भारत-युएईमध्ये बिगर पेट्रोलियम क्षेत्रात १०० अब्ज डॉलर्सचा व्यापार!

13 Jun 2023 16:26:37
100 billion dollar trade between India and UAE


नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि भारत यांच्यामध्ये २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरचा बिगर-पेट्रोलियम उत्पादनांचा द्विपक्षीय व्यापार वाढवण्यास सहमती झाली आहे.
 
गोयल म्हणाले की, "संयुक्त अरब अमिराती आणि आम्ही द्विपक्षीय व्यापारात केवळ पेट्रोलियम उत्पादनांऐवजी नॉन-पेट्रोलियम उत्पादनांचा व्यापार करण्यास सहमती दर्शविली आहे. आम्ही पुढील सात वर्षांत आयात वाढवून १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे मान्य केले आहे,". व्यापक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर यूएईचे परराष्ट्र व्यापार मंत्री थानी बिन अहमद अल झेयुदी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.
 
यूएईकडून भारत प्रामुख्याने पेट्रोलियम क्रूड आणि पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. दोन्ही देशामध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशाना फायदा झाला आहे. २०२२-२३ दरम्यान यूएई भारताचा चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणून समोर आला आहे.
 
२०२२-२३ च्या आर्थिक वर्षात, यूएईमधून भारतात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआई) ३.३५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक तिप्पट आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात यूएईमधून भारतात थेट परकीय गुंतवणूक १.०३ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी झाली होती. 
Powered By Sangraha 9.0