तथागतांचा धर्मकर्तव्यमार्ग : एक विलक्षण अनुभूती

04 May 2023 21:26:32
Tathagatacha dharma kartavya marag book review

आज दि. ५ मे... बुद्ध पौर्णिमा. तथागत गौतम बुद्धांनी अखिल मानवाला शाश्वत मानवी मूल्यांचा मार्ग दिला. ज्येष्ठ लेखक, विचारवंत ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी ‘तथागतांचा धर्मकर्तव्यमार्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. आज विश्वशांती बुद्धविहार, मुलुंड, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील सारांश मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

तथागतांचा कर्तव्यधर्ममार्ग’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक रमेश पतंगे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या प्रती नकारात्मकता असलेले काही लोक काय म्हणतात, याबाबत लिहिले आहे. त्याचा सारांश असा की, काही व्यक्ती म्हणतात, तथागत गौतमांनी अहिंसा सांगितली म्हणून सम्राट अशोकाने शस्त्र त्यागले आणि त्यानंतर देश पारतंत्र्यात गेला, तर काही म्हणतात की, गौतम बुद्धांनी देवधर्माच्या विरोधात विचार सांगितले, तर एका मोठ्या गटाचे म्हणणे आहे की, १९५६ साली धर्मांतर केलेल्या लोकांमधील काही जणांनी आत्मचरित्र आणि इतर माध्यमातून हिंदू देवदेवता, श्रद्धा यावर टीका केली आणि निंदा केली. राम, कृष्ण, सरस्वती या देवीदेवतांबद्दल अनुद्गार काढले आणि काढतात. यावर लेखकाचे म्हणणे असे की, हे खरे आहे का? उलट ”परिवाराचा विचार केला, तर मुलगा म्हणून बहिणीचे कर्तव्य, आई-वडिलांचे कर्तव्य ज्या गावात ज्या राज्यात राहातात त्यांच्याप्रती त्यांची असलेली कर्तव्ये, प्राणिसृष्टीसंबंधी त्यांची कर्तव्ये, वनस्पती जीवनासंदर्भात त्यांची कर्तव्ये ही कर्तव्ये नीट पार पडली, तर तो सुखी परिवार, सुखी वनस्पती, सुखी प्राणिसृष्टी सुखी आणि राज्य सुखी असा विचार मांडणारा, कर्तव्य पालन सुखाचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अनेक सुत्तातून सांगितला आहे.

आपल्यासारख्या सामान्य जणांना तो कुणी सांगत नाही म्हणून तो आपल्याला समजत नाही. आपल्याला फक्त एवढेच सांगितले जाते की, गौतम बुद्धांनी वेद नाकारले, आत्मा नाकारला, चातुर्वण्य नाकारले, देवदेवता नाकारल्या, पुरोहितांचे वर्चस्व नाकारले म्हणजे नकारात्मक बुद्ध उदंड सांगितला जातो. मनुष्य स्वभावाप्रामणेनकारात्मक विचार कधीही कुणालाही आवडत नाहीत. तो त्याच्या अशा विचारासंबंधी प्रतिक्रिया द्यायला लागतो. हे चूक की बरोबर, हा प्रश्न वेगळाच; परंतु, मनुष्य स्वभाव असा असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे,” असे सांगून लेखक रमेश पतंगे लिहितात की, ”यासाठी भगवंतानी दाखवलेला कर्तव्यपालन सुखाचा मार्ग कोणता याकडे आपण जाऊया.”पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक या पुस्तकाचे प्रयोजन सांगतात आणि पुस्तकाच्या प्रत्येक पानावर या प्रयोजनाचा अर्थ सहस्त्र ज्ञानकिरणांनी प्रदीप्त होते.पुस्तक वाचताना वाटत राहते की, ‘तथागतांचा कर्तव्यधर्ममार्ग’ पुस्तक म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या कालजयी विचारांची सुत्त आणि कथा तसेच जातककथा यांचा विलक्षण समन्वय आणि रसिकतेने केलेले वैचारिक अमृतमंथनच होय. पुस्तकात एकूण २१ प्रकरणे आहेत.

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार असलेल्या ५५० जातककथा आहेत आणि जगाला ‘अत्त दीप भव’ म्हणत आत्मोद्धाराचा, साक्षात्काराचा मार्ग दाखवणारे हजारो सुत्त आहेत. या सर्व २१ प्रकरणांमध्ये लेखक रमेश पतंगे सुत्ताचा आधार घेतात. त्या सुत्तामधून भगवतांनी त्या त्या प्रकरणातील विषयावर काय ज्ञान दिले ते लेखक मांडतात. पण, त्याचसोबत सुत्ताला अनुसरून जातककथाही सांगतात. सुत्त आणि जातककथा यांचा सुरेख मेळ साधत पुस्तक अत्यंत लालित्यपूर्ण आणि तितक्याच भावगर्भितपणे आपल्या बुद्धीचा आणि मनाचाही ठाव घेते.या पुस्तकातील २१ प्रकरणे पुढीलप्रमाणे - गृहस्थाची कर्तव्ये, वाणी शक्ती, तथागतांनी केलेली वर्गवारी, इंद्राचे प्रश्न आणि भगवतांची उत्तरे, सनातन प्रश्न, संघटनेचे सहा नियम, सामरस्याचे सात नियम, राजा प्रसेनजित याचे स्वप्न, चमत्काराचा निषेध, चातुवर्ण जातीभेद आणि अस्पृश्यता, तथागतांचा ब्राह्मणांशी संवाद, केवट सुत्त, भाग्यपंजासुत्त, संपत्ती आणि कर्जबाजारीपणा,भार्यासुत्त, कालामसुत्त, बह्मविहार, महामंगल कशात आहे, पराभव सुत्त, चेहरा एकच असावा, सामाजिक समरसतेचे सात नियम. आता या २१ प्रकरणांच्या नावावरूनच कळते की, या प्रकरणात काय असेल?

