खवैय्यांची वसई...

    06-May-2023   
Total Views |
Food culture of Vasai

भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगात पाचवा क्रमांक लागतो आणि चवीच्या दृष्टीने पाहिल्यास दुसरा क्रमांक! अशी ही भारताची वैविध्याने नटलेली आणि तितकीच समृद्ध खाद्यसंस्कृती. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय नो डाएट डे’ साजरा झाला. त्यानिमित्ताने मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या वसईच्या खाद्यसंस्कृतीचा घेतलेला आढावा...

 
पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाल्यापासूनच या विकसनशील जीवांना ऊर्जा प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम अन्न करते. स्थळ-काळानुरूप विविध प्रदेशांत सहज उपलब्ध होणार्‍या आणि विशिष्ट संस्कारपूर्वक लागवड केले जाणारे अन्न वेगळे असते. ती त्या त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती. पण, तरीही एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्या विविध समाजाच्या खाद्यसंस्कृतीत मोठ्या प्रमाणावर भिन्नता आढळून येते. यामागचे कारण फारच मनोरंजक आहे. आज मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईची खाद्यसंस्कृती या लेखात उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे.

इतिहास व पार्श्वभूमी

प्रदेशाची भौगोलिक संरचना, तत्कालीन राजवटी व झालेली विविध आक्रमणे, आर्थिक परिस्थिती, सामाजिक कारणे, शहरीकरण, वैश्विकीकरण अशा अनेक घटकांचा प्रभाव अन्नसेवनाच्या, पाककलांच्या आणि ग्रहण करण्याच्या पद्धतींवर पडतो. यातून एक मिश्र संस्कृती उदयास येते. कित्येक शतकांपासूनचे धागेदोरे तिच्यात विणलेले असतात. एक एक दोरा उसवावा तशी एक एक कथा आणि इतिहास आपल्यापुढे उलगडत जाते. या कथा चित्तवेधक असतात. वसईत आजच्या घडीला दीर्घकाळापासून वास्तव्य करून असलेले समाज पाहिले तर त्यात प्रमुख पाच ज्ञाती दिसून येतात. महाराष्ट्राचं नावच मुळात ‘महार’ व ‘रठ्ठ’ अशा दोन आदिमवासियांच्या समाजावरून पडलं. या भागात (वारली) वनवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. वसईच्या तीन बाजूने समुद्र आणि एका बाजूने सह्याद्रीचे कडे लाभल्याने कोळी व महादेव कोळी समाज अनादिकालापासून येथे वास्तव्यास आहे.

 त्याच जोडीला आगरी समाज आणि सामवेदी ब्राह्मण समाज तुरळक प्रदेशात आढळतो. साधारण ११व्या शतकाच्या उत्तरार्धात सोमवंशी क्षत्रिय (पाचकळशी) म्हणजेच वाडवळ कुळे या प्रदेशात राजा बिंब याच्यासोबत आली. त्यांचा प्रवास राजस्थानातून गुजरात येथील चंपानेर अहिनलवाडा पाटण, तेथून पैठण किंवा मुंगीपैठण आणि मग अपरांत उत्तर कोकण असा झाला. या सर्व प्रदेशातील खाणाखुणा त्यांच्या आहारात सुस्पष्ट दिसून येतात. समुद्रकिनारे, सह्याद्री रांगा यांच्या मधोमध बेचकीत वसलेलं हे गाव... मुबलक पाणी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उत्तम जागा. त्यामुळे या प्रदेशावर अनेक आक्रमणे झाली. सातवाहन काळाच्या नंतर इस्लामी आक्रमणे झाली. गुजरातहून बहाद्दुरशहा अपरांतात येऊन राहिला. बिंबिसार राजा, चंपानेरच्या प्रतापबिंबाचा पुत्र महिबिंब, अनुक्रमे कालिकत-गोवा-दमण अशी दर्याफिरस्ती करत आलेले पोर्तुगीज तर तब्बल ४०० हून अधिक वर्षे ठिय्या देऊन होते. त्यांच्या संहारार्थ पुण्याहून आलेले पेशवे सैन्य आणि त्यांच्यासोबतच कोकणस्थ ब्राह्मण, मुंबई नजीकच असल्याने ब्रिटिश समाजाचाही मोठा प्रभाव यांच्या अन्नावर दिसून येतो.


Food culture of Vasai


आहार

वसईतील बहुतांशी मंडळी सामिष खातात. अगदी खवैय्यी आहेत. कोकण किनारपट्टीवरील प्रदेश असल्याने या भागात भात पिकतो. तांदूळ व त्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतात. नारळाचे महत्त्व जेवणात अनन्यसाधारण. पाळीव प्राण्यांच्या मांसापेक्षा खार्‍या पाण्यातील मासे इथे आवडीने खाल्ले जातात. तळणीपेक्षा उकड काढण्यावर भर दिला जातो. हे सर्व प्रकार वर सांगितलेल्या सर्व समाजात समान आहेत. पाचकळशी समाजात दही-दुधाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. हिरव्या भाज्यांसोबतच बेसनही नियमितपणे वापरलेले दिसून येते. होळी, दिवाळी, संक्रांतीच्या दिवसात ‘बांडी’ केली जाते. ‘बांडी’ म्हणजे मातीच्या मडक्यात मिळतील त्या सगळ्या भाज्या एकत्र घालून शेकोटीच्या आगीत आणि धगीत भाजले जाते. रात्रीच्या नितळ अंधारात गटागटाने बसून हे खाण्याचा आनंद घेतला जातो. गुजरातेतील पोपटी आणि उंधियोशी साधर्म्य साधणारा हा पदार्थ. जेवणतील पदार्थात आंबटपणा येण्यासाठी कोकमापेक्षा चिंचेचा वापर जास्त होतो. मोसमानुसार आमचूर पूड आणि टोमॅटोऐवजी कैरी आहारात साधारण एप्रिल मेच्या काळात असते.


