...अमिट बलाच्या आधारावर लाख झुंजवू रणे!

11 Jun 2023 15:38:13
article on Jayantrao

एका दुर्दैवी अपघातात जयंतराव जबर जखमी झाले, तरीही काळाशी लढाई सुरू ठेवली. ‘कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, अमिट बलाच्या आधारावर लाख झुंजवू रणे’ ही गीतपंक्ती जणू त्यांच्यासाठीच लिहिली असावी, असे वाटत असतानाच अखेर काळाचा विजय झाला.

माझा जयंतरावांचा पहिला परिचय १९८९ मध्ये ठाणे येथे झालेल्या प्रथम वर्षाच्या वर्गात झाला. जयंतराव माझे गणशिक्षक होते, पण पुढेही तेच मार्गदर्शक राहणार आहेत, हे त्यावेळी माहिती नव्हते. वर्ग सुरू झाल्यानंतर सुमारे आठ-दहा दिवसांनंतर अचानक एकेदिवशी ते वर्गात दिसले नाहीत. नंतर कळले की, त्यांचा पदव्युत्तर अखेरच्या वर्षाचा (बीएस्सी टेक) एक पेपर काही कारणास्तव पुढे ढकलला होता. तो पेपर देण्यासाठी ते वर्गातून बाहेर गेले होते. वर्गाच्या धबडग्यात त्यांनी अभ्यास कधी केला कोण जाणे? विशेषतः या वर्गात सुमारे ५७५ उपस्थिती होती आणि डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षामुळे या वर्गात फक्त व्यवसायी/विद्यार्थी शिक्षक होते. प्रचारक जवळपास नव्हतेच. असे असूनही त्यांनी त्या विषयात प्रावीण्य मिळवले. त्यांच्या बुद्धिमत्तेची ही मला झालेली पहिली ओळख होती. वर्गामध्ये त्यांनी शिकवलेल्या ’आज श्रद्धासुमन अर्पित......

युगपुरुष शत शत नमन’ तसेच ’हिंदुत्व विश्वमंत्र देऊ नव्या युगाला’ या गीतांवरून त्यांचा सुरेल आवाज आणि संगीताचा अभ्यास लक्षात येत होता. या वर्गानंतर मात्र जयंतरावांच्या आवाजात गीत ऐकण्याची संधी मिळाली नाही आणि यापुढे कधीच मिळणार नाही.नंतर १९९४ मध्ये झालेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या प्रथम द्वितीय वर्गात ते मुख्यशिक्षक होते. या वर्गात खूप चांगली शैक्षणिक गुणवत्ता असलेले शिक्षक होते. या वर्गातून अनेक जण प्रचारक म्हणून बाहेर पडले.यानंतर जयंतराव भेटले ते एकदम १९९७ मध्ये प्रचारक बैठकीतच! माझी नियुक्ती दक्षिण गोवा जिल्हा प्रचारक म्हणून १९९८ मध्ये झाली. त्याआधी तीन-चार वर्षे जयंतराव गोवा विभाग प्रचारक म्हणून होते. मी गोव्यात पोहोचल्यावर थोड्या दिवसांनी मडगावला आमची भेट झाली. त्यांनी विचारले, “सगळ्यांची मैत्री झाली का?” त्यांना जणू असे सुचवायचे होते की, प्रचारक म्हणून यशस्वी व्हायचे असेल, तर कार्यकर्त्यांशी लवकरात लवकर मैत्री करणे आवश्यक आहे. त्यांना एखादे काम कसे करायचे, असे विचारले असता ते फक्त मंद स्मित करत. “तुझे काम तूच कर, चुकले तरी चालेल,” असे त्यांचे म्हणणे असे. त्यामुळे कार्यकर्ता स्वतःहून विचार करून कामाला लागे. बैठकीसंदर्भात ते म्हणत की, “बैठकीसाठी कोणी आले नाही तरी कार्यकर्त्याने एकट्याची बैठक करणे आवश्यक आहे.”

एखादा कार्यक्रम झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांना विचारत असत, “कार्यक्रम कसा झाला?” कोणी ‘चांगला झाला’ असे सांगितले, तर ते म्हणत, “चांगला झाला, पण सफल झाला का? कारण, संघाचा कार्यक्रम फक्त चांगला होऊन उपयोग नाही, तर त्याचा उद्देश साध्य झाला पाहिजे.”जयंतरावांचे हस्ताक्षर खूपच सुंदर होते. त्यांच्या हस्ताक्षराकडे बघून मला माझे हस्ताक्षर सुधारण्याची प्रेरणा मिळाली. प्रचारक असताना ते मी प्रयत्नपूर्वक सुधारले. नियमित व्यायामदेखील त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण होता. रात्री झोपायला कितीही उशीर झाला किंवा सकाळी कितीही लवकर जायचे असले तरी त्यांचा ठरलेला व्यायाम चुकत नसे. त्यामुळेच कधीही आजारी पडलेले बघितले नाही.जयंतरावांबरोबर साधारणपणे महिन्यातून तीन-चार दिवस जिल्ह्यात विविध कार्यकर्त्यांच्या घरी प्रवास असे. त्यांच्याबरोबरचा निवासी प्रवास म्हणजे एक पर्वणीच असे. अनेक विषयांची माहिती त्यांच्या खास शैलीत मिळत असे. अगदी व्याकरणापासून ते प्राचीन शास्त्रांपर्यंत व गोव्याच्या इतिहासापासून आधुनिक विज्ञानापर्यंत ज्ञानाची मेजवानीच असे.

गोव्यात काम करत असताना त्यांना आलेल्या एका कार्यकारिणीची बैठक घेतली व त्यामध्ये विश्वास दिला की, दोन हजारांपर्यंत उपस्थिती राहू शकेल. त्यानुसार काम करून स्वयंसेवक अधिक नागरिक मिळून दोन हजारांच्या जवळपास संख्या राहिली.जयंतरावांकडे ‘विज्ञान भारती’ची जबाबदारी आल्यावर भेटी कमी झाल्या. एकदा मालवणला काही कार्यक्रमासाठी आले असताना, घरून निघताना पत्नीने त्यांना म्हटले, ”पुन्हा या.” तेव्हा मिश्कीलपणे ते म्हणाले, ”आता मी मोठमोठ्या शहरांमध्ये असतो. मालवणसारख्या लहान गावात येत नाही.” तीच त्यांची अखेरची भेट ठरली. एका दुर्दैवी अपघातात ते जबर जखमी झाले, तरीही काळाशी लढाई सुरू ठेवली. ‘कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, अमिट बलाच्या आधारावर लाख झुंजवू रणे’ ही गीतपंक्ती जणू त्यांच्यासाठीच लिहिली असावी, असे वाटत असतानाच अखेर काळाचा विजय झाला. जयंतरावांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना; हे माहिती असूनही की ते परमेश्वराला निश्चितच सांगतील की, भारतमाता परमवैभवी होईपर्यंत मला भारतातच पुन्हा मनुष्यजन्म दे. जयंतरावांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन!



Powered By Sangraha 9.0