे न्याहारी घेऊन आलो आहोत. तुम्ही आमचे गाव स्वच्छ ठेवायला मदत केली आहे, इथून पुढे आम्ही तुम्हाला या कामासाठी मदत करू. यवतमध्ये असाच चांगला अनुभव आला, यावरून पंढरपूरचे मुक्कामी ‘पोर्टेबल टॉयलेट’ची सुविधा करण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ठरवले. ’सेवा सहयोग’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पंढरपूरला जाण्याची तयारी केली आणि पंढरपूरमधला ‘निर्मल वारी ’अभियानाचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.२०१६ मध्ये हा प्रयोग कुठे करावा, अशी चर्चा सुरू असताना ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावरील सर्व मुक्कामांवर करावा असे ठरवले.

‘टॉयलेट सर्व्हिस’ मॉडेल


‘सेवा सहयोग‘च्या टीम बरोबर मी आणि शिवाजीराव मोरे महाराज सर्व पालखी मुक्कामांचे सर्वे केले. त्यातून अनेक कार्यकर्ते जोडले गेले. ‘सेवा सहयोग’ने केलेला ‘पायलट’ उपक्रम महाराष्ट्र शासनाने घ्यावा आणि करावा आम्ही लागेल, ती मदत करू यासाठी अनेक बैठका झाल्या. तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ श्रीकांत भारतीय यांनी खूप प्रयत्न घेतले. अंतिमतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्सेप्शनल केस’ म्हणून या प्रोजेक्टचे फंडिंग मंजूर केले. शासनाने व्यवस्था उभा केल्या. ‘सेवा सहयोग’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी वारकर्‍यांचे प्रबोधन आणि शासकीय कंत्राट दारांवर देखरेख केली.२०१६ला ज्ञानेश्वर महाराजांच्या १४ पालखी मुक्कामावर आणि तुकाराम महाराजांच्या १७ पालखी मुक्कामांवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखली गेली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची जबाबदारी संतोष दाभाडे यांनी घेतली. त्यांना राजाभाऊ माने, निलेश देशपांडे यांनी मदत केली, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची जबाबदारी माऊली कुडले किरण ढमढेरे यांनी घेतली पंढरपूरसाठी संदीप जाधव, शिवाजीराव मोरे महाराज हे स्वतः वाळवंटात उभे राहिले.

खळखळा ओतल्या मोहरा...


२०१६ला मोठ्या प्रमाणात ’निर्मल वारी‘ अभियानाचे कौतुक झाले. २०१७ला अर्थमंत्रालयातूनच फोन आला ‘निर्मल वारी’ अभियानासाठी किती तरतूद लागणार आहे आणि मी थक्क झालो. ‘खळखळा ओतल्या मोहरा, त्याची मोजून पावती करा,’ या गाण्याच्या ओळी माझ्या डोळ्यांसमोरच चमकल्या. २०१७च्या अर्थसंकल्पातच ‘निर्मल वारी’ अभियानाची तरतूद झाली होती.हा प्रवास थक्क करणारा होता. माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाचे सरकार दरबारी असलेले साधे कामसुद्धा दोन-चार चकरा मारल्याशिवाय व्हायचे नाही येथे, तर पूर्ण ‘निर्मल वारी’ प्रकल्प राज्य सरकारने स्वतःचा म्हणून दुसर्‍याच वर्षी स्वीकारला होता. तिसर्‍या वर्षी कुठल्याही एका खात्याच्या अखत्यारीत येणार नाही, म्हणून त्याची बजेटमध्येच तरतूद करण्यात आली होती.२०१७ मध्ये प्रत्येक गावात अनेक स्वयंसेवकांनी ‘निर्मल वारी’ अभियान यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. वाळवंटामध्ये जिथे विष्ठेचा सडा पडत होता, तिथे रांगोळीचा सडा घातला गेला. अनेक लोकांनी आशीर्वाद दिले. विविध प्रक्रिया आल्या. महिला वर्ग विशेष करून कौतुक करत होता. खूप मोठी सुविधा निर्माण झाली होती.

’सेवा परमो धर्म:’ याची पदोपदी प्रचिती येत आहे. रामकृष्ण हरी !
 
 
 
-नरेंद्र वैशंपायन