राष्ट्रवादीच नव्हे अनेक संस्थांच्या घटना बदलून पवार अध्यक्ष

08 May 2023 18:42:12
bjp-chandrashekhar-bawankule-slam-ncp-chief-sharad-pawar


पुणे
: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात तीन दिवसांचे वगनाट्य चालल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शरद पवार यांनी राज्यातील अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांच्या घटनांमध्ये बदल करुन त्याचे अध्यक्षपद मिळविल्याचा आरोपही त्यांनी केली.
 
बावनकुळे हे पुणे शहराच्या दोनदिवसीय दौर्‍यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते. बावनकुळे पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचा घरगुती तमाशा महाराष्ट्राने अनुभवला. राजीनामा नाट्य हे त्या तमाशामधील हे वगनाट्य होते. राष्ट्रवादीने चालविलेला एपिसोड हा पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. सर्व गोष्टी ठरवून केल्या जात होत्या हे सर्वांना समजत देखील होते.

शरद पवार मागील 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांनी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्यामुळे ते दुसर्‍याला अध्यक्ष कसे होऊ देती असा सवालही बावनकुळे यांनी केला. शरद पवार हे महाराष्ट्रातील वरीष्ठ नेते असून त्यांचे स्वत:चे वलय देखील आहे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली. त्यानंतर ते संस्थेचे अध्यक्ष बनले. यासोबतच त्यांनी अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांच्या घटना बदलल्या. त्यानंतर या संस्थांचे अध्यक्षपद मिळविले असा आरोपही त्यांनी केला. घरगुती तमाशाचे वगनाट्य सादर करुन तीन दिवस माध्यमांमधून आपली नौटंकी राष्ट्रवादीने सादर केल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.


Powered By Sangraha 9.0