धर्माच्या चिनीकरणाकडे?

01 Jun 2023 21:28:32
Yunnan Province Naziying Mosque

आपले विस्तारवादाचे ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणार्‍या चीनने अन्य धर्मांवरही आक्रमणे करण्यास सुरुवात केली. चीन सध्या तेथील उघूर मुस्लिमांची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतो. यंदा अशीच एक १३व्या शतकातील मशीद चीनच्या निशाण्यावर आली. युनान प्रांतातील नागु शहरात असलेल्या या नाजियिंग मशिदीचे घुमट आणि मिनार पाडण्याचा चीनचा प्रयत्न असून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

यांसदर्भातील एक व्हिडिओदेखील ‘व्हायरल’झाला असून, स्वतःला इस्लामचे रक्षणकर्ते म्हणविणारे कतार, सौदी अरेबियासारखे मुस्लीम देश यावर मात्र मौन बाळगून आहेत. चिनी पोलिसांनी या मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. मग काय, पोलीस कर्मचार्‍यांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला, तर पोलिसांवरही दगडफेक झाली.

चिनी पोलिसांनी अनेकांना अटक करून तुरुंगात पाठवले असून आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना आत्मसमर्पण करण्याचा ‘अल्टिमेटम’ही देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत नाजियिंग मशिदीचा विस्तार झाला असून नवीन मिनार आणि घुमट जोडले गेले आहेत. स्थानिक न्यायालयाने ही बांधकामे बेकायदेशीर ठरवून पाडण्याचे आदेश दिले. त्याअंतर्गत पोलीस कारवाईसाठी पोहोचले खरे, परंतु मुस्लिमांच्या तीव्र विरोधाने मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम त्यांना पाडता आले नाही.

चीनच्या युनान प्रांतात मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून हा भाग हुई मुस्लिमांचा बालेकिल्ला समजला जातो. या घटनेनंतर, पोलिसांनी एक निवेदन जारी करून आंदोलक मुस्लिमांना आत्मसमर्पण करण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. दि. ६ जूनपर्यंत आत्मसमर्पण करून आपले जबाब नोंदविणार्‍यांना कमी शिक्षा दिली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. चिनी अधिकार्‍यांनी या घटनेला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. चिनी पोलिसांनी आतापर्यंत निदर्शनात सहभागी असलेल्या डझनभर लोकांना अटकही केली आहे.

याआधी २०१८ मध्येही चीनला निंगशियातील हुई मुस्लिमांची मशीद पाडायची होती. मात्र, मुस्लिमांच्या विरोधानंतर सरकारने काही दिवस शांतता पत्करली आणि नंतर मिनार आणि घुमट तोडून ते चिनी संस्कृतीच्या पॅगोडामध्ये रूपांतरित करण्यात आले. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर २०२१ मध्ये, चीनच्या वायव्य शहर जिनिंगमधील डोंगुआन मशीद चीनच्या कम्युनिस्ट सरकारच्या निशाण्यावर आली. सुमारे ७०० वर्षे जुन्या या ऐतिहासिक मशिदीचे हिरवे घुमट उद्ध्वस्त करण्यात आले. कम्युनिस्ट विचारधारेच्या चीनमध्ये नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार नाही. २०२१ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धर्माचे चिनीकरणावर भाष्य केले होते. याचा सरळ अर्थ असा आहे की, चीनला धार्मिक श्रद्धा चिनी संस्कृती आणि समाजाशी जुळवून घ्यायच्या आहेत.

दरम्यान, प्रामुख्याने उघूर मुसलमानांची समस्यादेखील चीनला १९४९पासून त्रस्त करीत आहे. चीन नेहमीसारखी दडपशाही करत ही चळवळ वेळोवेळी दडपताना दिसतो. २१व्या शतकात मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीमुळे उघूर मुसलमानांची समस्या आता संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचली आहे. २०१८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने उघूर मुसलमानांबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात नमूद केले आहे की, देशाच्या सुरक्षिततेच्या नावाखाली चिनी राज्यकर्ते उघूर मुसलमानांवर अत्याचार करीत आहे. विशेष म्हणजे, जागतिक महासत्ता होण्याचे दिवास्वप्न पाहणारा चीन बाहेरून सामाजिकदृष्ट्या एकसंध दिसतो. परंतु, तेथे प्रचंड प्रमाणात वांशिक ताणतणाव असल्याचे लपून राहिलेले नाही.

दुसरीकडे मुस्लिमांवर अत्याचार झाल्यास मोठमोठे शोक आणि निषेधाचे संदेश लिहिणारे मुस्लीम देश मात्र यावर मूग गिळून गप्प बसले आहेत. कारण, यावेळी ही गोष्ट चीनमध्ये घडली. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा झोडणारेदेखील चीनमधील मुस्लिमांवर होणार्‍या अत्याचारांबाबत चकार शब्द काढत नाही. चीन अनेक मुस्लीम देशांत विविध पायाभूत प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पांसाठी भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळासह अनेक गोष्टींची चीन मदत करतो. त्यामुळे आर्थिक फास आवळून चीन या देशांना गप्प करण्यात यशस्वी होतो. त्यामुळे आर्थिक मजबुरीमुळे मुस्लीम देश भारतावर एकवेळ टीका करतील परंतु, चीनवर टीका करण्याची त्यांची हिंमत होत नाही.

Powered By Sangraha 9.0