आपल्या देशातील सशस्त्र क्रांतिकारकांमध्ये तीन प्रांतातील योद्धे मोठ्या प्रमाणावर होते. हे तीन प्रांत म्हणजे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब. या लेखात मी तुम्हाला बंगालमधील तीन तेजस्वी वीरांची गाथा सांगणार आहे. सावरकर ज्या काळात अंदमानमध्ये जन्मठेपीची शिक्षा भोगत होते, त्याच काळात हे तीनही देशभक्त तेथे तशाच शिक्षेला सामोरे जात होते. त्यांची नावे होती नानी गोपाळ, इंदुभूषण रॉय आणि उल्हासकर दत्त.
नानी गोपाळ हा एक अवघ्या पंधरा-सोळा वर्षांचा कोवळा मुलगा. बंगालमध्ये एका बड्या ब्रिटिश अधिकार्याच्या गाडीवर बॉम्ब फेकला म्हणून त्याला १४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सेल्युलर तुरुंगात सोळा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या राजबंद्यांना कोलूची शिक्षा देत नसत. पण, तरीही नानीला कोलूला जुंपण्यात आले. त्याने ते काम नाकारले आणि त्याचा छळ सुरू झाला. पण, तोसुद्धा सळसळत्या रक्ताचा तरुण होता. तो नमला नाही. त्याला जी जी शिक्षा दिली ती ती त्याने या ना त्या प्रकारे धुडकावून लावली. त्याची एकच (अगदी रास्त अशी) मागणी होती - आम्हांला राजबंदी म्हणून वागवले जावे. त्याचा अधिक छळ होऊ लागला, तेव्हा त्याने कपड्यांचा त्याग केला. तो तसाच राहू लागला. त्याला वेड वगैरे लागलेले नव्हते. तो हे सारे जाणीवपूर्वक करत होता. त्याची ही सगळी बंडखोरी वाढू लागल्यावर अगदी शेवटचा उपाय म्हणून त्याला वेत मारण्याची धमकी दिली गेली.
पण, तरीही तो बधला नाही. शेवटी त्याने अन्नत्याग केला. तो कोणाशी बोलेना. नानी गोपाळ उपाशीपोटी नग्न अवस्थेत त्याच्या कोठडीत जमिनीवर पडून होता, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देईना. पुढे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सेल्युलर तुरुंगाचा मुख्याधिकारी बारी सावरकरांकडे आला आणि तुम्ही नानी गोपाळला अन्न घेण्यास सांगा, तो फक्त तुमचेच ऐकेल, असे सांगू लागला. सावरकरांनी नानीला तसे सांगितले तरी त्याने अन्न घेण्यास नकार दिला. अगदी शेवटचा उपाय म्हणून सावरकरांनी स्वत:च उपोषण सुरू केले. सावरकरांच्या तीन दिवसांच्या उपोषणानंतर नानीने जेवण करण्यास सुरूवात केली! सावरकर राजकैद्यांना सांगत - “उपाशी का मरता? हिसकून हिसकून अन्न घ्या, लठ्ठ व्हा आणि काम मात्र करू नका!”
इंदुभूषण रॉय या तरुणाची कहाणी मोठी वेदनादायी आहे. त्याला माणिकतोळा बॉम्ब खटल्यात दहा वर्षांची शिक्षा झालेली होती. त्याला कोलू, छिलका कुटणे अशी अत्यंत कष्टाची कामे देण्यात आली होती. काही दिवस त्याने ती कामे केली खरी, पण नंतर तो कंटाळून गेला. त्याने काम करण्याचे नाकारले. बारी संतप्त झाला. त्याने इंदूला दंडाबेडीची शिक्षा फर्मावली. तो अतिशय निराश अवस्थेत होता. तो गुप्तपणे सावरकरांना भेटला आणि अत्यंत उद्विग्न होऊन आत्महत्येची भाषा करू लागला. त्याचे वय पंचविशीच्या आसपास होते. तात्यारावांनी त्याला धीर दिला आणि त्या अविचारापासून त्याला दूर ओढण्याचा प्रयत्न केला आणि एकेदिवशी सकाळी सकाळी बातमी आली- इंदुभूषण रॉयने कोठडीत गळफास घेऊन ते अत्यंत यातनामय झालेले जीवन संपवून टाकले! स्वत:चे कपडे फाडून त्याने एक दोरी तयार केली आणि तिने गळा आवळून घेतला. त्याचे वय होते अवघे २५ वर्षांचे! इंदूने या कृत्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी बारीने गायब केली आणि त्याने वेडाच्या भरात आत्महत्या केली, असे धादांत खोटे सांगावयास सुरूवात केली.
याच माणिकतोळा खटल्यात काळ्या पाण्याची शिक्षा झालेला आणखी एक बंगाली क्रांतिकारक म्हणजे उल्हासकर दत्त. अंदमानमध्ये सेल्युलर तुरुंगात मरणप्राय यातना भोगून झाल्यावर एक दिवस त्याने बंड केले आणि काम नाकारले. त्यामुळे त्याला बारीने वेत मारण्याची धमकी दिली. उल्हास्कर म्हणाला, “तुम्ही माझे तुकडेतुकडे करा. मी काम करणार नाही.” तो अतिशय आजारी पडला. त्याला १०७ अंशांपर्यंत ताप चढला. भयंकर थंडी वाजू लागली. आकड्या येऊ लागल्या. त्याला चक्क वेड लागले! उन्माद झाला. तो दहा शिपायांना देखील आवरेना. मग त्याच्यावर उपचार म्हणून त्याला विजेचे धक्के देण्यात आले!! तो ७२ तास पूर्ण बेशुद्ध होता. नंतर शुद्धीवर आला खरा, पण पुरता कोलमडून गेला होता. त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला; पण एका पहारेकर्याने ते पाहिले आणि फासाची दोरी त्याच्याकडून हिसकावून घेतली. त्यामुळे तो वाचला. हळूहळू उल्हासकर बरा झाला. शिक्षा पुरी झाल्यावर बाहेर आला. पुढे त्याने आत्मवृत्त लिहून सेल्युलर तुरुंगातील नरकयातना जगापुढे मांडल्या.
उल्हासकरला वेड लागले तेव्हा बारी सावरकरांच्या कोठडीपाशी आला आणि खवचटपणे म्हणाला, “उल्हासकर वेडा झाला, तुम्हांला कधी वेड लागणार?” सावरकर बाणेदारपणे उत्तरले, “क्वचित तुम्हाला वेड लागल्यानंतर!” नानी गोपाळ, इंदुभूषण रॉय आणि उल्हासकर दत्त या तीन कोवळ्या, तेजस्वी तरुणांची ही हृदयद्रावक गाथा आपल्याला ‘माझी जन्मठेप’मध्ये वाचायला मिळते.
डॉ. गिरीश पिंपळे