शिवरायांच्या राज्याभिषेकाला हिंदू साम्राज्य दिन का म्हणतात?

    01-Jun-2023
Total Views |
Chhatrapati Shivaji Maharaj Coronation

आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीचा आणि नंतरचा इतिहास आपण त्यासाठी अभ्यासायला हवा.

विशेषतः मुघल, निजाम आणि आदिलशाही यांनी भारतीयांवर, विशेषतः हिंदूंवर केलेले अत्याचार आणि विध्वंस कोणीही नाकारू शकत नाही. हत्याकांड, आपल्या माता-भगिनींची छेडछाड आणि बलात्कार, सक्तीचे धर्मांतर, संसाधने आणि पैशाची प्रचंड लूट, जमीन बळकावणे, मंदिरे आणि सांस्कृतिक स्थळे नष्ट करणे आणि अनेक राज्यांमध्ये ‘शरिया’ कायदा लागू करणे. आपला बहुतेक भारत एकेकाळी या विकृत आक्रमकांच्या हातात होता. हिंदूंनी त्यांची क्षमता, सामर्थ्य आणि धर्ममार्गावरील विश्वास यासह सर्व काही गमावले होते. कुणाला तरी हिंदूंमध्ये आत्मविश्वास आणि पराक्रमाची भावना निर्माण करायची होती आणि ‘छत्रपती शिवाजी द ग्रेट’ व्यतिरिक्त कोणीही यशस्वी होऊ शकला नाही.

इंद्रप्रस्थ (दिल्ली), कर्णावती, देवगिरी, उज्जैन आणि विजयनगर या हिंदू राज्यांवर आक्रमणे झाल्यानंतर काही शतके भारतात स्वतंत्र हिंदूसम्राट नव्हता. अनेक हिंदू राजपुत्रांना मुघल किंवा स्थानिक मुस्लीम शासकांचे आधिपत्य स्वीकारण्यास भाग पाडले गेले. शिवरायांच्या राजवटीपूर्वी, कर्नाटकातील विजयनगर हे हिंदू राज्य जगातील सर्वांत सुसंस्कृत, समृद्ध आणि वैभवशाली राज्य होते. हरिहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी स्थापन केल्यावर या राज्याची भरभराट झाली. आदिलशाह, निजामशाह, बेरिदशाह आणि कुतुबशाह या मुस्लीम सुलतानांनी मिळून या साम्राज्याचा नाश केला. विजयनगरावर लाखो सुलतानी सैनिकांनी हल्ला केला. राजा रामरायाला सुलतानांच्या चक्रव्युहात अडकवण्यात आले. विजयनगरचा पराभव झाला.

आमचे योद्धे हजारोंच्या संख्येने मेले! निजामशहाने रामरायचा शिरच्छेद केला होता आणि त्याचे डोके भाल्यावर टांगले होते. विजापूरच्या अली आदिलशहाने रामरायाचे डोके विजापूरमधील एका घाणेरड्या मोरीच्या तोंडावर ठेवले, जेणेकरून रामरायाच्या तोंडातून सांडपाणी बाहेर पडेल. संपूर्ण दख्खन सुलतानांच्या जुलमी अंमलाखाली बुडत होता. निर्दयी मुस्लीम आक्रमकांपुढे आपले सर्वस्व गमावले आहे आणि आपले नशीब बदलण्यासाठी काहीही करू शकत नाहीत, हे हिंदूंना समजले म्हणून, जेव्हा सर्व काही हिंदूंच्या आणि अद्भुत संस्कृतीच्या विरोधात काम करत असल्याचे दिसत होते. तेव्हा, प्रसिद्ध हिंदू योद्धा आणि सनातन धर्माचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य केले. राजाच्या राज्याभिषेकाने देशभरात हिंदू लाट पसरली आणि हिंदूंना आठवण करून दिली की, त्यांनी या क्रूर आक्रमणकर्त्यांविरुद्ध संघटित होऊन लढले पाहिजे, जे गमावले आहे ते परत आणण्यासाठी आणि हिंदू धर्म आणि राष्ट्राचा अभिमान पुनर्संचयित करण्यासाठी एकत्र येऊन लढलंच पाहिजे.

शिवरायांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व म्हणूनच आपण जगाच्या प्राचीन आणि सुसंस्कृत हिंदू संस्कृतीला ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्याचे उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले. इस्लामी राज्यकर्त्यांचा पाडाव करताना हिंदू समाजाचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य केले. जेव्हा हिंदू संस्कृती पूर्णपणे नष्ट होईल आणि तिची ओळख पुसली जाईल, तेव्हा शिवराय आणि मराठा साम्राज्याने हिंदू पुन्हा राजा म्हणून परत येऊ शकतो, अशी संकल्पना निर्माण केली. एवढेच नाही, तर देशभरातील हिंदू साम्राज्य परत आणणारे हे कालचक्र उलटे होऊ शकते हे दाखवून दिले. त्यांनी येणार्‍या पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. ज्यामध्ये त्यांच्या पिढीला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला, जरी ते अशक्य वाटत असले तरी ते शक्यतेच्या कक्षेत आणले जाऊ शकते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा किंवा शिवशाहीचा खरा अर्थ अशक्य काहीच नाही असा आहे. शिवशाहीने भारताच्या इस्लामीकरणाचा इतिहास उलटवला. जगाच्या इतिहासात यासारखे दुसरे उदाहरण नाही. हा ऐतिहासिक धडा भविष्यात आपल्यासाठी मोलाचा ठरेल. इंग्रजांच्या कारकिर्दीत शिवशाहीत झालेला राष्ट्रीय संघर्ष, सांस्कृतिक उठाव, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा आपण पाहतो.

भाषाशुद्धी

भारतावर परकीय आक्रमणामुळे आपली भाषाही दूषित झाली होती. फारसी आणि अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द, हळूहळू मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर होती. याचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजांनी मराठीतील फारसी आणि अरबी शब्दांच्या जागी संस्कृत शब्दांचा पर्याय निवडला. रघुनाथ हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्यावर हे काम सोपवण्यात आले. एकूण १ हजार, ३८० फार्सी शब्दांची जागा संस्कृत शब्दांनी घेतली आणि ’राजव्यवहारकोश’ नावाचा कोश विकसित केला.

मुद्रा

शिवरायांनी संस्कृत भाषेत स्वतःची मुद्रा बनवली. स्वराज्याची सुरुवात झाली तेव्हा शिवरायांच्या नावाचा शिक्का तयार करण्यात आला. मोर्तबही तयार झाली. शहाजी राजे आणि जिजाऊसाहेबांची मुद्रा फारसी भाषेत होती, तर शिवाजी राजांची मुद्रा संस्कृतमध्ये होती. हे राजाच्या सार्वभौमत्वाचे आणि हिंदू संस्कृतीच्या प्रभावाचे लक्षण होते.

प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
साहसुनोः शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते ॥
या संस्कृत मुद्रेचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंद्य असणारी, शहाजीपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे. शिवरायाचे ध्येय त्यात मूर्त आहे. शिवरायांची मोर्तबही मर्यादयं विराजते अशी नम्र होती.

संरक्षण दलाचे बळ

१६४८ मध्ये फत्तेखानाच्या निमित्ताने स्वराज्यावर झालेल्या पहिल्या मोठ्या आक्रमणाच्या वेळी महाराजांचे सैन्य फक्त एक हजार ते १२०० मावळांचे होते. त्यानंतरच्या ३२ वर्षांत गडकोटांच्या संरक्षणाची जबाबदारी महाराजांनी घेतली. त्यांनी सुशासन प्रस्थापित झाले. एक लाख घोडेस्वार, एक लाख पायदळ आणि उत्तम आरमार तयार होते. महाराजांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी १ लाख, ७५ हजार होन (चलन) आणि मुघलांशी लढण्यासाठी १ लाख, २५ हजार होन बाजूला ठेवले होते.

हिंदू मंदिर पुनर्विकास

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचा स्वाभिमान आणि संस्कृती जपली. जेव्हा परकीय आक्रमक आपल्या भूमीवर आले तेव्हा त्यांनी मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त करून समाजाला व संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशा विध्वंसाच्या उदाहरणांमध्ये बाबरने मशीद उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी मंदिराला नष्ट करणे आणि औरंगजेबाने काशिविश्वनाथ आणि मथुरा मंदिरांचा नाश करणे यांचा समावेश होतो. या मंदिरांच्या जागी मुस्लीम आक्रमकांनी केलेली बांधकामे आपल्यासाठी अतिशय आक्षेपार्ह व अपमानजनक आहेत.