पुस्तकात तथागत गौतम बुद्धांचे विचार नव्याने आणि अगदी बुद्धीला प्रमाण देत मनाला भावनेला संवेदित करताना दिसतात. लेखक अत्यंत परखड आणि तितक्यात रसाळ शैलीत पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये तथागतांच्या सुत्तातील विचार आणि जातककथेचा संदर्भ घेत भूत, वर्तमान आणि भविष्य यावर भाष्य करतो. उदाहरणार्थ, गृहस्थाची कर्तव्ये यामध्ये कुटुंबातील व्यक्तीची कर्तव्य तसेच अगदी दारूचे व्यसन, जुगाराचे, तमाशाचे व्यसन यावरही तथागतांचे भाष्य असलेले संदर्भ दिलेले आहेत, तर बहुतेक सर्वच प्रकरणांमध्ये व्यक्तीची स्वतःप्रती कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती असलेली कर्तव्य सांगितलेली आहेत. ही कर्तव्ये आणि त्यातील लेखकाने दिलेले तथागतांचे विचार दाखले पाहिले की, लेखकाचा सर्वव्यापी अवाका जाणवत राहतो. पुस्तकात भगवतांनी सांगितलेले विचार आणि त्यावर लेखकाने दिलेले आजचे संदर्भ अंतर्मुख करायला लावतात. पराभव सुत्तामध्ये तथागतांना शिष्य पराभव आणि अपयशाबाबत विचारतात. तेव्हा तथागत म्हणतात, ”जे धर्मप्रवीण धर्मपारंगत असतात, त्यांचा पराभव होत नाही, त्यांना अपयश येत नाही, तर धर्मभ्रष्ट लोकांचा पराभव होतो.” हे सांगताना लेखक कम्युनिस्ट विचारांचा दाखला देतो. कार्ल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी सांगत नाकारले. पण, पुढे काय झाले? कालांतराने जगभरात या विचारांचा पराभवच झाला. तसेच, आपल्या देशातही धर्मभ्रष्ट लोक पराभूतच होतात, हाही संदेश लेखक देतो.

‘समरसतेचे सात नियम’मध्ये लेखक समरसतेच्या भावाचा उहापोह करतो. तथागत गौतम बुद्धांनी जीवन जगण्याचे जो सारांश नियम दिला, त्या नियमांचा आधार म्हणजे प्रत्येकांशी सन्मानाने-प्रेमाने वागा, ज्येष्ठांची सेवा करा, धर्मपालन करा, पूर्वापार चालत आलेल्या चांगल्या पंरपरा जतन करा, परंपरागत धार्मिक स्थळांचे जतन करा, त्यांचे पावित्र्य राखा आणि त्यांची हेळसांड करू नका, वेगवेगळ्या पंथांचे उपासक तुमच्या राज्यात आले, तर त्यांचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या, सगळ्यात महत्त्वाचे कायद्याचे पालन करा, तर या नियमांचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना लेखक म्हणतो,पालघर साधू हत्याकांड झाले, साधूसज्जनांची हत्या झाली. त्यापूर्वीही अशा घटना घडल्या. हे तथागतांच्या विचारांच्या आणि जीवननियमांच्या विरोधातले आहे, म्हणून या घटनांचा धिक्कार आहे.

