पुलंच्या ‘सुंदर मी होणार’मध्ये भव्यता, म्हणून हे नाटक पुन्हा रंगमंचावर : शुभंकर करंडे

10 Jun 2023 22:35:32
Interview Of Shubhankar Karande

नाटकाचा विषय जरी एखाद्या काळापुरता मर्यादित असला, तरीही लेखक आणि दिग्दर्शकाचं त्यात पडलेलं प्रतिबिंब हे मात्र कालातीत असतं. म्हणूनच पुलंची नाटकंही त्या काळात फार गाजली. परंपरागत चालत आलेल्या मराठी वाङ्मयाला विनोदाची किनार लावली आणि विनोदातून एक विचार पुढे नेला तो पुलं देशपाडेंनी. उद्या, दि. १२ जून रोजी पुलंची पुण्यतिथी. त्यानिमित्त पुलंच्या ’सुंदर मी होणार’ या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु करू पाहत असलेल्या शुभंकर करंडे या नवतरुणाची ही मुलाखत...

पुलंचे हेच नाटक निवडण्यामागचे कारण?
मी सर्वप्रथम पुलंचं हे नाटक का निवडलं, ते सांगतो आणि मग हेच का निवडलं, तेही सांगतो. पुलंइतकं अष्टपैलू आणि दृष्ट व्यक्तिमत्व मी पाहिलं नाहीये. पुलं नेहमी हसवणारे, विनोदात रंगलेले, संगीत देणारे, केव्हातरी गाणारे दिसतात. पण, मला पुलंची दुसरी बाजू आवडते, जिथे ते अतिशय गंभीर आणि विचारनिष्ठ आहेत. त्यांचं जीवनाबद्दलच जे चिंतन आहे, त्याची तुलना मी तुकारामांशी करेन. तुकारामांनी हितोपदेश केला, तसेच पुलंनी मार्मिक, सुबोध चिंतनशील लिहिलंय. लहानपणापासून आपण पुलं वाचतोच. त्यांच्यातलं वेगळेपण म्हणजे ज्याप्रकारे त्यांनी जीवनाकडे पाहिले, ‘जीवन सुंदर आहे’ हा दृष्टिकोन आपल्या लेखणीतून त्यांनी दाखवला. अगदी बोरकरांनीही त्यांना म्हंटलं, की, ‘तुझ्यासारखा तूच आनंदयात्री...’ आज आपण इतक्या समस्यांमध्ये गुरफटून गेलोय. अनेक अडचणी, त्यातून निखळ आनंद, जीवनातला सकारात्मक भाव, यावर मी स्वतः विश्वास ठेवतो. त्यामुळे पुलंचं नाटक करायचा विचार मनात होता. कधीपासून ते नाही सांगता यायचं, कारण जेव्हापासून नाटक करू लागलो, तेव्हापासून तो विचार मनात होताच. त्यांच्या दोन नाटकांवर अक्षरश: माझा डोळा होता. ‘तुझं आहे तुझपाशी’ही मला करायचंय. यावेळी ‘सुंदर मी होणार’ हे नाटक घेतलं. पण, या नाटकात जी भव्यता आहे, संहितेत आणि नाटकातसुद्धा ती कुठेतरी भावली. दुसरी गोष्ट, विजयाबाईंनी ‘बेबिराजे’ साकारली होती, सुनीताबाईंनी मुख्य भूमिका साकारली होती. म्हणूनच ही ओढ, ओढ या भूमिकांना केव्हातरी किमान स्पर्श करून येण्याची... त्यांनी देशोदेशीच्या शैली त्यांच्या नाटकात आणल्यात. कुठे फ्रेंच आहे, कुठे इटालियन आहे, रॉबर्ट, कुसुमाग्रज, गोविंदाग्रजांच्या लेखणीचा त्यांनी कधी हात धरला, हे सगळं त्यांनी ज्याप्रकारे स्वीकारलंय आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्यात, ते सुंदर आहे. तसाच योगायोग म्हणजे, माझा आणि रोकडे सरांचाही विचार झाला आणि आमचं या नाटकावर एकमत झालं. ‘आयुका’ संस्थेकडे याचे सर्व हक्क होते. जयंत नारळीकरांची ही संस्था आहे. त्यांचं मोलाचं सहकार्य म्हणजे त्यांनी विना ‘रॉयल्टी’ आम्हाला हक्क दिले. बरं, संहितेत बदल करायची परवानगी नसल्याने केवळ कालानुरूप थोडे बदल हवेत म्हणून ‘मोंताज’ वापरले आहेत. पाडगावकरांनी पुलंना लिहून दिलेलं गीत नाटकाच्या शेवटाला वापरलय. यातलं संगीत सिनेमॅटिक करायचा प्रयत्न केला.

