दिल्ली साक्षी हत्याकांड : १६ वेळा चाकू भोसकून मारल्यानंतर साहिलने काय केलं?

31 May 2023 12:31:34
 
Delhi Sakshi Murder case
 
 
नवी दिल्ली : २० वर्षीय आरोपी साहिल सरफराजने १६ वर्षीय साक्षीवर चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केल्यानंतर जवळपास अर्धा तास तो बिनधास्तपणे परिसरात वावरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवळच्या पार्कमध्ये काही वेळ बसला होता. यावेळी त्याने हत्येसाठी वापरलेला चाकूदेखील आपल्या हातात ठेवला होता. पार्कमध्ये बसल्यानंतर तो रिथालासाठी रवाना झाला. या ठिकाणी त्याने आपला चाकू फेकून दिला. पोलिसांनी सांगितलं आहे की, त्याने जंगल परिसरात चाकू फेकून दिला आणि नंतर आपला मोबाइल स्वीच ऑफ करुन टाकला.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहील यानंतर ई-रिक्षाने समयपूरसाठी रवाना झाला. तिथे त्याने मेट्रो स्थानकावर रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो समयपूर बदली येथून आनंद विहारला गेला. यानंतर त्याने बसने बुलंदशहर गाठलं. पोलीस अटक करण्याची भीती असल्याने त्याने रस्त्यात अनेक बस बदलल्या. पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून साहिलला अटक केली आहे. पोलीस चौकशीत त्याने आपल्याला हत्येचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.
 
या चौकशीदरम्यान हत्येनंतर त्याने नेमकं काय केलं हा सगळा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी ही हत्या रागाच्या भरात झाली असल्याचा दाव्यावर शंका उपस्थित केली असून, हा पूर्वनियोजित कट होता असा असे संकेत दिले आहेत. याचं कारण म्हणजे, साहिलने १५ दिवसांपूर्वी हरिद्वार येथून चाकू विकत घेतला होता, दरम्यान अटकेनंतर साहिलला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. १जून रोजी साहिलला दंडाधिकारींसमोर हजर केलं जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना अद्यापही हत्येत वापरण्यात आलेला चाकू तसंच मोबाइल अद्याप सापडलेला नाही.
 
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, साहिल वारंवार आपला जबाब बदलत आहे. चौकशीदरम्यान, त्याने पोलिसांना सांगितलं आहे की, तरुणीची एका दुसऱ्या तरुणाशी चांगली मैत्री झाल्याने आपण चिडलो होतो. हत्येच्या आदल्या दिवशी त्याची तरुणीशी भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात चांगलंच भांडण झालं होतं. यावेळी तरुणीच्या मित्राने साहिलला तिच्यापासून लांब राहण्यास सांगितलं होतं. साहिलने दिलेल्या या माहितीची सत्यता पोलीस तपासणार आहेत. याशिवाय सीसीटीव्हीत दिसलेल्या सर्व साक्षीदारांचीही पोलीस चौकशी करणार असून त्यांचे जबाब तपासले जाणार आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0