भगवान व्यासांनी भागवतात लिहून ठेवले आहे की, ब्रह्मदेवाच्या क्रीडेपासून सप्त स्वर उत्पन्न झाले. ’स्वराः सप्तविहारेण भवन्ति स्म प्रजापते’ या वचनातील व कथेतील शास्त्रीय रहस्य आम्ही जाणून घेतले पाहिजे. ब्रह्मदेव नावाची कोणी देहधारी व्यक्ती नसून विश्वाच्या उत्पादक शक्तीची ती एक अवस्था होय. बृह म्हणजे फुगणे. विश्व ज्यावेळेस व्यापक व्हायला लागले, त्यावेळची व्यापक होणारी, वाढणारी शक्ती म्हणजे ‘ब्रह्मा’ होय. विश्व आजही वाढत आहे. म्हणजे ब्रह्मा आजही प्रतिक्षण नांदत आहे. ब्रह्मा म्हणजे विश्वाची उत्पादक शक्ती होय.
ब्रह्मदेवाची क्रीडा म्हणजे ब्रह्मदेवाचा विहार म्हणजेच सहज क्रिया होय. ब्रह्मदेवाची सहज क्रीडा सृष्टी उत्पादक असल्याने आनंदमय असणारच. एकच शक्ती नानारुपाने प्रकट होऊ शकते. सूर्य किरणाचे पृथक्करण केल्यास त्यातून इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंग प्राप्त होऊ शकतात, हे सर्वांनाच माहीत आहे. ’एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ एका चैतन्यशक्तीचे पर्याय नाद, स्पर्श, रुप, रस व गंध या प्रकारांनी व्यक्तीला व्यक्त होणार. स्वरांना रंग, रस व चव आहे. एवढेच आज सिद्ध झाले आहे. असाही दिवस उगवेल की, ज्यावेळेस स्वरांना रुप व गंधही प्राप्त होईल.
आमच्या पूर्वजांनी गानयोगात त्याबद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्याकडे आमचे लक्ष जाणे आवश्यक आहे म्हणजे सर्व चतुर्मात्रात्मक जगत् ज्या उत्पादक शक्तीच्याद्वारे व्यक्त झाले आहे, ती उत्पादक शक्ती सप्त स्वरात विहार करते. हा वरील श्लोकाचा वैज्ञानिक अर्थ झाला. वस्तू वा घटना प्राप्त होताना त्यातील ओत प्रोतांची विशिष्ट गती होणे आवश्यक आहे. गती म्हटली की, त्यात नाद आलाच आणि नाद म्हटला की त्यातून स्वर उत्पन्न झालेच पाहिजेत. म्हणून जगताचा विस्तार, स्थिती व प्रलयसुद्धा स्वरांच्याद्वारेच होणार हे ओघानेच आले. म्हणून सप्त स्वरांच्याद्वारे ब्रह्मदेव सृष्टी रचनेची क्रीडा म्हणजे विहार करतो, या वैज्ञानिक सत्यापर्यंत आपण येऊन ठेपतो.
ब्रह्मा ज्या नादशक्तीच्याद्वारे सृष्टविहार करतो, त्याच नादशक्ती जर साधक काढू शकला, तर त्याच्याही गायनाने सृष्टीरचना होऊ शकेल, हे स्पष्ट आहे. म्हणजे असली शास्त्रीय गीते वाजविली किंवा गायली म्हणजे श्रोत्यांना व गायकाला आपण विश्वामित्राच्या एका रम्य सृष्टीत विहार करीत आहोत, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. स्वरांच्या सुयोग्य रचना कंपामुळे सृष्टीत नादाद्वारे अवकाशात प्रतिकृती उत्पन्न होऊन त्यांचा वर्ण, स्पर्श, रुप, आकार, चव वा गंध हे गुण अनुभवास येतील. भगवान श्रीकृष्णाची रासक्रीडा असलाच प्रकार असू शकतो. एका नादगुणामुळे आम्ही इतके गुंग होतो, तर वेणुनादाच्या श्रवणासह त्याचा स्पर्श, रुप, रस व गंध अनुभव करणार्या गोपीकृष्णावर लुब्ध होऊन त्यांना सर्व जगाचा विसर पडला असल्यास नवल नाही. शिवाय भगवान श्रीकृष्ण महान योगेश्वर व गोपीही त्याच्याबद्दलच्या त्यांच्या भक्तिभावाने पुनीत झालेल्या म्हणजे योगावस्थेतच असतात. वेणुनाद उत्पन्न करणारा योगी व वेणुनाद ऐकणार्या गोपीही योगिनी.