गंमत म्हणजे, आमसुलं नसतील तर इथली वनवासी जमात चिंचेचा पाला सुकवून कुटून कढी-आमटीत टाकायला वापरतात. इथे काही उपरे पदार्थ सुद्धा आहेत. अनाहूतपणे आलेले आणि सहज मिसळून गेलेले. पाव हा पदार्थ पोर्तुगीजांनी आणला, हे सर्वश्रुत. पावाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केल्याच्या आख्यायिकाही आहेत. तसाच बटाटा. पाव आणि बटाटा, अननस ही नावंही पोर्तुगाली भाषेतून जशीच्या तशी घेतलेली आहेत. बटाट्याशिवाय एकाही पदार्थाचं पान हलत नाही. अगदी कोंबडी, बकरीचे मांस शिजवतानाही त्यात बटाट्याचा वापर सढळहस्ते केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे, बटाटा आणि पाव सहज उपलब्ध होतात. पोट भरीचं आणि स्वस्त पदार्थ. एकामागोमाग एक दुष्काळ सहन केलेल्या केवळ शेतीच्या आधारावर पोटपाणी चालवणार्‍या समाजाला मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी बटाट्याचा कायम आधार वाटत आला. त्याच जोडीने रताळी, सुरण अशी कंदमुळे आहारातून अगदी नैवेद्याच्या पानातच जाऊन बसली. मसाल्यांपेक्षा मिरचीचा वापर जास्त. पदार्थही झटपट होणारे आहेत. बहुतांश समाज वाडी करणारा बागायतदार, फुलांची लागवड आणि वाडीतील उत्पन्न जवळच असलेल्या मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जाण्याचं काम स्त्रियांच्याच वाट्याला येई. म्हणूनच झटपट स्वयंपाक उरकण्याकडे कल असे. आजही आजही चार माणसांचा भात, ओतवल्या (घावन), कालवणाचा स्वयंपाक चुणचुणीत स्त्री अगदी २० मिनिटांत करते!

न्याहारी

न्याहारी किंवा नाश्ता हा प्रकारच भारतीय संस्कृतीला नवा होता. आजही शहरांपासून दूर गेल्यावर आहार दोनवेळचाच घेतला जातो. वसईला न्याहारीची सवय लावली फिरंग्यांनी... पोर्तुगीजांनी! या समाजातील दोन ते तीन पिढ्या शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या, त्यापूर्वी सकाळी उठून फुलपात्रभर चहासोबत तांदळाच्या पिठाचे तेल आणि मिठाशिवाय तव्यावर हाताने पसरून घातलेले पोळे किंवा भाकर्‍या हा नाश्ता किंवा रात्रीच्या उरलेल्या मांसाच्या मसाल्यात पोहे घालून एक उकड काढून ‘भुजिंग’ वाफवतात. आजही कित्येकांचा हा आवडता पदार्थ. आज खाद्यसंस्कृतीचे प्रवाह संमिश्र समाजव्यवस्थेने बदलले. दक्षिणोत्तर दिशांनी अनेक चवी येऊन मिसळल्या. पदार्थ आंबवून बनवण्याची पद्धत रूढ झाली.

वसईची सुकेळीही तितकीच प्रसिद्ध. त्यामागची कथाही तशीच गमतीशीर आहे. वसई केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. केळीचे उत्पादन घेऊन छोटे शेतकरी एका म्हात्रे कुटुंबातील बुजुर्गांकडे आणून देत. तिथून ती गुजरातेत पाठवली जात. एकदा वाहतुकीच्या गैरसोईस्तव काही दिवस हा माल पोहोचवता येणार नव्हता. इतर फळांचा जसा सुका मेवा केला जातो तसा केळीचा करून पाहावा म्हणून वेगवेगळ्या जातींची केळी उन्हात सुकवायला ठेवली. त्यातल्या राजेळीच्या केळींना यश आलं. आज यंत्राच्या माध्यमातून इतरही केळीची सुकेळी केली जातात. मात्र, नैसर्गिकरित्या तयार होणारी राजेळीच. काळी सुपीक माती व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हिरव्या भाज्या आणि फळ फळावळ सदैव स्वयंपाकघरात उरलेली. अजूनही शहरीकरणाचा तेवढासा प्रभाव झाला नसल्याने घरासमोर बाग, मागच्या दाराशी परसू आहेच. मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, पातीचा कांदा परसूत लावलेला असतो. हे पदार्थ विकत घ्यायची गरजच जाणवत नाही.
 
पूर्णार्थाने समृद्ध अशी ही खाद्यसंस्कृती आहे. पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, सर्व प्रकाची जीवनसत्व पानात दिसून येतात. काळाच्या ओघात तिच्यातही बदल होत आहेत. जसं उत्तर दक्षिण भारतीय पद्धतीचा स्वीकार वसईने केला तसंच आंतरजालाच्या सुविधेने जागतिक खाद्यसंस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. हे प्रवाह आपण बदलू शकत नाही, परंतु या बदलांकडे सूक्ष्मपणे पाहायला मात्र हवे! 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.