हल्ली जुन्या नाटकांवर पुन्हा काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते उत्साही असतात. बहुतेकांना जुन्याची भुरळ पडलीय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
जुनी नाटकं पाहून नवनिर्मिती करण्याची जी उर्मी दिग्दर्शकांमध्ये दिसून येते ती गरजेची आहे, असे मला वाटते. आपल्याकडे नवे लेखक नाहीत वगैरे काही खरे नाही, आजचे नाटककारही उत्तम लिहितात. पण, जुन्या नाटकांत जी अभिजातता आहे, तिची मनाला भुरळ पडते. जुन्या नाटकांचं विशेष म्हणजे, त्याचा ‘पेस’ शेवटपर्यंत टिकतो, चढत जातो. आपण म्हणतो ना नाटक रंगलं, तसंच! म्हणून जुनं नाटक ही एक उजळणीच आहे. हे शास्त्र, ही कला, जुनी आहे, मानवाच्या उत्पत्तीपासूनची आहे. कालानुरूप तिच्यात बदल होत असतात. पण, कालच्या नात्यातला एक धागा आपल्यासोबत पुढे घेऊन जाताना आपण जुन्या नाटकांकडे वळून पाहतो. म्हणून जुन्या नाटकांची भुरळ म्हणण्यापेक्षा तो अभ्यासाचा भाग आहे, असं मला वाटतं.

एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला नाटकाची कोणती बाजू महत्त्वाची किंवा अधोरेखित करण्यासारखी वाटते?
नाटकातले संवाद मला व्यक्तिश: खूप आवडले. त्यांना ज्या प्रकारे न्याय दिला आहे, तेवढेच ते प्रभावी आहेत. नाटक सुरु होतं तेव्हा त्याला आपण संगीत देतो. का? तर संगीतात लय असते, ती आपल्याला बांधून ठेवते. या नाटकात संवादांना ती लय आहे, जगण्यातली लय त्यामुळे सापडल्यासारखे वाटते. म्हणून ‘पॉलिशिंग’ करायला मजा येते. आता आवडत्या प्रवेशाबद्दल सांगतो. नाटकाच्या शेवटाला जेव्हा दीदी आणि महाराजांचा संवाद सुरु असतो, तेव्हा ती उठते आणि पापांच्या विरोधात उभी राहते. एक वेळ अशी येते, तिला कळतं हा माणूस खोटा आहे. तेव्हाचं तीच उभं राहणं. तिच्या प्रियकराचं एक वाक्य आहे, “तिला पंख हवेत, पाय नकोत.” या वाक्यामागचा कळवळा आणि तीचं ते उठून उभं राहणं, हे चित्र मला फार आवडतं.

नाटक बसवताना तुम्हाला काय अडचणी आल्या का?
या नाटकातील पात्र आजच्या काळात फार नाटकी वाटतात. भाषा तशी वेगळी आहे. स्वातंत्र्योत्तर काळातली आहे. आपण जसं नेहमी बोलतो तशी ही पात्र बोलत नाहीत. मग आम्ही काय करतो, तर सगळे कलाकार एकत्र बसून त्या मंथनातून जे येतं, त्याचा अवलंब करतो. परंतु, अनेकांची अनेक मतं, त्यापैकी कशाचा विचार करायचा, ही अडचण असते. या नाटकाबद्दल अनेक ज्येष्ठांच्या भावना गुंतल्या आहेत. मग ओघाने टीका आलीच. अर्थात, पुलंना स्पर्श करायचा म्हंटलं म्हणजे ही टीका गृहीत धरूनच चालतोय. मात्र, त्यामागचा दिग्दर्शकाचा काय विचार असू शकेल, याचा कोणी विचार करत नाहीत. हे सगळं, सगळ्यांसहित सगळ्यांना सांभाळून घेणं हा या प्रवासातला अवघड भाग होता.

नाटक उत्तम झालंय, अगदी अभिनयापासून संवादात जी सहजता दिसून येते त्याला तोड नाही. भाषा थोडी अलंकारिक आहे, तरीही सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरीत्या आत्मसात केल्या किंवा आपण याला दिग्दर्शकाचे कसब म्हणू! परंतु, संगीत फारच त्रासदायक वाटतं. मूळ नाटकापासून वेगळं काढल्यासारखं अगदी विसंगत वाटतं. तसंच प्रकाशयोजनेचं. शेवटाला गीतादरम्यान प्रकाश जसा फिरवला आहे तसा पूर्ण नाटकात दिसत नाही. याविषयी काय सांगाल?
हो, अगदी बरोबर. नाट्यगृहाची जी सिस्टीम असते, तिथल्या ऑपरेटरकडून थोडी गडबड झाली. त्याला सांगितल्या होत्या तशा ‘लेगरूट्स’ पाळल्या गेल्या नाहीत. म्हणूनच बोरिवलीच्या प्रयोगाला संगीत संवादापेक्षा ‘लाऊड’ झालं होतं. त्यात समतोल राहिला नव्हता आणि प्रकाशयोजनेचं म्हणशील तर उंदराने नेमकी वायर कुरतडली प्रयोग सुरु असताना. म्हणून जनरलवर सर्व लाईट्स ठेवावे लागले. नशीब त्याने मुख्य वायर कुरतडली नाही!
Powered By Sangraha 9.0