कांदिवलीच्या शाळेतून आता स्कूल जिहाद ?; प्रार्थनेवेळी अजान लावल्याने मोठा वाद

16 Jun 2023 19:24:16
playling azan at kapol vidyanidhi school in kandivali

मुंबई
: शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याच्य दुसऱ्याच दिवशी कांदिवलीतील एका शाळेत झालेल्या प्रकारामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. कांदिवलीतील कपोल विद्यालयात प्रार्थनेच्या वेळी अजान लावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून जाणूनबुझून करण्यात आल्याचा आरोप पालकांसह राजकीय पक्षांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातून मोबाईल जिहादला पाठबळ देणारी घटना उघडकीस आली होती आणि त्याला लागूनच कांदिवलीतील शाळेत अजान लावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे इतर मार्ग अवलंबिल्यानंतर कट्टरतावादासाठी शाळांच्या माध्यमातून जिहाद पसरवण्याचे प्रयत्न केले जात नाहीत ना ? असा गंभीर सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अजानमुळे सुरु झालेल्या वाद आणि शाळा प्रशासनावर आलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाकडून माफी मागण्यात आली आहे. तसेच अजान लावणाऱ्या शिक्षिकेची चौकशी करून निलंबनाची कारवाई देखील करण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पालकांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शाळेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे.

नेमका प्रकार काय ?

कांदिवलीच्या कपोल विद्यालयात शुक्रवारी नियमितपणे सकाळी शाळा सुरू झाली. नियमाप्रमाणे शालेय कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी प्रार्थनासत्र सुरू झाले आणि त्यातच एका शिक्षिकेने माईकवर फोनच्या माध्यमातून जाहीरपणे अजान लावली. शिक्षिकेने केलेल्या या वर्तनाच्या विरोधात पालकांनी आक्रमक भूमिका घेत शाळेसमोर उभा राहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शाळा प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन

शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईसह राज्यभरात या घटनेच्या विरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसले. स्थानिक राजकीय पक्षांसह भाजप आमदार योगेश सागर, शिवसेना, मनसे आणि पालकांनी केलेल्या जोरदार विरोधानंतर शाळा प्रशासनाने नमती भूमिका घेतली आहे. अजान लावण्याचा प्रकार करणाऱ्या त्या शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाच्या वतीने पालकांना देण्यात आले आहे.

इस्लामच्या प्रचारासाठी शाळेचा उपयोग होऊ देणार नाही

"शुक्रवारी सकाळी कपोल विद्यानिधी शाळेत घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. सकाळच्या सत्रात प्रार्थना करताना अजान लावण्याचे काम करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. देशात लोकशाही आहे याचा अर्थ कुणी काहीही करेल असा होत नाही. इस्लामचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी तो मदरशात जाऊन करावा. मात्र, जर इस्लामच्या प्रचारासाठी कुणी शाळेचा उपयोग करत असेल तर आम्ही होऊ देणार नाही. अजान लावणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करून तिच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.", असे भाजपचे आ. योगेश सागर म्हणाले.

Powered By Sangraha 9.0