आर्थिक वर्ष २०२२ -२३मध्ये जीडीपी दर ७.२ टक्के

31 May 2023 20:00:04
Indian Economy GDP Rate

नवी दिल्ली
: केंद्र सरकारने बुधवारी आर्थिक वर्ष २०२२ - २३ आणि चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहिर केली. त्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के राहिला आहे. त्याच वेळी, संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.२ टक्के राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाचा विकास दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. आरबीआयने ७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्याच वेळी, तो आर्थिक वर्ष २०२२ मधील ९.१ टक्के विकास दरापेक्षा कमी आहे. एनएसओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्रात तिमाही आणि वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत, कृषी क्षेत्राचा विकास दर तिमाही-दर-तिमाही आधारावर ४.७ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

खाण क्षेत्रात गेल्या तिमाहीत ४.१ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, यावर्षी या क्षेत्रात ४.३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ८.२ टक्के वाढीच्या तुलनेत वीज क्षेत्रात ६.९ टक्के घट झाली आहे. बांधकाम क्षेत्रातही वाढ दिसून आली आहे. गेल्या तिमाहीत, या क्षेत्राची वाढ ८.३ टक्के होती, जी या तिमाहीत वाढून १०.४ टक्के झाली आहे. रिअल्टी क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील तिमाहीतील ५.७ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत हे क्षेत्र वाढले आहे.

वित्तीय तूट घटली, सरकारला दिलासा

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाची वित्तीय तूट जीडीपीच्या ६.४ टक्क्यांपर्यंत (१७.३३ लाख कोटी) खाली आली असून ती केंद्र सरकारच्या लक्ष्यानुसार आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशाची वित्तीय तूट ६.७ टक्के होती.

Powered By Sangraha 9.0