अरनॉल्ड टॉयन्बी, एक प्रख्यात इतिहासकार, १९६० मध्ये दिल्लीतील एका व्याख्यानात म्हणाले, “तुम्ही तुमच्या देशात औरंगजेबाने बांधलेल्या मशिदी जतन केल्या आहेत, त्या घटना कितीही अपमानास्पद असल्या तरी, १९व्या शतकाच्या सुरुवातीस जेव्हा रशियन लोकांनी पोलंडवर ताबा मिळवला, तेव्हा त्यांनी त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ वॉर्साच्या मध्यभागी एक रशियन ऑर्थोडॉक्स चर्च बांधले. पहिल्या महायुद्धादरम्यान पोलंडला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा रशियन-निर्मित चर्च पाडणे आणि रशियन वर्चस्वाची आठवण काढून टाकणे ही पहिली गोष्ट होती. कारण, चर्च रशियन लोकांच्या हातून त्यांच्या अपमानाची सतत आठवण करून देत असे. या कारणास्तव भारतातील राष्ट्रवादी संघटनांनी श्री रामजन्मभूमी आंदोलन सुरू केले.”

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे काम आधीच सुरू केले होते. गोव्यातील सप्तकोटेश्वर, आंध्र प्रदेशातील श्रीशैलम आणि तामिळनाडूमधील समुद्रथिरपेरुमल येथील मंदिरांचा महाराजांनी जीर्णोद्धारकेला. जर तुम्ही आमची मंदिरे उद्ध्वस्त केलीत, आमच्या संस्कृतीचा अपमान केलात आणि आमच्या स्वाभिमानाला धक्का लावलात, तर आम्ही त्यांची पुनर्बांधणी करू, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून मुस्लीम आक्रमकांना दिला होता. शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडीतील मशीद पाडल्याचा उल्लेख कवींद्र परमानंद गोविंद नेवस्कर यांच्या शिवभारत (अध्याय १८, श्लोक ५२) या ग्रंथातही आढळतो.

१६७८च्या एका पत्रात, जेसुइट पुजारी आंद्रे फेअर यांनी ‘बीआयएसएम’, पुणे (१९२८, पृ. ११३) द्वारे जारी केलेल्या ऐतिहासिक विविधामध्ये असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांनी मुस्लीम मशिदी नष्ट केल्या. कोणत्याही देशापासून धर्म आणि संस्कृती हिरावून घेता येत नाही. स्वाभिमान कधीच हिरावून घेता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की, परकीय आक्रमकांनी आपल्या स्वाभिमानावर हल्ला केला, तर आपण गुलामगिरीच्या खुणा पुसून चोख प्रत्युत्तर देऊन आपली प्रतिष्ठा बहाल केली पाहिजे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घेतले, तर त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काय केले ते आठवते. शिवरायांकडे भगव्या ध्वजाइतकी शक्ती होती. भगवा ध्वज बघून इतिहास आठवणार्‍या आणि त्यातून प्रेरणा घेणार्‍या सर्वांसाठी शिवराय हे प्रेरणास्थान आहेत. अक्षरशः धूळ खात पडलेला ध्वज शिवरायांनी जीवंत केला, हिंदू धर्माला जीवन दिले आणि मरणासन्न हिंदुत्व पुन्हा जागृत केले. त्यामुळे कुणाला आदर्श ठेवायचे असेल तर शिवरायांना ठेवा.”

अनेक कम्युनिस्ट भारतीय आणि परदेशी लेखकांनी पैसा आणि प्रसिद्धीच्या भुकेने तसेच चुकीच्या विचारसरणीतून थोर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परकीय क्रूर आक्रमकांपासून लाखो लोकांना वाचवणारा आणि गौरवशाली संस्कृती वाचवण्यासाठी रामराज्य परत करणारा वीर. शांत पण गतिमान, सजग, अधोरेखित नेतृत्व हे महाराजांचे वैशिष्ट्य जे प्रत्येक तरुणाने वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकासासाठी अंगीकारले पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतपर्व चालू असताना, यंदाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, म्हणजेच दि. २ जून रोजी शिवरायांचा राज्याभिषेक, शक ३५० सुरू होत आहे. भारतीय इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे.

भारतभर देशभक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी आणि शिवरायांचा गौरवशाली आणि प्रेरणादायी वारसा पसरवण्यासाठी या पवित्र उत्सवात सहभागी होऊ या. ३५० व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त आम्ही या महान हिंदू राजाला आणि योद्ध्याला नमन करतो. (स्रोत: राजा श्री शिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे, स्वराज्यरक्षणाचा लढा - श्री पांडुरंग, श्री सुधीर, श्री मोहन)

पंकज जयस्वाल


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.