काँग्रेस म्हणजे ८५ टक्के कमिशन खाणारा पक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी

01 Jun 2023 15:57:32
PM Narendra Modi On INC

नवी दिल्ली : काँग्रेस हा विकास कामांमध्ये ८५ टक्के कमिशन खाणारा पक्ष आहे. ज्यावेळी सर्वसामान्यांना लूटण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस कोणताही भेदभाव करत नाही; असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथे जाहिर सभेस संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रथम पुष्कर येथे जाऊन ब्रह्म मंदिरात पूजाअर्चना करून आशीर्वाद घेतले. यावेळी जाहिर सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ९ वर्षात भाजप सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वे मार्गावर सुमारे २४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत; काँग्रेसचे सरकार असते तर एवढी मोठी रक्कम मधेच लुटली गेली असती. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना लूटणारा पक्ष आहे. लूट करण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेस त्यामध्ये भेदभाव न करता गरिब, शोषित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला आणि दिव्यांगांना समान प्रमाणात लूटण्याचे काम काँग्रेसने केल्याचा टोला पंतप्रधानांनी लगाविला.

राजस्थानमधील गेहलोत – पायलट वादावरही पंतप्रधानांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी राजस्थानमध्येही जनतेने जनादेश दिला होता. त्याबदल्यात नागरिकांना अस्थिरता आणि अनागोंदी मिळाली. येथे पाच वर्षे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आपसात भांडण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसला राजस्थानच्या जनतेची चिंता नाही. येथे गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. लोकांना त्यांचे सण शांततेत साजरे करता येत नाहीत. दंगल कधी आणि कुठे होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे राजस्थानच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे असल्याचेही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले आहे.

Powered By Sangraha 9.0