नवी दिल्ली : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात लादण्यात आलेल्या बंदीविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सुदीप्तो सेन यावर म्हणाले की, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा या नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलतात. बीबीसी डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी त्याचे समर्थन केले होते, त्याचप्रमाणे ‘पद्मावत’वर बंदी घालण्याचा मुद्दा आला तेव्हा ममता बॅनर्जी या चित्रपटाच्या समर्थनार्थ समोर आलेल्या पहिल्या राजकारणी होत्या. आता मात्र त्यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट न पाहताच त्यावर बंदीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम चित्रपट पहावा आणि त्यानंतर कारवाईचा निर्णय घ्यावा, असे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात चित्रपट करमुक्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राज्यात ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्याथ हे येत्या १२ मे रोजी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह हा चित्रपट पाहणार आहेत. यापूर्वी मध्य प्रदेशातही हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.