ठाकरे गट नेत्याच्या महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाखाली कुरानचे धडे!

13 Jun 2023 12:48:53
islamic-prayer-in-malegaon-maharashtra-college-run-by-uddhav-thackeray-party-leader

नाशिक : महाराष्ट्रातील मालेगावमधील एका महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन सेमिनारच्या नावाखाली इस्लामिक धडे शिकवल्याची घटना उघडकीस आली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी संबंधित एका नेत्याचे आहे. दि. ११ जून रोजी झालेल्या या वादग्रस्त कार्यक्रमाची पोलीस चौकशी करत आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे.

हे प्रकरण मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाशी संबंधित आहे. हे महाविद्यालय उबाठा सेनेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अद्वय हिरे यांचे आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम होते. सत्य मलिक लोकसेवा ग्रुप या संस्थेतर्फे दि. ११ जून रोजी महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सेमिनारची सुरुवात अरबी भाषेतील इस्लामी मुनाजात (प्रार्थनेने) झाली. यावेळी पोस्टरवर 'पाकी आधा इमान है' आणि 'पवित्रता अर्ध इमान (अल्लाह वर विश्वास) आहे' छापण्यात आले होते. अनीस कुट्टी हे चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजाचे अनेक लोक एका हॉलमध्ये बांधलेल्या स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दरम्यान करियर मार्गदर्शन सेमिनारची सुरूवात अरबी भाषेतील इस्लामिक प्रार्थनेतून झाली. त्यामुळे ही बाब हिंदू संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी निदर्शने करत महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कारवाईची मागणी केली. हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयात असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना इस्लामकडे आकर्षित केले जात होते.
 
त्यानंतर या प्रकरणाची दखल घेतं प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांना निलंबित करण्यात आले आहे. हिंदू संघटनांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महाराष्ट्राचे खाण आणि बंदर विकास मंत्री दादा भुसे यांनीही अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर निलंबित प्राचार्य सुभाष म्हणाले की, वक्त्यांनी इस्लामिक प्रार्थनेनंतर सभेला संबोधित केले होते. त्यामुळे ज्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता, ती अनेकदा इस्लामिक प्रार्थनेने कार्यक्रम सुरू करते.


Powered By Sangraha 9.0