लेखक जातकथेचा संदर्भ देतो की, तथागत शिष्यांना एका गाईची गोष्ट सांगतात. या गाईला उंच डोंगरावर चढून जायची इच्छा होते. का? तर त्या डोंगरावर हिरवेगार गवत असते. ते गवत खायची तिची इच्छा असते. केवळ त्या इच्छेसाठी ती डोंगर चढण्याचा प्रयत्न करते. ती डोंगर चढायला लागते. पण, ती सारखी खाली पडते. एक क्षण असा येतो की, ती डोंगरावरूनच खाली पडते. तिला लागते. तिला अपयश येते. तथागत शिष्यांना विचारतात, “ती गाय अपयशी का झाली?” शिष्य म्हणतात, “त्या गाईने केवळ चारा खाण्यासाठी डोंगर चढण्याचा प्रयत्न केला. पण, डोंगर चढण्याची क्षमता आणि गुणवत्ता तिच्यात नव्हती. तिने ती आत्मसात करण्याचा प्रयत्नही केला नाही म्हणून तिला अपयश आले.” यावर लेखक सध्याच्या अनेक घटनांचा आणि पदासाठी हपापलेपणाने वाट्टेल ते करणार्‍यांचा मार्मिक संदर्भ देतात. काही विघ्नसंतोषी माणसांनी समाजात फूट पाडण्यासाठी काही गैरसमज पसरवले आहेत. द्रष्टा भगवंतांनी अशा लोकांचा समाचार घेण्यासाठी काय म्हंटले आहे, याचे अतिशय सहज आणि सत्य विवेचन या पुस्तकात आहे.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य असेसुद्धा म्हणता येईल की, आपण कुठेही पुस्तक वाचत आहोत, असे वाटत नाही, तर लेखक थेट आपल्याशी संवाद साधतोय, आपल्याला प्रश्न उपस्थित करायला लावतोय आणि त्याप्रश्नाची उत्तरेही पुढे लेखकच देतो, असेही दिसतेे. अनेक दशके समाजाच्या तळागाळात सामाजिक आणि वैचारिक कार्य करताना लेखकाने अनुभवलेला समाजधर्म हा या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाच्या अंतरंगात अवतरलेला आहे. २६०० सालापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी जे जीवनसार समाजाला दिले, ते आज २०२३ सालीच काय, तर जगाच्या अंतापर्यंतही सत्यच राहील, या विश्वासापर्यंत वाचक येऊन ठेपतो. हा जो विश्वासाचा प्रवास आहे, ते लेखक रमेश पतंगे यांचे सामर्थ्य आहे.

सामान्य लोकांना तथागत गौतम बुद्ध म्हटले की, अष्टांगमार्ग वगैरेपर्यंतच माहिती असते. पण, पुस्तकातून तथागतांनी मानव जातीला समता, समरसतामय जीवन जगण्याचे जे बुद्धामृत दिले, त्याचा सांगोपांग बोध होतो. तथागत कोणत्याही ब्राह्मणाच्या नव्हे, नव्हे कोणाच्याही विरोधात नव्हते, तर ते मानवजातीच्या अखंड कल्याणाचे प्रवर्तक होते. माणसाच्या दुःखाचे मूळ कारण शोधून त्यावर शाश्वत मार्ग सांगणारे खरे महाबोधी होते. त्यांनी सांगितलेला ‘धम्म’ हा समाजधारणा करणारा धर्म आहे, हे चटकन जाणवते. त्यांनी सांगितलेल्या धम्माने जगभरात समाजाची धारणा केली म्हणूनच तो जगात टिकला, असेही वाटते. तथागत गौतम बुद्धांना ‘महाबोधी’ म्हणतात.त्यांच्या विचारांचा अथांगपणा बुद्धी आणि मनालाही चेतना देतो. त्याची विलक्षण अनुभूती हे पुस्तक देते.

हे पुस्तक लेखकाने रामप्रकाश धीर यांना समर्पित केले आहे. १९२६ साली जन्मलेले रामप्रकाश धीर हे संघ प्रचारक आणि तथागतांचे थोर उपासक. १९४६ साली ते संघ प्रचारक म्हणून निघाले आणि १९५६ साली ब्रह्मदेशात त्यांनी कार्य सुरू केले. २०१४ सालापर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार त्यांनी जगभर केला. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवक प्रचारकाने बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वेचले. तथागतांचे विचारकार्य हे सर्वसमावेशक आहे आणि रा. स्व. संघाच्या सर्वसमावेशक समाजविचारात धम्म नेहमीच अनुकरणीय आहे, हे नक्कीच. ‘तथागतांचा कर्तव्यधर्ममार्ग’ हे पुस्तक वाचकांच्याच नव्हे, तर समाजाच्याही धर्मसमाज जाणिवा सर्वार्थाने जागृत करते. तथागतांच्या विचारांना कालातीत संदर्भ आहेत. त्या संदर्भाचा अभ्यास करत जीवन समृद्धीचा मार्ग देणारे हे पुस्तक म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे.
गौतम बुद्धांच्या ‘कर्तव्यधर्ममार्गा’च्या काही निवडक सुत्तांच्या आधारे या पुस्तकात विवेचन केले आहे. भगवंताची दहा हजारांहून अधिक सुत्ते आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करायचा म्हंटले, तर त्यासाठी एक जन्म घ्यावा लागेल, म्हणून हे पुस्तक म्हणजे अथांग समुद्रातील ओंजळभर पाण्यासारखे आहे. त्याचा एवढाच अर्थ की, अथांग समुद्राच्या पाण्यात जो गुणधर्म आहेते ओंजळभर पाण्यातही असतात. समुद्राचे पाणी हे शेवटी समुद्राचेच पाणी असते. ही ओंजळ वाचकांच्या चरणी कर्तव्य भावनेने अर्पण करत आहे.( रमेश पतंगे)
Powered By Sangraha 9.0