रुग्णाचे विश्लेषण आणि समन्वय (४)

08 May 2023 19:47:09
Patient analysis and coordination

मायाझम हे काही आजार नाहीत, तर मायाझम म्हणजे आजार होण्याचा पॅटर्न. मायाझमचा अभ्यास म्हणजे आजाराच्या मूळ कारणापासून ते आजाराची पूर्ण लक्षणे दिसेपर्यंत शरीरावर व मनावर होणार्‍या त्याच्या परिणामांच्या संगतीचा, त्याच्या विशेष लसीचा व विशिष्ट परिणामांचा अभ्यास!

उदाहरणार्थ कर्करोग हा आजार कुठल्याही जंतूमुळे किंवा कुठल्याही जिवाणू, विषाणू, पॅरासाईट, फंगसमुळे होत नसतो, तर तो शरीरातील अंतर्गत घडामोडींमुळेच होत असतो.त्यानंतर होणारा जंतूंचा संसर्ग हा कर्करोगाचे मूळ कारण नसते, तर त्याचा रिझल्ट असतो. म्हणूनच या कर्करोगालासुद्धा एका विशिष्ट मायाझमचा दर्जा आधुनिक होमियोपॅथीच्या शास्त्रात देण्यात आलेला आहे. कर्करोगाची स्वत:ची अशी एक पसरण्याची पद्धत असते. त्यामुळे या पद्धतीला अनुसरून या मायाझमचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एक कर्करोगाचा रुग्ण आमच्याकडे आला असता, त्याच्या केसस्टडीमध्ये असे लक्षात आले की, मानसिकदृष्ट्या तो माणूस खूप भयगंडाने व नैराश्याचे मुख्य कारण काय होते, तर त्याच्या घरातील व त्याच्या कार्यालयातील परिस्थिती ही त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली होती आणि या परिस्थितीला पूर्णपणे ताब्यात ठेवण्यासाठी त्या माणसाला जीवाचा प्रचंड आटापिटा करावा लागत होता.

स्वत:च्या स्वभावाच्या पूर्णपणे विरोधात जाऊन त्याला त्या परिस्थितीवर ताबा मिळवायचा होता. सुरुवातीला त्या माणसाने आपल्या शरीराची व मनाची पूर्ण ताकद या कारणास्तव वापरली. परंतु, नंतर नंतर परिस्थिती प्रमाणाच्या बाहेर वाईट झाली व ‘आऊट ऑफ कंट्रोल’झाली. त्यामुळे या माणसाची फार फरफट झाली. परिस्थिती ‘आऊट ऑफ कंट्रोल’मध्ये ठेवणार्‍या नादात, शरीरातील पेशींची पण ‘आऊट ऑफ कंट्रोल’ वाढ झाली व त्याचा कॅन्सर झाला. हा पॅटर्न ‘टिपीकल कॅन्सर’ मायाझमचा होता. त्यामुळे त्याप्रकारे अभ्यास करून जेव्हा त्या रुग्णाला होमियोपॅथीचे औषध दिले. त्यामुळे त्या रुग्णाला अतिशय चांगला गुण आला व फरक पडला.
 
मायाझमच्या अभ्यासाविना या रुग्णाचे औषध शोधणे फार कठीण गेले असते.मायाझमचा अभ्यास केल्यानंतर रुग्णाच्या लक्षणाच्या व चिन्हांकडे नीट निरीक्षण केले पाहिजे. कारण, त्यावरून रुग्ण हा कुठल्या पातळीवर बोलतोय ते लक्षात येते.काही रुग्ण हे फक्त शरीराच्या, पेशींच्या व त्याच्या त्रासाबद्दल बोलतात, तर काही रुग्ण शरीराच्या त्रासाबरोबरच मनाच्या त्रासाबद्दलही बोलत असतात, तर काही रुग्ण हे शरीराच्या तसेच मनाच्या त्रासाबद्दल सांगत असताना त्यांच्या (sub-conscious)अंतर्मनातील फिलिंग्स व अनुभवही कथन करत असतात, जे फिलिंग्स व अनुभव हे निसर्गातील कुठल्या ना कुठल्या स्रोताकडे निर्देश करत असतात. जसे वनस्पती, प्राणी, खनिजे इत्यादी.त्यानुसार मग त्या स्रोताचा अभ्यास करून त्या माणसाची संवेदना शोधली जाते. त्यालाच होमियोपॅथीमध्ये संवेदनाशास्त्राचा अभ्यास असे म्हटले जाते. आजाराचे व रुग्णाचे विश्लेषण करत असताना या संवेदनाच्या अभ्यासाचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. (क्रमश:)


-डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)



Powered By Sangraha 9.0