मणिपूर हिंसाचार प्रकरणी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन

10 Jun 2023 17:08:42
Manipur Violence Case committee Establishment

नवी दिल्ली
: मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य जणांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यानुसार, राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचाही यात समावेश आहे. माजी नागरी सेवक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांच्या प्रतिनिधींचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध जातीय समूहांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, ज्यामध्ये विवादित पक्ष/गटांमधील शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी यांचा समावेश आहे, हे समितीचे उद्दिष्ट असेल.

दरम्यान, मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. खोखेन या गावात शुक्रवारी मैतेई आणि कुकी समुदायामध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.

Powered By Sangraha 9.0