नागरी सुरक्षेसाठी आधुनिक ‘त्रिनेत्र’

    14-Jun-2023
Total Views |
UP Civil Security Operation Trinetra

उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातील ‘हर घर कॅमेरा’ अन् ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ पोलीस योजनेमुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसला आहे. नकौडी खास गावाला तर ‘सीसीटीव्ही’च्या सुयोग्य कार्यन्वयनामुळे ‘गोरखपूरचे लंडन’च संबोधले जाते. तेव्हा, नेमकी ही योजना आणि त्याने गावाला प्राप्त झालेले सुरक्षाकवच याचे आकलन करणारा हा लेख...

उत्तर प्रदेशमधील नकौडी खास हे गोरखपूर शहराच्या बाहेरील भागात वसलेले एक गाव. अवघ्या दोन हजार लोकवस्तीच्या या छोट्या गावामध्ये १०३ ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांचा ‘तिसरा डोळा’ अहोरात्र गावावर नजर ठेवतो. म्हणूनच हे गाव गोरखपूरचे ‘लंडन’ असे बिरुद अभिमानाने प्रदेशात मिरवताना दिसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या या बलाढ्य गढीमधील या गावामध्ये सुमारे ९० ते ९५ टक्के भागावर कॅमेर्‍यांची नजर असल्यामुळे हे गाव केवळ चर्चेतच नाही, तर इतर गावांसाठी पथदर्शी ठरत आहे.

गावातील गृहिणी सुनीताची पहाट घराबाहेर लावलेल्या दोन ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांसमोर डोके टेकवून कृतज्ञतेने नमस्कार केल्याशिवाय उगवत नाही. याला कारणही तसेच! सुनीताच्या २१ वर्षांच्या मुलीने वर्गमित्रासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, गावात बसवलेल्या कॅमेर्‍यांमुळेच ती सापडली. एका रात्री आपली तरुण मुलगी घरी परतली नाही, तेव्हा सुनीता चिंताग्रस्त होत गावकर्‍यांसह गावचे सरपंच गुड्डू सिंग यांच्या घरी गेली. ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासण्यात आले. त्यांची मुलगी आणि तिचा प्रियकर शहर सोडण्याच्या तयारीत गोरखपूर रेल्वे स्थानकावर सापडले. जुना कृष्णधवल ‘कीपॅड फोन’ वापरणारी सुनीता आज तरुण मुलगी सहीसलामत घरी परतल्यामुळे गावातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांना देवापेक्षा कमी मानत नाही. त्यावेळी गावात केवळ २० कॅमेरे होते. आज त्यांची संख्या १०३ इतकी झाली आहे.

हे कॅमेरे पथदिव्यांचे खांब, घराच्या भिंती, गॅलरी आदी मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. त्याच्या चित्रकरणाचे ‘फुटेज’ गावाचे सरपंच गुड्डू यांच्याकडे असते. ‘सीसीटीव्ही’ बसवण्यापूर्वी विरोध करणारे ग्रामस्थ आता ज्या भागात ते नाहीत, तिथे कॅमेरे बसवण्याची मागणी करत आहेत. कॅमेर्‍यांमुळे गावात एकेकाळी वारंवार होणारे गुन्हे, सोनसाखळी, मंगळसूत्र चोरण्याच्या घटना, रस्त्यावरील मारामारी आणि पाण्याचे पंप चोरण्याचे प्रकार जवळपास संपलेच आहे. गाव गुन्हेगारीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. ‘हसत राहा; तुम्ही ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तुम्हाला बघत आहेत,’ अशा पाट्या, फलक जेव्हा गावकरी तसेच बाहेरचेही लोक बघतात, तेव्हा कोणतेही गैरकृत्य करण्याआधी ते १०० वेळा विचार करतात.

