ठाण्यात दिव्यांग व्यक्तींचा ॲपद्‌वारे सर्व्हे

16 Jun 2023 20:14:43
Thane Divyang Person Survey System

ठाणे
: ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या २१ प्रकारानुसार दिव्यांग व्यक्तींचा ॲपद्‌वारे सर्व्हे करण्याच्या उद्देशाने 'दिव्यांग व्यक्तीचे सर्व्हेक्षण प्रणाली' तयार करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

वैयक्तीक लाभाच्या दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सुलभ प्रणालीचा उपयोग होणार असून त्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींचा पूर्ण डेटाबेस एका क्लिकवर उपलब्ध होईल जेणेकरुन शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मदत होईल. दिव्यांग व्यक्तींची मागणी उपलब्ध झाल्यामुळे मागणीच्या आवश्यकतेनुसार योजना राबविण्यास प्राधान्याने महत्त्व देण्यासाठी मदत होईल.

वैयक्तीक लाभाच्या योजना अधिकाधिक दिव्यांगापर्यंत पोहचवण्यात येतील. शेवटच्या घटकापर्यंत या शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या पोहोचावा या उद्देशाने सदर प्रणाली तयार करण्यात आली आहे. यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, केंद्रचालक यांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची माहिती घेणे व योजनाची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी, योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्यात येईल. अशी माहिती समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0