टक्कल अभिमानाने मिरविणारी बाई

    01-Jun-2023
Total Views |
Article on Ketaki Jani

सौंदर्याच्या चौकटी मोडीत काढत स्वत:चे टक्कल अभिमानाने मिरविणार्‍या केतकी जानी यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

पुरुषसत्ताक समाजात सौंदर्याच्या परिभाषा ठरलेल्या आहेत. या चौकटीच्या बाहेर काही घडले की लगेच त्याला कुरूपतेचे लेबल चिकटवले जाते. जिथे पुरुषांच्या टकलाविषयी विनोद होतात, तिथे स्त्रीच्या टकलाविषयी बोलायलाच नको. अशाच एक टक्कल अभिमानाने मिरविणार्‍या केतकी जानी...

केतकी जानी या मूळच्या गुजरातच्या. केतकी या लग्न झाल्यावर पुण्यात आल्या नोकरीच्या शोधात असतानाच वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून १९९७ साली मुलाखतीसाठी गेल्यावर ‘बालभारती’मध्ये त्यांची लगेच निवड झाली. सर्वकाही सुरळीत व छान सुरू होते. त्या अन्य स्त्रियांप्रमाणेच निरोगी जीवन जगत होत्या. एके दिवशी घरामध्ये झोपेतून जाग्या झाल्यानंतर त्यांना डोके खाजवत असल्याचे जाणवले. तिथे हात लावला तर चाई पडलेली. आरशात पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. सर्व उपाय झाले. औषधे झाली. पण, उपयोग काहीही झाला नाही. त्यांना झालेल्या ‘एलोपेशिया’मुळे डोक्यावरचे केस झपाट्याने गळू लागले. दिवसागणिक टक्कल पडू लागले.

२०११ पर्यंत सर्वसामान्य असलेले त्यांचे आयुष्य अचानक बदलून गेले होते. २०१५-१६ मध्ये वयाच्या चाळीशीमध्ये त्यांनी सर्व केस गमावले. आता लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. मित्र, नातेवाईक दूर जाऊ लागले. ‘टकली बाई’ म्हणून हिणवले जाऊ लागले. काहींची तर त्यांना चक्क ‘चेटकीण’ म्हणण्यापर्यंत मजल गेली. लोकांच्या विचित्र नजरा रोज टोचत होत्या. लग्न-समारंभात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे हळूहळू नैराश्य येऊ लागले. लोकांच्या नजरेत सहानुभूती आणि प्रश्नचिन्ह दिसत होते. लोकांसमोर जायला भीती वाटू लागली. आत्मविश्वास कमी होऊ लागला. हिला भूतबाधा झाली आहे. देवाचा प्रकोप झाला आहे, अशा वावड्या उठवल्या गेल्या.

समाज आणि स्वत:सोबत सुरू असलेल्या मानसिक संघर्षातून त्यांनी एक दिवस आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बेडरुममध्ये गळ्याला फास लावून घेतला. पण, किलकिल्या दाराआडून त्यांना मुले दिसली. आईचं काळीज उचंबळून आलं. मी मरून जाईन. पण, उद्याची सकाळ माझ्या मुलांसाठी कशी असेल? असा विचार त्यांच्या डोक्यात आला. आपल्या पश्चात मुलांचे काय होईल?, समाज, पोलीस, नातेवाईक त्रास देतील. मुलांसाठी तत्क्षणी आत्महत्येचा विचार त्यांनी दूर लोटला. ठरलं... आता जगायचं तर स्वत:च्या हिमतीवर आणि स्वत:च्या मर्जीने! लोकांचा, समाजाचा विचार करायचा नाही. एका क्षणाच्या मृत्यूमधून नव्या आयुष्याची उमेद जन्माला आली आणि सुरू झाला यशाच्या शिखराकडे जाणारा प्रवास!

आता आपण नव्या उमेदीने जगूया. आपला नवा जन्म झाला, असे मनाशी ठरवून पूर्ण रात्र जागून काढलेल्या केतकी यांनी त्या क्षणापासून नैराश्य झटकून कामाला सुरुवात केली. त्यांना मानसिक आधार देत उभे राहण्याकरिता त्यांची मुले पुण्यजा आणि कुंज या दोघांनी मदत केली. मुलगी म्हणाली, “आई, तू पूर्वीसारखी सुंदर आहेस आणि समाज तुझ्याबद्दल काय विचार करतो, हे महत्त्वाचे नाही.” त्यानंतर प्रत्येक प्रश्नांना त्या भिडू लागल्या. लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना आणि मानसिकतेला बेधडक उत्तर देऊ लागल्या. दरम्यान, त्यांनी आपले टक्कल सजविण्याचा निर्णय घेतला. डोक्यावर ‘टॅटू’ गोंदवून घेतले. अत्यंत वेदनादायी अशी ही प्रक्रिया होती. “देवाने मला दिलेला ‘कॅनव्हास’ मी अधिक सुंदर बनवला,” असे त्या म्हणतात.

या ‘टॅटू’ने गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत केली. त्यांच्या पाहण्यात ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेचे फेसबुक पेज आले. माहिती घेऊन अर्ज केला. त्या ‘फॅशन’ जगताची माहिती नसतानाही स्टेजवर उतरल्या. ‘रॅम्प वॉक’ केला. स्पर्धेच्या जजेसनी त्यांचे कौतुक केले. त्यांचा ‘फॅशन’चा प्रवास सुरू झाला होता. ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड फिनाले’च्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या पहिल्या ‘एलोपेशिया’ महिला त्या ठरल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ‘फॅशन शो’मध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक ‘फॅशन शो’ त्यांनी जिंकले. एवढेच नव्हे, तर या अनुभवाच्या जोरावर त्या आता ‘फॅशन शो’ करतात. अनेक ‘फॅशन शो’मध्ये त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. झीनत अमान यांनीदेखील त्यांचे कौतुक केलेले आहे. एका स्पर्धेमध्ये त्यांना ‘मिसेस इन्स्पिरेशन पुरस्कार’ मिळाला. यशाच्या उंचीवर पोहोचलेल्या केतकी या स्वत: आता अनेक ‘शो’चे परीक्षण करीत असतात. आपल्या स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्यावर कालांतराने पुस्तकेदेखील लिहिली गेली. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्यांच्याविषयीच्या माहितीने भरू लागले.

परंतु, त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर भारतातील स्त्री-पुरुष ‘एलोपेशिया’ग्रस्त नागरिकांसाठी हेल्पलाईन, मदत आणि समुपदेशन असे कार्य त्यांनी सुरू केले आहे. ‘एलोपेशिया’ झालेल्या महिलांचे आयुष्य फार कठीण बनून जाते. त्यांच्याविषयीची स्विकारार्हता कमी व्हायला लागले. त्यामुळे त्यांनी या वेगळ्या कामाला हात घातला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची व्याप्ती देशभर पसरली आहे. आपल्या संस्कृतीमध्येदेखील बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला अधिक महत्त्व दिलेले आहे. सौंदर्याच्या व्याख्या बदलण्यास निघालेल्या केतकी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!

लक्ष्मण मोरे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.