उत्तर प्रदेशात गोरखपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ आणि ‘हर घर कॅमेरा’ हे अभियान रावबत गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्यच नव्हे, तर अनुकरणीय ठरावा. गोरखपूरमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा उपक्रमामुळे चोरी, मारामार्‍या, दरोडा, अपहरण, तरुणींचे लैंगिक शोषण, ‘लव्ह जिहादी’ वृत्तीने मुलींना प्रेमाच्या नावाखाली पळवून नेणे, असे प्रकार कमी झाले आहेत. ‘ऑपरेशन त्रिनेत्र’चे यशस्वी परिणाम बघून लखनौसह इतरही शहरात हेच अभियान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक अखिल कुमार यांच्या मार्गदर्शनात गोरखपूर पोलिसांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍याद्वारे देखरेख सुरू झाली. त्याला आज एक वर्ष उलटले. दरोडा, लैंगिक छळ आणि ’चेन स्नॅचिंग’ यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालणे हा त्यामागील उद्देश होता. पोलिसांनी उपक्रमात सधन स्थानिकांची यासाठी मदत घेतली. श्रीमंत उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर आणि हॉस्पिटल मालकांना ठरावीक कॅमेर्‍यासाठी प्रायोजकत्व देण्यास प्रवृत्त केले गेले. तीन ते चार कॅमेर्‍यांसह प्रत्येक क्रॉसिंगचा खर्च अंदाजे एक लाख रुपये होता. पोलिसांच्या आवाहनाला दाद देत अनेक धनिक प्रायोजक मिळाले. त्यांना ‘त्रिनेत्र अ‍ॅम्बेसेडर’ पदवी देत पोलिसांनी पोलीस बँडपासून ते विविध शासकीय, खासगी समारंभात त्यांचा सन्मान केला. अभियान यशस्वी झाल्याने ते अगदी खेड्यापाड्यातही राबविण्याचे ठरले. त्यासाठी राज्याच्या पंचायती राज विभागाला सोबत घेण्यात आले. सुमारे सहा हजार प्रधानांनी त्यांच्या गावातून जाणार्‍या ग्रामीण रोड क्रॉसिंगवर कॅमेरे बसवण्यासाठी प्रायोजकत्व आणि एक लाख रुपये देण्याचे मान्य केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात सर्व स्तरांवर केलेल्या क्रांतिकारी सुधारणा, राबवलेले उपक्रम कार्यक्रम यामुळे उत्तर प्रदेशामधील अनेक शहरे, गावात ’अभ्युदय’ झाल्याचे चित्र आहे. या धोरणी मुख्यमंत्र्यांच्या ’झिरो टॉलरन्स’ नीतीमुळे गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये खून, बलात्कार, महिला आणि बालकांवरील अत्याचार, गुन्हे, हुंडा प्रकरणे, ’पॉस्को’ विनयभंग, ‘लव्ह जिहाद’ आदी गुन्ह्यांच्या संदर्भात जलद शिक्षा सुनावण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक शिक्षा ’आर्म अ‍ॅक्ट’च्या माध्यमातून देण्यात आल्या. १८४ गुन्हेगार पोलीस चकमकीत यमसदनी धाडले गेेले.

गेल्या तीन वर्षांत योगी आदित्यनाथ सरकारने ३० हजारांहून अधिक प्रकरणात दोषींना कडक शिक्षा केली आहे. अभियोजन संचालनयालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, २०२० ते २०२२ या दोन वर्षांत उत्तर प्रदेशात ’पॉक्सो’ कायद्यांर्तगत ४ हजार, ०७८ जणांव र कारवाई करण्यात आली तर बलात्काराच्या आरोपाखाली १ हजार, २१८, महिला आणि बालकांवरील गुन्हे अंतर्गत ८ हजार, ६४६ दोषींना कठोर शिक्षा झाल्या आहेत. खुनाच्या २ हजार, ३८७ केसेस, हुंडा आणि हुंड्यासंबंधी १ हजार, १५२, लुटमार, दरोडा १ हजार, १४१, गोवंश तस्कारी-हत्या २७९ आणि ‘आर्म्स अ‍ॅक्ट’ अन्वये १० हजार, ५२० गुन्हेगारांना शिक्षा करण्यात आली. याच काळात ‘कोविड’मुळे टाळेबंदी अन् लोकांचे बाहेरील व्यवहार कमी झालेले असतानाही गुन्हेगारांना इतक्या मोठ्या प्रमाणा शिक्षा करण्यात पोलिसांना आलेले यश, हे विशेष! गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास योगी सरकार कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे.

निल कुलकर्णी