म्हणजे उच्च अवस्थेतील स्वरांचे पंचगुणात्मक अनुभव असल्या योगिनींना येऊ नये, तर कोणाला यावेत? एका स्थानी उभे राहून पंचगुणात्मक स्वर वाजविणारे योगेश्वर कृष्ण ज्या स्थानी त्यांचे ते पंचगुणात्मक स्वर जातील, त्या-त्या स्थानी असलेल्या श्रुतिकेंद्रांना म्हणजे गोपींना त्या पंचगुणात्मक स्वरांची अनुभूती झाल्यास नवल ते काय? म्हणजे अशा तर्हेने प्रत्येक गोपीला पंचगुणांनी युक्त अशा स्वरांसह त्यांचा उत्पादक भगवान श्रीकृष्ण त्यांच्याच सन्निध राहून टिपर्या वाजवितो आहे, असा अनुभव न आल्यासच आश्चर्य! एखाद्या व्यक्तीजवळ दूरश्रवण व दूरदर्शन देऊ शकणारे उपकरण (टेलिव्हिजन) असल्यास जगाच्या कोणत्याही कोपर्यात त्या कंपन लहरीवर गाणे चालू असल्यास व तिने त्या कंपन लहरीशी (वेव्ह लेंथ) आपल्या उपकरणाचा संबंध प्रस्थापित केल्यास त्या व्यक्तीला ते गाणे व दृश्य त्यांच्या जवळ असलेल्या टेलिव्हिजनसेटवर दिसेलच. भगवान श्रीकृष्ण व गोपी यांची चित्ते योगव्यापक असल्याने त्यांना असल्या बाह्य उपकरणांची मुळी आवश्यकताच नसते. त्यांचे चित्त म्हणजे सर्वव्यापी सर्वगुणात्मक ग्रहणकेंद्रच (रिसीव्हर) होय. अशी ही गोप-गोपींची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची रासक्रीडा होय.
त्यात अशास्त्रीय म्हणून असंभव असे काहीच नाही. जे कोणी गोप वा गोपी बनून या परमोच्च अवस्थेला पोहोचत असतील, त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडेचा आजही अनुभव येईल. रासक्रीडेचा अनुभव येण्याकरिता स्वरांची पंचगुणात्मक अवस्था व त्यायोग्य शरीर आणि चित्त असणे अत्यावश्यक आहे. कोणतीच धारणा नसताना असल्या उच्च अवस्थेतील रासक्रीडेचा अनुभव येणार नाही. सध्याचा काळ म्हणजे बुद्धिवाद्यांचा काळ! आपल्या बुद्धीला जी गोष्ट पटते तीच खरी अन्यथा ती खोटी, खुळचट असे सर्वसाधारण माणूस मानीत असतो. आपल्या बुद्धीने जी गोष्ट निर्धारित केली ती तशी असलीच पाहिजे आणि तसे नसल्यास तो मूर्खपणा असला पाहिजे, अशी सध्याच्या बुद्धिवाद्यांची अवस्था आहे. पण, बुद्धी कशाला म्हणतात हेच आम्हाला नीट कळत नाही. मेंदूच्या तर्कटांनाच आम्ही बुद्धी समजून, स्वतःची फसवणूक करीत असतो. गीतेत स्पष्टच म्हटले आहे, ’ददामि बुद्धियोगं तं’ भगवंताच्या कृपेशिवाय बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही.
असली बुद्धी प्राप्त होण्याकरिता टाळ कुटत बसले पाहिजे किंवा माळ ओढीत बसले पाहिजे असेही नाही. विषयाशी इतके तादात्म्य पावले पाहिजे की साध्या देहरक्षणाच्या गोष्टीचेही भान राहू नये, अशी अवस्था आल्यासच बुद्धी प्राप्त होऊन ज्ञानप्राप्ती होते. ज्ञान प्राप्त होण्याकरिता ते समजण्याइतपत बुद्धीचा विकास व्हावा लागतो. पण, आमचा अट्टाहास असा असतो की, आम्हाला समजेल तेच खरे बाकी सब झूठ!
भारतीय संगीतात ‘पीएच.डी’ झालेल्या एका विद्वानाने भारतीय राग-रागिण्यांची स्वरुपे इत्यादी गोष्टी खुळचट कल्पना असून आता पाश्चात्त्य जगाने स्वरांना रंग व चव प्राप्त केल्यामुळे त्यांच्या शोधांबद्दल आस्था दाखवून त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि असल्या खुळचट कल्पनांच्या मागे लागून आपला वेळ विनाकारण वाया घालू नये, असा पोक्त सल्ला दिला होता. जो तो उठतो आणि भारतीय शास्त्रांवर तुटून पडतो. जणूकाही भारतीय शास्त्रेच केवळ खुळचट कल्पना किंवा अनाथ आहेत, अशी त्यांची कल्पना असते. असल्या आक्रमकांना आता लगाम घातलाच पाहिजे. ’बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ हा न्याय भारतीय शास्त्रांप्रमाणे असल्या अडाणी टीकाकारांनाही आता लागू केला पाहिजे.
योगिराज हरकरे
(शब्दांकन :राजेश कोल्हापुरे)