बजरंग दल आणि PFIची तुलना म्हणजे काँग्रेसला विनाशकाले विपरित बुद्धी!

08 May 2023 12:36:51

Eknath Shinde

बेळगाव : पीएफआय आणि बजरंग दल यांची तुलना ही काँग्रेसला सुचलेली विनाश काले विपरित बुद्धी, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक विधानसभा निवडणूकांसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारावेळी काँग्रेसने पीएफआय आणि बजरंग दलावर बंदी आणण्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.

यावरुन समस्त हिंदूंमध्ये तीव्र संताप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचाच समाचार घेतला. ते म्हणाले, "कर्नाटकात काँग्रेसविरोधात प्रचंड नाराजी आहे. पीएफआय आणि बजरंग दलाची तुलना करणे हे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. देशभक्त राष्ट्रभक्त संघटनांची तुलना करणे हेच मुळात चुकीचे आहे. बजरंग दल म्हणजे बजरंग बली आणि त्यावर तुम्ही बंदी घालण्याची मागणी करता. इथली जनता येत्या १० मे रोजी काँग्रेसला जागा दाखवणार आहे.", अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये निवडणूकांच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने कर्नाटकात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0