जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुख नियुक्तीची भरती अर्ज प्रक्रिया सुरू

13 Jun 2023 18:14:06
Kalyan Zilla Parishad School

कल्याण
: महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. केंद्रप्रमुख पदासाठी संपूर्ण राज्यामध्ये २३८४ जागा भरण्यात येणार आहेत. मात्र यंदाच्या वर्षी केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरताना उमेदवार हा पदवी परिक्षा किमान पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही ५० वर्ष ठेवण्यात आली आहे. या दोन्ही अटी यंदा पहिल्यांदाच ठेवण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत जूनच्या शेवटच्या आठवडय़ात केंद्रप्रमुख विभागीय मर्यादीत स्पर्धा परिक्षा राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमदेवारांकडून ६ जून २०२३ ते १५ जून २०२३ या कालवधीत अर्ज मागविण्यात आले आहे. ही प्रक्रिया सरलसेवेद्वारे केली जाते. या भरती प्रक्रियेसाठी फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक परिक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. यापूर्वीची केंद्रप्रमुख पदांसाठीची भरती प्रक्रिया २०१४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या पदांसाठीची भरती आता २०२३ मध्ये काढण्यात आली आहे.

दरम्यान, या परिक्षेसाठी उमेदवार हा पदवी परिक्षेत किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे. शिवाय उमदेवारांचे वय पन्नास वर्षाहून अधिक असू नये या दोन अटीमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही शिक्षकांना पदवीला पन्नास टक्कयांहून कमी गुण मिळालेले आहेत. तर काहींना पदवी परिक्षेला पन्नास टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले आहेत. परंतु त्यांची वयोमर्यादा ही पन्नास हून अधिक आहे. त्यामुळे त्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. संपूर्ण राज्यातून २३८४ पदे भरण्यात येणार आहेत. तर फक्त ठाणे जिल्ह्यातून या केंद्रप्रमुख पदांसाठी ४५ पदे भरण्यात येणार आहेत. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे नेमके कि ती अर्ज प्राप्त झाले आहेत हे निश्चित सांगता येणार नसल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली.

केंद्रप्रमुख काय काम करतो

जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचा एक गट तयार केलेला असतो. केंद्रप्रमुख हा तालुका आणि शाळा यांच्यातील दुवा असतो. तालुक्यांतून आलेली माहिती शाळांर्पयत पोहोचविणे आणि शाळांची माहिती तालुक्यार्पयत पोहोचविण्याचे काम केंद्रप्रमुख करतो. शिक्षकांच्या समस्या दूर करणे, आदर्श पाठांचा नमुना दाखविणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, उद्बबोधन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे इत्यादी कामे करीत असतो.

केंद्रप्रमुख पदांसाठी निवड झाल्याने होणारे फायदे

शिक्षकांची केंद्रप्रमुख पदांसाठी निवड झाल्याने त्याला वेतनवाढ मिळते. विस्तार अधिकारी प्रमुख पद मिळविता येते.
Powered By Sangraha 9.0