वज्रप्रश्न असाही...

05 May 2023 21:41:24
Vajramuth Sabha current status


पुणे, नाशिक आणि कोल्हापूर येथे होणार्‍या मविआच्या तीन वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे म्हणतात की, ऊन खूप आहे. उन्हाचा जोर ओसरला की, सभा घेतल्या जातील. पण, याआधी मुंबईत आणि ठाण्यातपण ऊन होतेच, तरीसुद्धा वज्रमूठ सभा झालीच. मग तशाच प्रकारे पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये या सभा होऊ शकल्या असत्या. पण, आता वज्रमुठीची झाकली मूठ सव्वालाखाची झाली आहे. छे छे काही लोकांच्या मते, झाकली मूठ बिनकामाची असे झाले आहे. या सभा का पुढे ढकलल्या गेल्या? त्या होणार तरी आहेत का? असा प्रश्न काही लोकांना पडला आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. त्या राजीनाम्यानंतरचे नाट्य सगळ्यांनीच पाहिले. शरद पवारांच्या वरदहस्तावर यथेच्छ सत्ता उपभोगणारे नेते रडत होते, भेकत होते. शरद पवार समोर बसलेले असतानाही काही अभद्र घडले आहे, असे वागत होते. नाही म्हणायला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही उपस्थितांना थार्‍यावर आणत होते. असो. एकच वादा अजितदादा. पुढे तिथे कुणाचे काही चाललेले दिसले नाही. मात्र, यापुढे महाविकास आघाडीची वज्रमूठ वज्र राहील की, वज्रमूठेला नेता-कार्यकर्ता गळतीची छिद्र पडतील, याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. नेत्या आणि छोट्या-मोठ्या पदासाठी उभ्या आयुष्याचे राजकारण बनवणार्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्तांची कारकिर्द पाहता वज्रमूठ आणि त्यातल्या सहभागी राजकीय पक्षाचे काय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे वज्रमूठ सभेचे काय घेऊन बसलात, मविआचे काय होणार, हे बघा असेही काही लोक म्हणत आहेत, तर काही लोक म्हणतात, उन्हातान्हाची काहीली झाल्यानंतर वज्रमूठसभेत वांद्य्राच्या साहेबांचे भाषण ऐकून कसे मनोरंजन होत होते. ‘चीनला ‘ईडी’ लावा’ हे साहेबांचे मनोगत ऐकून किती किती कल्पना मनात आल्या होत्या. चीन भारतात आहे आणि भाजपचे राज्य आहे. मग भाजपचे मोदी-शाह कटकारस्थान करणार्‍या चीनविरोधात कारवाई करतो वगैरे वगैरे. पण, आता वज्रमूठ सभाच होणार नाही, तर आम्ही सामान्य लोकांनी मनसोक्त मनोरंजनासाठी कुठे जायचे, काय करायचे? हा त्यांना वज्रप्रश्न पडला आहे.


‘चोर तो चोर, वर शिरजोर!’


'देशात चोर फिरत आहेत, कुणी टीव्ही चोरते, कुणी घर फोेडते, मी हृदय चोरते, तर काही लोक सरकार चोरतात. सरकार चोरणे हे सगळ्यात वाईट,” असे विधान कर्नाटकमध्ये नुकतेच प्रियांका गांधी यांनी केले. मराठीत एक म्हण आहे ‘आडात आहे तेच पोहर्‍यात येणार’ तसेच ‘चोराच्या मनात चांदणे.’ या म्हणींचा उल्लेख का? तर प्रियांका वाड्रा यांच्या पतीवर दुसर्‍याच्या जमिनी हडप करण्याबाबत गुन्हा दाखल आहे, तर त्यांच्या माता सोनिया आणि बंधु राहुल यांच्यावर ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रियकांची आई, भाऊ आणि पती तिघेही जामिनावर बाहेर आहेत. सामान्य गल्लीबोळातील कुटुंबामध्येही घरातील एकजण जरी जामिनावर सुटलेला असेल, तर सगळे घर हवालदिल होते. मात्र, काँग्रेसच्या या नेतेमंडळींच्या कुटुंबाची बातच न्यारी. जवळचे नातेवाईक कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेले असताना प्रियांका गांधींनी इतर राजकीय पक्षांना किंवा नेत्यांना आडमार्गाने चोर म्हणणे म्हणजे ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसर्‍याचं पाहावं वाकून’ असेच म्हणावे लागेल. प्रियांका म्हणाल्या, “त्या कर्नाटकात हृदय चोरायला आल्या आहेत.” यावर काही लोक म्हणत आहेत-कशाला? केवळ निवडणुका असल्या की, ज्या परिसरात जो धर्म असेल, त्याप्रमाणे वेशभूषा करून प्रियांका भाषणबाजी करायला जातात. इतरवेळ देशातील लोकं मरोत की जगोत, त्यावेळी प्रियांका वाड्रांना काही देणेघेणे नसते. उत्तम उदाहरण द्यायचे तर कोरोना काळ. कोरोना काळात महाराष्ट्रात प्रियांका यांच्या काँग्रेसची आघाडी असलेले महाविकास आघाडी सरकार होते. पण, या काळात महाराष्ट्रातली लोक कोरोनाने हतबल झाली. पण, प्रियांकाबाईंनी ढुंकूनही पाहिले नाही. आता निवडणुका आल्या तर त्यांना भारतीय जनता आठवते आणि भारतीय धर्मसंस्कार आठवतात. नाही म्हणायला जिथे काही जातीयवाद असतील आणि त्या फुटीरतेचा फायदा राजकारणात होत असेल, तर प्रियांका आणि त्यांचे बंधुराज तिथे जातीने हजर असताताच. प्रियांका यांच्याकडे स्वतःचे काय आहे? ज्यांना स्वतःचे खरे आडनाव लावायचीही चोरी आहे, ज्यांना स्वतःचेकर्तृत्वही नाही, त्यांनी दुसर्‍यांना चोर म्हणावे, हे म्हणजे ‘चोर तो चोर, वर शिरजोर!’


 
 
Powered By Sangraha 9.0